भालचंद्र ठोंबरे
महाभारत युद्धानंतर अंदाजे ३०-३५ वर्षांनी पांडवांनी अर्जुनाचा नातू परीक्षित, याला राज्याभिषेक करून स्वर्गरोहणासाठी प्रस्थान केले. परीक्षित हा अर्जुनाचा नातू अनिरुद्धचा मुलगा होता. परीक्षिताला जनमेजय, भीमसेन, उग्रसेन व श्रुतसेन अशी चार मुले होती. महाराज परीक्षित सच्छिल, ज्ञानी, धर्माचरणी, सदाचरणी व प्रजावत्सल राजा होते. प्रजा सुद्धा धर्माचरणी होती. एके दिवशी जंगलात शिकारी निमित्त फिरत असताना राजा परीक्षितासमोर अचानक एक काळा पुरुष आला. राजाने त्याला त्याचा परिचय विचारला असता तो म्हणाला, “ मी कली, व आता द्वापार युग संपत असल्याने कालक्रमणानुसार मी तुझ्या राज्यात येत आहे. तेव्हा परीक्षित कलीला म्हणाला, “तुझ्या येण्याने माझ्या राज्यातील प्रजेमध्ये काय फरक पडेल.” कली म्हणाला, जनतेची अधोगती होईल, त्यांच्यात द्वेष वाढेल, लोक धनलोभी होतील व त्यांची सर्व प्रकारे अधोगती होण्यास सुरुवात होईल. हे ऐकून परीक्षित राजाने कलीला आपल्या राज्यात प्रवेश न करण्यास बजावले; परंतु कली म्हणाला, मी ईश्वरी इच्छेने आलो आहे, त्यामुळे मागे फिरणे अशक्य आहे. तेव्हा परीक्षित शस्त्र उभारून म्हणाला, माझ्या प्रजेला मी तुझ्यामुळे त्रास होऊ देणार नाही, व तुला राज्यात प्रवेशही करू देणार नाही त्यासाठी मी कोणाशीही युद्धाला तयार आहे.
राजा परीक्षिताचा निर्धार व आवेश पाहून कली घाबरून गेला व म्हणाला, ‘‘महाराज मी आपणास शरण येत आहे आणि शरण आलेल्याला आश्रय देणे हे राजाचे कर्तव्य आहे. तेव्हा मला तुम्ही आपल्या राज्यात आश्रयासाठी जागा द्या. मी त्या ठिकाणी राहीन व आपण असेपर्यंत आपल्या प्रजेला त्रास देणार नाही. तेव्हा परीक्षिताने त्याला राहण्यासाठी सोने, स्त्री, दारू, जुगार, अभक्ष्यभक्षण या पाच जागा राहाण्यास दिल्या. तेव्हा कली म्हणाला, ‘‘महाराज या जागा अपुऱ्या आहेत कृपया अजून द्याव्यात.” तेव्हा परीक्षित महाराज विचार करून म्हणाले ठीक आहे, अवैधरीत्या मिळालेल्या सोन्यात तू राहू शकतोस. हे ऐकून कली परीक्षित राजाच्या सोनेरी मुकुटात जाऊन बसला. हा मुकुट जरासंधाचा असून भिमाने जरासंधाचा वध केल्यानंतर तो ताब्यात घेतला पण त्यांच्या वारसांना परत केला नाही अशी आख्यायिका आहे. कलीशी अशाप्रकारे वार्तालाप झाल्यानंतर राजा परीक्षित शिकारीसाठी वनात गेला. जंगलात शिकार करून दमून, भागून, तहानलेला राजा एका आश्रमाजवळ आला. हा आश्रम शमीक ऋषींचा होता. शमीक ऋषी त्यावेळेस ध्यानस्थ बसले होते. परीक्षित राजाने शमीक ऋषींना पिण्यास पाणी मागितले, मात्र ऋषी ध्यानस्थ असल्याने उत्तर देऊ शकले नाही. तेव्हा मस्तकात असलेल्या कलीच्या प्रभावाने राजाचा क्रोध जागृत झाला. ऋषी सोंग करीत असून मुद्दाम आपला अपमान करीत आहे, अशी धारणा होऊन राजाने जवळच मरून पडलेला एक साप शमीक ऋषींच्या गळ्यात घातला, व परत फिरला. आश्रमातल्या ऋषी कुमारांनी ही वार्ता शमीक ऋषींचा मुलगा शृंगी याला कळविली. आपल्या पित्याच्या अपमानामुळे क्रोधित झालेल्या श्रुंग ऋषींनी राजा परीक्षिताला सात दिवसांच्या आत सर्पदंशाने मृत्यू होईल असा शाप दिला. शमीक ऋषींना या घटनेची माहिती होताच व मुलाने परीक्षित राजाला दिलेल्या शापाची माहिती मिळताच त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी शृंगऋषीला “ तू अज्ञानातून दिलेल्या या शापामुळे एका धर्मवत्सल राजाचे अहीत होऊन पुढे अनाचार माजणार आहे,” असे म्हणून ते ताबडतोब याची माहिती देण्यासाठी परीक्षित राजाकडे निघाले.
इकडे राजा महालात पोहोचल्यानंतर त्याने मुकुट काढून ठेवला. कली असलेला मुकूट काढताच कलीचा प्रभाव नाहीसा होताच राजाला आपल्याकडून घडलेल्या अपराधिक कृतीची जाणीव झाली व तो अस्वस्थ झाला. त्वरित ऋषीकडे जाऊन क्षमा याचना करण्याच्या उद्देशाने तो निघू लागला, तोच स्वतः ऋषी शमीकच त्याच्याकडे आल्याचा निरोप त्याला द्वारपालांनी दिला. परीक्षिताने त्यांचा आदर सत्कार करून आपल्या कृत्याची क्षमा मागितली. ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला, मात्र माझ्या मुलाने तुला सर्पदंशाने सात दिवसात मृत्यू येण्याचा शाप दिला. ते सांगण्यासाठीच आपण आल्याचे सांगितले. मंत्र्यांनी राजाला मिळालेल्या सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूच्या शापाची गोष्ट ऐकून राजाच्या संरक्षणाची पुरेपूर व्यवस्था करून कडेकोट बंदोबस्त केला. राजाने मात्र नम्रपणे आपल्या शिक्षेचा स्वीकार केला, व जनमेजयाला राज्याभिषेक करून ऋषीकडे मार्गदर्शनासाठी गेला. अल्प दिवसाचे आयुष्य असणाऱ्या व्यक्तीने मोक्षप्राप्तीसाठी काय करावे अशी विचारणा केली. तेव्हा ऋषी म्हणाले की, अशा व्यक्तीने श्रीकृष्ण लिलेचे भागवत श्रवण करून सतत नामस्मरण करावे. हे ऐकून राजा शुकदेवांकडे गेला व त्याने सर्व वृत्तांत कथन करून आपणास भागवत कथा सांगण्याची विनंती केली.
दरम्यान राजाला मिळालेल्या शापाची बातमी ऐकून कश्यप नावाचा एक व्यक्ती राजाच्या भेटीसाठी निघाला. कश्यपाला, सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे विष उतरवून, त्याला पुन्हा जिवंत करण्याची विद्या अवगत होती. मात्र तो राजाच्या भेटीला राजप्रासादाकडे जात असतांनाच राजाच्या महालात प्रवेश करण्याच्या संधीची वाट पाहत असलेल्या तक्षकाला तो दिसला. तक्षकाने त्याची विद्या पाहून त्याला अपार धन देऊन परत फिरविले. शुकदेवांनी परीक्षिताला भागवत कथा सांगितली. परीक्षित राजाने ती भक्तिभावाने श्रवण केली. एके दिवशी फलाहार करत असताना फळांमध्ये सूक्ष्म रूपाने प्रवेश केलेल्या तक्षकाने फळ कापताच आपले मूळ रूप धारण करून परीक्षिताला दंश केला. अशाप्रकारे एका सच्छील व धर्मपरायण राजाचा अंत झाला.