मृदुला घोडके
दिव्यांग शब्द ऐकला की, ‘अरेरे’ किंवा ‘बिचारे’ किंवा ‘कुठल्या तरी जन्माची शिक्षा’असे विविध उद्गार ऐकायला मिळतात. मनात दया, करुणा असे भाव जागृत होतात. त्या दयेपोटी एखाद्या संस्थेला थोडी फार देणगी दिली जाते. कदाचित आपण काही तरी करावं म्हणून सेवेचा हात पुढे केला जातो. याच भावनेनं मी सुरुवातीला दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यात कार्यरत संस्थांशी संपर्क साधला. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशा निश्चयाने मी झपाटून गेले. पण लवकरच माझा हा निश्चय डळमळू लागला. दिव्यांग व्यक्तींना करुणेपेक्षा समवेदनेची गरज जास्त आहे असं जाणवलं. मी जशी जशी त्यांच्या सहवासात रमायला लागले तसतशी त्यांची जिद्द, आत्मसन्मान, चिकाटी आणि मनाची ताकत तीव्रतेने जाणवू लागले.
दिव्यांगता अनेक प्रकारच्या आहेत. त्यापैकी मी तीन प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींच्या जास्त संपर्कात आहे. दिल्लीत माझ्या एका मैत्रिणीची मुलगी डाऊन सिंड्रोमने ग्रस्त आहे. अशा प्रकारच्या दिव्यांग स्थितीमध्ये कोणाचाच दोष नाही. आपल्यामध्ये असलेल्या रंगसूत्राच्या २३ जोड्यांऐवजी त्यांच्यामध्ये एक जोडी जास्त असते. ही मुलं विशिष्ट चेहरा, डोळे आणि अवयव घेऊन जन्माला येतात. गतिमंद असतात. पण त्यांची मुलगी देवांशी एका मॉलमध्ये छान काम करत आहे आपल्या सर्व उणिवांसह. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मी रोटरी क्लबतर्फे अशा दिव्यांग मुलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. तो दिवस त्यांनी सादर केलेले कार्यक्रम, त्यांच्या पोहण्याच्या किंवा चित्रकलेच्या स्पर्धा यामध्ये अतिशय उत्साहात, आनंदात, समाधानात जातो. अर्थात, महिन्यातून एक-दोन वेळा त्यांच्यासाठी काहीतरी करून समाधान मिळवणं सोपं आहे. त्यांच्याबरोबर २४ तास राहून समाधानी राहणं एक सत्त्वपरीक्षा आहे.
डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या “उन्मेष” या संस्थेच्या संचालक, जयंती गाडगीळ यांची एकदा रेडिओसाठी मुलाखत घेतली. तेव्हा त्या भरभरून बोलत होत्या. त्यांचा धाकटा मुलगा मल्हार हा डाऊन सिंड्रोमग्रस्त आहे. त्या सांगतात की, या मुलांबरोबर रोजचा दिवस एक आव्हान आहे. यांची शारीरिक वाढ उशिरा होत असते. त्यांना गती मंद म्हणता येईल. जन्मतःच अशा मुलांना अनेक व्याधी असतात. काहींना हृदयाचा त्रास असतो तर काहींना किडनीची समस्या, काहीजण हार्मोनल इश्यू तर काही जण थायरॉईडने ग्रस्त. त्यामुळे एका पालकाला पूर्ण वेळ त्यांच्यासाठी द्यावा लागतो. अशावेळी करिअर वगैरे बाजूला ठेवावे लागते. कुटुंबावर आर्थिक बोजा वाढत जातो. त्यांच्यावरील उपचारही खर्चिक आहेत. सपोर्ट थेरपी अतिशय महाग आहे. सरकारी रुग्णालयातून विकलांगता प्रमाणपत्र मिळण्यासही उशीर होतो. कारण काही चाचण्या ठरावीक वयातच होतात. त्यामुळे त्या आधी काही गंभीर शारीरिक आजार उद्भवला तर विम्याचे पैसे मिळत नाहीत. सामान्य माणसाप्रमाणे त्यांचा विमा उतरवता येत नाही.
शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश सोपा नाही आणि तो दिला तरी त्यांना सामान्य मुलांप्रमाणे स्वीकारलं जात नाही. सरकारने शिक्षणाचा हक्क सर्वांना दिला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्यरीतीने होत नाही, अशी खंत जयंती गाडगीळ यांनी बोलून दाखवली. अशा मुलांबाबत सामाजिक जागरूकता तर फारच कमी आहे. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कठीण होतो. लोक विचित्र नजरेने पाहतात किंवा त्या मुलांना सरळ ‘वेडा’ ठरवून मोकळे होतात. शून्य संवेदनशीलता. सरकारने अनेक योजना सुरू केल्या असल्या तरी त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणं, त्यांचं पुनर्वसन आणि विशेष म्हणजे त्यांच्या पालकांनंतर त्यांची काळजी घेण्याची व्यवस्था या संदर्भात बरंच काही करणं बाकी आहे. “उन्मेष” संस्था त्यांच्या पुनर्वसनासाठी बरेच प्रयत्न करत आहे. अशा मुलांनी बनवलेल्या शोभेच्या वस्तू प्रदर्शनात विक्रीला मांडून त्यांना व्यस्त ठेवण्याचे तसेच स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न अशा अनेक संस्था करत आहेत.
पुण्याच्या ब्लाइंड मॅन असोसिएशनचे रोजगार प्रमुख तुषार जगताप यांच्याशी, दृष्टीबाधित व्यक्तींचा क्रिकेट सामना आयोजित करण्याबाबत माझी चर्चा चालू होती. त्यावेळी तुषार जगताप यांच्या बोलण्यातून ह्या लोकांविषयी मोठी कळकळ जाणवली. तुषार म्हणाले की, आपल्या पोटी अंध मूल जन्माला आलं आहे हे आई – वडील स्वीकारूच शकत नाहीत. तिथूनच त्यांची उपेक्षा सुरू होते. पूर्ण दुनिया अंधाराची असल्याने प्रकाश त्यांना माहितीच नाही. अलीकडच्या काळात दृष्टी बाधित व्यक्तींसाठी अनेक सुविधा ब्रेल लिपीत आणि श्राव्य माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्या तरी उच्च शिक्षणावर मर्यादा येतात. काही ठरावीक शाखेचे विषय निवडावे लागतात. विज्ञान प्रयोग करता येत नाहीत. ग्रामीण भागातून आलेल्या अशा लोकांना शहरात नोकरी मिळाली, तर राहण्याची समस्या येते. केवळ त्यांच्यासाठी वसतिगृह उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागी त्यांना सहज वावरता येत नाही कारण अजून तरी आपल्याकडे सर्वत्र ब्रेल मार्किंग नाही. मात्र नेत्रहीन असले तरी संवेदनाहीन नाहीत हे.
नियतीने अंधार दाखवला तरी त्या अंधारात ते आपली सुंदर दुनिया साकार करतात. गायन आणि वादन या क्षेत्रात त्यांची कामगिरी सर्वश्रुत आहे. दृष्टीबाधित असलेल्या काही संगीतकारांच्या सुंदर काव्य गीतरचना आपण सर्वच गुणगुणतो. तसेच ही मुले क्रीडा स्पर्धेतील खेळ लीलया खेळतात. त्यांचाच क्रिकेट सामना आयोजित करण्याचा माझा प्रयत्न मी तुषार जगताप यांच्या मदतीने करत असल्याचं मी सांगितलंच आहे. अनेक जोडपी विवाहबद्ध होऊन सुखाने संसार करत आहेत. केडगावच्या रमाबाई मुक्ती मिशनमध्ये राहणाऱ्या दृष्टिबाधित महिला ज्या शिताफीने चूल पेटवून आपला स्वयंपाक करतात, सफाईने वेताच्या खुर्च्या, टोपल्या डिझाईन तयार करून विणतात ते बघून मी थक्क झाले. ह्या लोकांचा स्पर्श, ज्ञान अफाट आहे. श्रवण शक्ती तल्लख आहे. मला आठवतं… एकदा एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी मी दिल्लीहून पुण्याला आले होते. त्यावेळी सूत्रसंचालन करत असताना एका दृष्टीबाधित काकूंनी आपण मृदुला घोडके का? दिल्ली आकाशवाणीवरून इथे कधी आलात असं विचारलं होतं. मी अवाक् झाले होते.
कर्णबधिर मुलांचा क्लब स्थापन करण्यासाठी मी पुण्याच्या महाराष्ट्र फेलोशिप फॉर डेफ शाळेत गेले. गेली ३० वर्षे कर्णबधिर लोकांसाठी काम करणाऱ्या त्या शाळेच्या उपसंचालिका तारा मेश्रामकर यांनी मला टोकलं. माझ्या तोंडून सतत मूकबधिर शब्द ऐकून त्या म्हणाल्या, अहो, कुठल्याच आवाजाशी त्यांचं नातं नसल्यामुळे ही मुलं बोलू शकत नाहीत. ही काही जन्माने मुकी नाहीत बधिर आहेत. त्यावेळी त्यातला बारकावा मला समजला आणि माझी सर्वसाधारण विचार करण्याची चूकही समजली. अशा लोकांना वावरण्याच्या, खेळण्याच्या मोठ्या मर्यादा येत नसल्या तरी शिक्षण आणि नोकरीच्या मर्यादा येतातच. त्यांच्याशी सांकेतिक भाषेत अनुवाद करावा लागतो. कारण आवाज काय आहे हेच माहिती नसल्यामुळे मेंदूमध्ये कुठल्याही गोष्टी तोंडी शिकवण्याची नोंद होत नाही. या मुलांचा विश्वास संपादन करणं कठीण आहे. पण एकदा का त्यांना भरवसा वाटला की, मग त्यांना शिकण्यात स्वारस्य वाटू लागतं. आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली यावरून ही मुलं कुठली तरी कला किंवा कौशल्य आत्मसात करू शकतात. आयुष्याचा ताल चुकलेली ही मुलं, ऐकू न येणाऱ्या संगीताच्या तालावर मात्र सुंदर पदन्यास करतात.
कर्णबधिर लोकांना व्यवसाय सुरू करता यावा म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सरकारची योजना आहे, असं तारा मेश्रामकर यांनी सांगितलं. पण अजून बरंच काही करायचं आहे. कर्णबधिर लोकांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांना सर्वप्रकारे उत्तेजन देणे आवश्यक आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आपण जागतिक दिव्यांग दिन पाळतो. अनेक कार्यक्रम आयोजित करतो. जोशपूर्ण वक्तव्य करतो… आणि हा जोश लवकरच मावळतो. मावळू दे… कारण अशी अनेक उदाहरणं आहेत… जिथे ही लटपटणारी जीवनं आता स्थिरावत आहेत. अशी अनेक तेजोमय उदाहरणं आहेत की, त्यांनी आपल्या व्यंगांवर मात करून आयुष्याला ठणकावून उत्तर दिलं आहे. खरं तर ही आपल्या सारखीच माणसं आहेत पण वेगळी बुद्धिमत्ता असलेली. एखाद्या पक्षाप्रमाणे आहेत… जितकं बळ आहे त्यांच्या पंखात तेवढी भरारी घेऊ द्यात त्यांना… त्यांच्यासाठी आकाश निर्माण करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला घेता येईल का?