कथा – रमेश तांबे
मी प्रशांतच्या घरी पोहोचलो तेव्हा तो बेडवर झोपला होता. म्हणजे नुसताच पडून होता. आधीच किरकोळ शरीरयष्टीचा प्रशांत अगदी अस्थिपंजर झाला होता. डोळे खोल गेले होते आणि निस्तेज बनले होते. काळासावळा प्रशांत औषधाच्या माऱ्याने अगदी काळाकुट्ट पडला होता. डोक्यावर अजिबात केस नव्हते. हाता-पायांच्या काड्या, खपाटीला गेलेले पोट आणि चेहऱ्यावरची हाडं स्पष्ट दिसत होती. मला पाहताच तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते त्याला शक्य होत नव्हतं. मग मी आणि त्याच्या आत्याने त्याला किंचित पुढे उचलून त्याच्या पाठीमागे दोन चार उशा सरकवल्या. मी त्याच्या समोरच टेबलवर बसलो आणि नुसता त्याच्याकडे पाहत होतो. प्रशांतचे हे रूप माझ्यासाठी अगदी नवखं होतं.
मी काही विचारण्याच्या आतच प्रशांत हसरा चेहरा करून म्हणाला, “कसा आहेस रमेश!” त्याचं ते उदास हसू माझ्या हृदयाला छेद करून गेलं. मी म्हटलं “तू कसा आहेस?” तर म्हणाला, “तूच सांग, मी कसा दिसतो?” त्याच्या या अनपेक्षित प्रश्नानं मी थोडासा गांगरलोच. माझी अवघड परिस्थिती बघून तोच म्हणाला,” काही नाही रे, माझं परतीचं तिकीट आलंय!” प्रशांतचं बोलणं ऐकताना मी माझी नजर जमिनीकडे वळवली होती. कारण माझ्या डोळ्यांतले अश्रू बघून उलट तोच मला म्हणाला असता, “अरे असं रडतोस काय?” नंतर दोनच दिवसांत प्रशांत जग सोडून निघून गेला. स्मशानभूमीत आम्ही सारे मित्र त्याच्या अंत्यविधीला हजर होतो. घरातला मोठा मुलगा, वर्षापूर्वीच विवाह झालेला, उच्च शिक्षण घेऊन साऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणारा प्रशांत, त्याच्या आजाराचे निधन झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात हे जग सोडून गेला. प्रशांत असाध्य अशा कॅन्सरने गेला होता.
या घटनेला जवळजवळ वीस वर्षे झालीत. पण आजही तो काळासावळा, किरकोळ शरीरयष्टीचा, लांबलचक नाकाचा, उत्साह आणि प्रचंड आत्मविश्वासाने भारलेला प्रशांत माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. छोटंसं घर, घरात भरपूर माणसं त्यामुळे अभ्यास कसा आणि कुठे करायचा असा प्रश्न त्याच्यापुढे होता. प्रशांत प्रभादेवीला राहायचा. आमच्या विभागातील “आराधना” नामक अभ्यासिकेने त्याचा हा प्रश्न सोडवला होता. ही अभ्यासिका माझ्या घराशेजारीच होती. आम्ही सारी मित्रमंडळीदेखील तिथेच अभ्यास करायचो. प्रशांत एक अभ्यासू आणि हुशार मुलगा होता. बी.कॉम. करता करता सीए, आय.सी.डब्ल्यू.ए. या परीक्षादेखील तो एकाच वेळी देत होता.
तेव्हा आम्ही जेमतेम अकरावी-बारावीत असू. तो भली मोठी पुस्तके घेऊन यायचा. तासन् तास वाचत बसायचा. अगदी दिवस-रात्र. दिवसाचे पंधरा-सोळा तास नेहमीच अभ्यास करायचा, अवांतर वाचन करायचा, जगाची माहिती अद्यावत ठेवायचा. गप्पा मारताना असं काही बोलायचा की, आपण एखाद्या विचारवंताशीच बोलतोय असं वाटायचं. त्याच्या बोलण्यातून नेहमीच एक आत्मविश्वास दिसायचा. माणसाची ध्येयं मोठी असली पाहिजे, त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे असं त्याचं मत असायचं. नेहमी काहीतरी वेगळं, क्रिएटिव्ह करायचं, माणूस म्हणून आपलं वेगळंपण जपायचं हाच त्याला ध्यास होता. यथावकाश प्रशांतने पदवी घेतली. सीए, आय.सी.डब्ल्यू.ए या पदव्यादेखील उत्तम गुण मिळवत लीलया पटकावल्या. आम्ही मित्रांनीदेखील असंच काही तरी वेगळं करून दाखवायला पाहिजे म्हणून तो सदैव आमच्या मागे लागायचा. पण आम्ही सारी मित्रमंडळी अभ्यासात तशी सुमारच होतो. सरधोपट शिक्षण घेण्यापलीकडे आम्ही जास्त काही वेगळे करू शकलो नाही. दिवसाचे पंधरा-सोळा तास अभ्यास करताना प्रशांतला दोन सवयी लागल्या होत्या. त्या म्हणजे सिगारेट ओढणे आणि चहा पिणे. वाचन करून मन थकलं की पुन्हा ताजंतवानं होण्यासाठी त्याने हा पर्याय निवडला होता. या दोन गोष्टींचं अतिरिक्त सेवनच त्याला कॅन्सरपर्यंत घेऊन गेले तर नसेल ना अशी मला राहून राहून शंका वाटायची.
नोकरीनिमित्त प्रशांत पुण्यात स्थायिक झाला. जेमतेम वर्षभराचा वैवाहिक जीवनाचा काळ, दोन वर्षांच्या नोकरीत उच्च पदावर काम करण्याचा आनंद उपभोगून प्रशांत कॅन्सरसारख्या असाध्य रोगाला सामोरा गेला. पाठ दुखते म्हणून डॉक्टरांकडे गेला आणि कॅन्सर झाल्याचे निदान घेऊन घरी आला. मग तो औषधोपचार, जीवघेण्या केमोथेरप्या त्यामुळे आधीच किरकोळ असलेला प्रशांत खूपच खंगून गेला. दोन महिन्यात त्याचं वजन तीस किलोवर आलं होतं. आम्हा मित्रमंडळींना कळेपर्यंत प्रशांतच्या जगण्याच्या साऱ्या आशा मावळल्या होत्या. त्याचं शरीर कोणत्याही उपचारांना योग्य प्रतिसाद देत नव्हतं. थोड्याच दिवसात प्रशांत हे जग सोडून गेला. त्याचं असं अकाली जाणं आम्हा मित्रमंडळींसाठी मोठाच धक्का होता.
प्रशांतचं व्यक्तिमत्त्व भारावून टाकणारं होतं. त्याची शिकण्याची जिद्द, मोठमोठी स्वप्नं, त्यासाठीचे त्याचे प्रचंड परिश्रम, “शिक्षणच आपल्या जीवनात समृद्धीची पहाट निर्माण करेल” असा त्याला प्रचंड आत्मविश्वास होता. अशा चैतन्याने सळसळणाऱ्या प्रशांतवर नियतीने घाला घातला. सर्व काही एकाकी संपून गेलं. आजही आराधना अभ्यासिकेत कधी डोकावलं, तर एका कोपऱ्यात किरकोळ शरीरयष्टीचा प्रशांत जाडजूड पुस्तकाचं वाचन करताना दिसत असल्याचा भास होतो. मग काळाचा पडदा पुन्हा एकदा हलू लागतो आणि भूतकाळ डोळ्यांसमोर झरू लागतो अश्रूधारांच्या रूपाने…!