Monday, February 17, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलMachindra Kambli : अजरामर, मालवणी विनोदी रत्न

Machindra Kambli : अजरामर, मालवणी विनोदी रत्न

स्नेहधारा – पूनम राणे

प्रेक्षकांनी भरगच्च भरलेल्या सभागृहासमोर ८० वर्षांची आजी बसली होती. सुरुवातीची पाच मिनिटे तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते. मात्र थोड्या अवधीतच तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जोरजोरात हसत होती, टाळ्या वाजवत होती. अखेर प्रयोग संपला आणि ती आत कलाकारांना भेटायला गेली. डोक्यावरून हात फिरवत त्यांनी त्या कलाकाराची दृष्ट काढली आणि कलाकाराला वाकून नमस्कार केला. तेव्हा ते कलाकार म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही माझ्या आजी समान आहात ! आणि मला नमस्कार करता…!”

यावर आजी म्हणाल्या, ‘‘अहो मला तुमचं काम आवडलं, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऐकून मला माझ्या नवऱ्याची आठवण आली. तो तुमच्यासारखाच मला शिव्या घालायचा अस्सल मालवणीत आणि पुढे म्हणाली, ‘‘एकदा गारंबीचा बापू बघायला शिवाजी मंदिरला आले होते. नाटक संपल्यानंतर रस्ता ओलांडताना माझा नातू अपघातात मरण पावला. तेव्हापासून जे हसणं बंद झालं होतं ते आजपर्यंत.” त्यामुळे खरं सांगू, आज मी खूप मनमुराद, खळखळून हसले.

मुलांनो, कलावंत जन्माला यावा लागतो. तो आपल्या अभिनयानेच, असाच कलावंत हा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहत असतो. प्रेक्षकांना आनंद देत असतो. सुखाचे क्षण प्रेक्षकांच्या आयुष्याला देत असतो. त्यांच्या दुःखावर हलकेच फुंकर घालत असतो. अशाच एका रंगभूमीवरील विनोदी रत्नाची ही कथा.

विनोद, नावाच रसायन यांच्या नसानसात भिनलेले होते, जशी मालवणी हॉटेल आहेत. त्याचप्रकारे मालवणी भाषा प्रसिद्ध व्हावी, तिचा प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता जीवनात आलेल्या संघर्षावर मात करत, जिद्द आणि चिकाटीने नावारूपाला आलेले विनोदाचे बादशाह म्हणजे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी.

अनेकवेळा नाटकात नसलेल्या संवादाने प्रेक्षकगृहात हास्याचा धबधबा सुरू होई. आणि नेमके संवाद त्या नाटकात होते की, नाही हे प्रेक्षकांच्या मात्र लक्षातच यायचे नाहीत. कारण समयसुचकता हा विशेष गुण त्यांच्या ठाई भरलेला होता.
असाच एक प्रसंग घडला. वस्त्रहरणचा प्रयोग सुरू होता. एका खुर्चीतून दुसऱ्या खुर्चीकडे जात असताना समोरून प्रेक्षकांचा जोरजोरात, टाळ्यांचा आवाज व हसणे ऐकू येऊ लागले. म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं, तर धोतराचा कासोटा खुर्चीला अडकला होता. किंवा प्रसंगवधान राखून ते म्हणाले, ‘‘मी वस्त्रहरण करण्यापेक्षा माझेच वस्त्रहरण इथे झालेले आहे. विनोद व समयसूचकतेचा हा गुणविशेष त्यांच्या ठायी होता.

ते लहान असताना एकदा गावात नाटक होते. नाव देऊनही त्यांना नाटकात घेतले गेले नाही. तेव्हा आई म्हणाली, ‘‘तू मनाला लावून घेऊ नकोस. असेच कसोटीचे क्षण तुझ्या आयुष्यात येतील. प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा. जगाचा विचार करू नकोस.” आपला रुपया खणखणीत ठेव, जग तुझी कदर करेल.

मुलांनो, खरंच, आईचे शब्द तंतोतंत खरे ठरले. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे, मालिका चित्रपट, नाटकांमधून एकापेक्षा एक सरस भूमिका करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे, अजरामर असणारे मालवणी विनोदी रत्न म्हणजेच आपले मच्छिंद्र कांबळी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -