नुकतेच माझे, लग्न होते त्यावेळी ठरलेले,
सगळेजण माझ्या सासरच्या घरी जमलेले.
सजला होता बंगला फुलझाडांत वेलीत,
महत्त्वाची बोलणी होती बैठकीच्या खोलीत.
बोलताना मधेच सासुबाईंना म्हणाले दीर,
“पोंक्षे महाराज” आले आहेत बाहेर, होऊनी अधीर.
सासुबाई म्हणाल्या, ‘‘थांबू देत” थोडावेळ,
आधी खरेदीच्या चर्चेचा बसू दे ताळमेळ.
थोडा वेळ थांबून दिरांनी पाहिले वाकून,
पोंक्षेंच्या स्वारीने दिले होते स्वतःला, खुर्चीत झोकून.
“अशी काय ही माणसे?” आले माझ्या मनी,
बाहेर का ताटकळत ठेवावे दुसऱ्याला कुणी.
एक तर, काम त्याचे करून टाकावे पटकन,
नाहीतर, त्याला आत तरी बोलवावे झटकन.
चहाची वेळ झाली, आवाज केला कप बशीने,
“पोंक्षे महाराज”, इकडेच येत होते म्हणे स्वखुशीने.
दिरांनी पुन्हा सासुबाईंना होते खुणावले,
आता “त्या दोघांचे” लक्ष, बाहेर होते स्थिरावले.
कोण येते आहे याचे पडले होते मला कोडे,
पुरुषभर उंचीच्या अपेक्षेने पाहिले मी दाराकडे.
सासूबाई, नवरा सगळे पाहत होते कौतुकाने,
दारातून प्रवेश केला एका “गलेलठ्ठ” बोक्याने.
नवरा म्हणाला मला, हा आमचा‘‘पोंक्षे महाराज’’,
मांजराला “महाराज” म्हणतात, कळले मला आज.
“हेच” नाव ठेवण्याचे विचारले मी त्यांना कारण,
सासऱ्यांचे निकटचे मित्र होते त्याचे स्पष्टीकरण.
खास मित्र पोंक्षेंनी दिली सासऱ्यांना प्रेमाने भेट,
बोकाही त्यांच्यासारखाच होता घारागोरा थेट.
झाल्या सगळ्या प्रकाराने खूप हसू मला फुटले,
सासरी गेल्यानंतर “पोंक्षे महाराज” ही मला पटले.
– मृणाल ठाकुरदेसाई, अंबरनाथ