पल्लवी अष्टेकर
१३ डिसेंबर २००१ रोजी नवी दिल्लीतील भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने सीमेवर लष्करी उभारणीची सुरुवात केली होती. १ ऑक्टोबर २००१ रोजी जम्मू व काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला होता. भारताने दावा केला होता की, हे हल्ले पाकिस्तानने, भारत प्रशासित काश्मीरमध्ये लढणाऱ्या दोन दहशतवादी गटांद्वारे केले होते. त्यांची नावे ‘लष्कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-महोम्मद’ अशी होती. प्रदीर्घ लष्करी अडथळ्यांच्या शेवटी, एका गुप्त कारवाईत भारताच्या जाट रेजिमेंटने द्रास, पाॅइंट ५०७० जवळील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी बाजूवरील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पर्वत शिखरांवर कब्जा केला व त्याचे नाव ‘बलवान’ असे ठेवले. पाकिस्तानने सीमेवरती त्यांच्या सर्व सशस्त्र दलांना तैनात केले. त्यामुळे जागतिक स्तरावर अणुयुद्ध होण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे सर्व देश काळजीत पडले. लष्करी जमवाजमवीचे भारतीय सांकेतिक नाव ‘ऑपरेशन पराक्रम’ असे होते.
भारतीय नौदलाचे एक सशस्त्र जहाज हिंद महासागरात तैनात करण्यात आले. त्या जहाजावर नेमणूक असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यात रजनीश वर्मांचा देखील समावेश होता. तेव्हा रजनीशजींचा मुलगा स्वराज पाच वर्षांचा होता. त्याला ताप आला होता व न्यूमोनिया झाल्याचे कळाले होते व ताबडतोब वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. मात्र रजनीशजींना आता आपल्या पत्नी-स्वप्नजावर सर्व काही सोपवून, त्याच दिवशी ताबडतोब निघणे भाग होते. रजनीशजी व त्यांचे सहकारी यांना शत्रूच्या समुद्री हद्दीजवळ तैनात करण्यात आले. ते अनेक दिवस समुद्रात होते, इंधन वाचवण्यासाठी फक्त आवश्यक यंत्रसामग्री चालवत होते. स्वत:ची स्थिती गुप्त ठेवण्यासाठी कोणतेही सेन्सर, जसे की रडार किंवा कम्युनिकेशन सेट चालू केलेले नव्हते. किमान वेळेसाठी आवश्यकतेनुसार फक्त अनिवार्य नेव्हिगेशन रडार चालू केले गेले. एका रात्री नॅव्हिगेशन रडार चालू केल्यावर त्यांना आढळले की, सुमारे आठ ते दहा जहाजांनी त्यांना वेढले आहे. काहीही दिसत नव्हते, पण रडारवर ते सर्व काही दाखवित होते. कमांडिंग ऑफिसरने डेकवरील सर्वांना लढाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. सर्व तोफा व क्षेपणास्त्र प्रणाली, इतर शस्त्रे कोणत्याही प्रसंगासाठी, गोळीबार करण्यासाठी सज्ज होती.
ती रात्र जहाजावरील सर्वांनी सावधपणे व उच्च पातळीवरील सतर्कतेने घालविली. ती रात्र वैऱ्याची होती. त्यांना कुठल्याही प्रकारची हालचाल करण्याची परवानगी दिली गेली नव्हती. सर्व युद्धनौकांमध्ये स्वत:ची व शत्रूची जहाजे ओळखण्यासाठी उपकरणे असली तरी स्वत:चे स्थान गुप्त राहावे म्हणून ती शक्यतोवर वापरात आणली जात नव्हती. जेव्हा ते दुर्बिणीने पाहू लागले, तेव्हा त्यांना आढळले की, ही इतर देशांची नौदल जहाजे आहेत व शत्रूची नाहीत. शेवटी त्यांना निश्चिंत राहण्याचे आदेश देण्यात आले. भारतीय नौदलामध्ये सक्रिय कामगिरी बजावणाऱ्या कमोडोर रजनीश वर्मा यांचा जन्म होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील ‘इंडियन ऑईल काॅर्पोरेशन’मध्ये काम करत होते व त्यांची आई शिक्षिका होती. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी अचानकपणे आपल्या वडिलांना गमावले. ते म्हणतात की, त्यांना वडिलांच्या कार्यासाठी सुद्धा वेळेत पोहोचता आले नाही, कारण की सुट्टी काढणे इतके सहज नव्हते. त्यांच्या आईने त्यांना व त्यांच्या भावाला मोठे केले.
रजनीशजींच्या दूरच्या काकांच्या मुलाच्या सुचविण्यानुसार त्यांनी नौदल प्रवेशासाठी फाॅर्म भरून अर्ज पाठविला. बेंगलोर येथे विविध बुद्धिमत्ता चाचण्या, शारीरिक चाचण्या व व्यक्तिमत्त्व चाचण्यांमधून त्यांना जावे लागले. तेव्हा रजनीशजींचे वय १७ वर्षे होते. नौदल अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली. अंदाजे चौदा हजार अर्जदारांमधून फक्त साठ कॅडेटसची निवड झाली. १९८५ मध्ये ते सशस्त्र दलात सामील झाले. रजनीशजींचा नौदलातील प्रवास आश्चर्यकारक व साहसी आहे. आपण सेवेत असताना कधी निस्तेज क्षण येत नाही, त्यांनी असे अनेक अनुभव सांगितले.
रजनीशजींनी ३६ वर्षांहून अधिक काळातील सेवेत अनेक प्रकारे विशिष्ट योगदान दिले. कार्यात्मक पातळीवर, रजनीशजी पाच युद्धनौकांवर डेप्युटी इलेक्ट्रिकल ऑफिसर (DLO) / इलेक्ट्रिकल ऑफिसर (LO) म्हणून नियुक्त झाले होते आणि सुमारे ८ वर्षे समुद्रात सेवा केली होती.
२००८ मध्ये, राजपूतचे LO म्हणून, त्यांनी शस्त्र प्रणालीतील व्यापक अनुभवांसह, राजपूतवरील वोलना प्रणाली पुन्हा सुरू केली. त्यांनी सरफेस टू सरफेस (SSM) ब्रह्मोसची यशस्वी चाचणी देखील पार पाडली व जमिनीवरील लक्ष्य अचूकपणे साधले. त्यांच्या कार्यकाळात, राजपूतला ‘जुन्या नौकांच्या’ श्रेणीत ‘सर्वोत्कृष्ट नौका’हे पारितोषिक मिळाले. ते सांगतात की, “अनेक रडारच्या तांत्रिक समस्या त्यांनी यशस्वीरीत्या सोडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याव्यतिरिक्त २००८ मध्ये, त्यांनी पी २५ वर्गाच्या नौकांवर तांत्रिक समस्या यशस्वीरीत्या सोडवल्या व त्याची बंद पडलेली मिसाइल फायरिंग क्षमता पुन्हा स्थापित केली. त्यांची नियुक्ती न्यू दिल्ली येथे डॉकयार्डचे प्रिंसिपल डायरेक्टर म्हणून झाली होती, जेथे त्यांना एका परकीय मित्र देशासाठी ब्रेकवॉटर, जेटी आणि संबंधित मूलभूत सुविधांसह बेटावर कोस्ट गार्ड मुख्यालय निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. असाच आणखीन एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होता, जेव्हा समुद्री बांधकामाची रचना आणि साईट तपासणी अध्ययन पूर्ण झाली नव्हती, तेव्हा त्यांनी पूर्ण समुद्री बांधकामाची रचना केली. त्यांच्या निर्धारित अर्ज आणि कठोर परिश्रमांमुळे समुद्री कामातील अडचणी दूर झाल्या आणि प्रकल्पाने यशस्वी फेरफाराकडे वेग घेतला. या सर्व अनुभवांवर आधारित, त्यांनी समुद्री काम आणि ड्रेजिंग विक्रेत्यांच्या नेमणुकीसाठी कठोर निवड प्रणाली तयार केली.
रजनीशजींनी कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या सुधारणीवर निरंतर लक्ष केंद्रित केले, कार्यक्षम कामाचे वातावरण प्रोत्साहन देणारे, कार्यालय जागेचे उन्नयन, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष आणि व्यायामशाळा तयार केल्या. या लेखाच्या मर्यादेत त्यांचे सर्व कार्य आणि योगदान लिहिणे अशक्य आहे. रजनीशजी म्हणतात, “आपल्या सशस्त्र दल व भारतीय नौदलाला सर्वोत्कृष्ट व तेजस्वी लोकांनी चालविणे गरजेचे आहे. मी प्रत्येक नागरिकाला विनंती करू इच्छितो की, त्यांनी आपल्या हुशार मुलांना सैन्यदलात सामील होण्यासाठी व आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित करावे”. ते म्हणतात की, ज्यांना तंत्रज्ञानाची आव्हाने आवडतात, त्यांनी नक्कीच नौदलात काम करावे, कारण इथेच सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. रजनीशजींची आई आता निवृत्त शिक्षिका आहे व ती त्यांच्यासोबत राहते. त्यांची पत्नी स्वप्नजा ही मुंबईची असून तिने मुंबई विद्यापीठातून कायद्यात मास्टर्स केले आहे. त्यांचा विवाह होण्यापूर्वी स्वप्नजा यांनी काही वर्षे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. त्या म्हणतात की, “नौदलाने त्यांच्या आयुष्याला आकार दिला. ३६ वर्षांच्या कालावधीत त्यांनी ३० हून अधिक घरे बदलली आहेत. प्रत्येक वेळा, प्रत्येक प्रसंगी नौदल त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभी होती. नौदलाचे जीवन कष्टमय व तडजोडीचे असले तरी, त्यांना खूप अभिमान व गर्व वाटतो, तसेच भरपूर मानसन्मानही आहेत.”
त्यांचा मुलगा स्वराज नौदल अधिकारी झाला आहे व त्याची पत्नी सना पत्रकार आहे. ती देखील नौदल अधिकाऱ्याची कन्या आहे.आता नुकतेच जुलै २०२४ मध्ये रजनीशजी निवृत्त झाले आहेत. त्यांना रेट्रो हिंदी संगीत ऐकायला आवडते, गाणीही म्हणायला आवडतात. तसेच त्यांना बिलियर्डस, यॅचिंग हाॅलीबाॅल व गोल्फ खेळायला आवडते. ४ डिसेंबर रोजी ‘नेव्ही डे’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा करायला मिळाल्या. आपले मार्गदर्शन तरुण पिढीला मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.