मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
दरवर्षी कार्तिक एकादशी किंवा देवऊठणी एकादशी दिवशी तुळशीचे लग्न असते. तुळशी विवाहनंतर लगेचच विवाह मुहूर्त सुरू होतात. लग्नसराई सुरू होते. विवाह म्हणजे जेथे दोन मने जुळतात. दोन घरे जुळतात. ऋणानुबंधांचे नाते जन्मो जन्मांतरीचे नाते जुळते. पण हल्ली मात्र हे केवळ आणि केवळ बडीजाव, मोठेपणा, दिखावपणा यातच घडले जाते; परंतु तसे पुढे जाऊन टिकते का? प्रश्नच प्रश्न? तेथे तडजोडीचा अभाव येतो. म्हणजे तडजोडीला वजा करून बाकी सगळं जमेच्या बाजू बघतात. त्याच कधी वजा होतात कळत नाही! तसे पाहिले तर सप्तपदीमध्ये सात पावले प्रत्येक पावलांमध्ये एक-एक वेगळेपण असते. उदाहरणार्थ जबाबदारी, आशा, आधार, सामंजस्य, साहचर्य, स्नेह आहे ना गंमत! या सात वचनांना बांधील असतो आपण.
लग्न म्हटले की, सोहळा, हौसमौज आलीच, तसेच लग्न धुमधडाक्यात झाले पाहिजे हे प्रत्येक वधू-वराला वाटत असते. पण याच लग्न सोहळ्याचा घाट घालताना कोट्यवधींची उलाढाल ऋण काढून हा सोहळा साजरा केला जातो. आर्थिक संपन्नता, सुबत्ता, परिस्थिती नसतानाही एक दिवसाचा खेळ. मग त्याला ऐपतीप्रमाणेच महत्त्व द्यावे. कोणी सोन्याची सरी घातली म्हणून आपण लगेच गळ्यात दोरी घालायची नसते. हा खर्चिक सोहळा. या सोहळ्यासाठी लोकांना काय काय करावे लागते चला तर मग पाहूया!
मोठी यादी आहे लांबलचक. वेशभूषा, केशभूषा, सौंदर्यप्रसाधने, महागडी वस्त्र, लग्न पत्रिका, खरेदी, शालू, कपडे, दागदागिने, मानपान, सवाष्ण हळदीकुंकू, ओट्याभरणं, भांडीकुंडी, कपडालत्ता, रुखवत, झालझेंडा, दागदागिने, मेकअपचे सामान इतकेच नाही तर प्रत्येक सोहळ्यासाठी विविध प्रकारच्या योजना. हल्लीच्या फॅशननुसार आखणी आणि खर्चच खर्च. लग्नातील रितीभाती, पारंपरिक पद्धतीने केलेला लग्न सोहळा आणि आताच्या युगातील वेगळेपण यात खूप फरक पडला आहे. लग्न सोहळा म्हणजे एक इव्हेंट झालेला आहे आणि तो इव्हेंट मॅनेजमेंटला द्यावा असं काहींचं म्हणणं! ते संगीत, सादरीकरण, निवेदन, हळदी, साखरपुडा, प्री-वेडिंग, महागडे कॅटरर्स, उत्तम चविष्ट वेगवेगळे मेनू हॉल, सजावट, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, पार्किंग व्यवस्था, फुले, हार, मुंडवळ्या, चित्रीकरण, विद्युत उपकरणांची वाढती हौस, डीजे डान्स, ओली सुखी पार्टी, मुहूर्त, भटजी, कन्यादान साहित्य, मानपानाचे देण्या-घेण्याचे आहेर, गणवेश पोषाख, टॉवेल टोपी, साड्या सवाष्ण ओटी भरण इ. गोष्टी लग्न म्हटले की लागतातच.
मग लग्नाआधी कुलदेवतेचे पूजन त्यासाठी मांडलेला गोंधळ, जागरण. कुलदैवत, ग्रामदैवत यांना पत्रिका ठेवायला जाणं, प्रवासखर्च, हळदीचुडा भरणे, बांगड्या भरणे, साखरपुडा सामानांची यादी त्यासाठी सवाष्ण्याची यादी याने तर तारांबळ उडते.
आजच्या पिढीसाठी वेगळेवेगळे लोकेशन. सुशोभित प्रवेशद्वारापासून सभागृह, व्यासपीठ, सजावट, वाद्य, सुरेल संगीत स्वागत. स्वागताला म्हणाल तर दरवाजातच आत जाईपर्यंत अत्तरदाणी, प्रत्येकाला सोनसाफा, गुलाब फुले, रंगीत अक्षता, सजावट केलेला नाजूकसा झुला. विविध प्रकारांनी झगमगाट आणि या झगमगटामध्ये एक दिवसाचा हा जो खेळ आहे तो आयुष्यभर कर्ज फेडायला लावतो आणि हे कर्ज मात्र दोन्ही कुटुंबाला किंबहुना मुलीच्या माहेरच्यांना भारी पडतं. त्यामध्ये नक्कीच एखादं घर विकत घेता येईल. नव्या वधू-वरांना भविष्याचा विचार करता भविष्याचे नियोजन तरतूद असेल किंवा आवश्यक असणारी गरजेची वस्तू दागिने दिले तर ठीक आहे. पण अनाठायी जे करतात तेव्हा उदा. मुला-मुलीची ऐपत नसताना कशाला हवा हा भव्य डामडौल. विवाहाच्या मुहूर्तावर भटजींनी गायलेले मंगलाष्टक, शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर संसाराची सुरुवात. या संसाराच्या सुरुवातीलाच अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये एकमेकांना स्वीकारलेलं असतं. मग त्यांच्यावर कोणतेही ओझं किंवा दडपण जबाबदारी लादता कामा नये. मुलांनी तितेकच पालकांनी समजून घ्यायला हवं. आयुष्याची पुंजी पालकांनी तुमच्यासाठी जरी खर्च केली असली तरी त्यांना ती पुढे औषध पाण्याला लागणार असते. एखाद्या घरावर आलेल्या अडीअडचणींच्या प्रसंगी विचारपूर्वक तसा विनियोग व्हावा लागतो. काटकसरीने वागावे लागते. कुठेतरी या खर्चाला आवर घालावा.
प्रसंगी पैसे वाचवावे आणि योग्य त्या ठिकाणी खर्च करावे. लग्नासारख्या खर्चिक सोहळ्यातून आपण आपले तन-मन-धन कुठेतरी गैर दिशेला वाया न घालवता आपले नियोजित प्लॅन्स किंवा भविष्यातील घडामोडी आणि सुधारणा यासाठी नक्कीच ते कामी येतील. अशा पद्धतीने लग्न सोहळ्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला वाढती महागाई आणि समस्यांसाठी कुठेतरी ते उपयोगी पडतील. त्या एका दिवसाच्या खर्चामध्ये जर एखादा फ्लॅट किंवा घर येत असेल तर निश्चित त्याचा विचार व्हावा. त्याच पैशात स्वतःची शेतीवाडी, जमीन जुमला किंवा अन्य वस्तू पुढील भविष्यामध्ये नियोजनासाठी निश्चित कामी येऊ शकतात. मंडळी लग्न करताय तर सावधान आपल्याच भल्याचे आपणच ठरवावे.