Friday, January 17, 2025
Homeसाप्ताहिककोलाजएचआयव्ही रुग्णांसाठी एक हात मदतीचा

एचआयव्ही रुग्णांसाठी एक हात मदतीचा

आज जागतिक एड्स दिनानिमित्त आपण सर्वांनी या आजाराला कसे प्रतिबंध करता येईल तसेच निराश न होता यातून उपचार घेऊन व सकारात्मक दृष्टिकोन चांगला ठेवून या आजारातून चांगले आयुष्य कसे जगता येईल, याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे.

डॉ. राजश्री दयानंद कटके

जगामध्ये आता सध्या ३९.९ मिलियन एड्सग्रस्त लोक आहेत. जगामध्ये ही लोकं २०२३ पर्यंत जगत आहेत. एचआयव्ही हा रोग ह्युमन डेफिशियन्सी वायरस यामुळे होतो. यामध्ये ज्या पेशंटला हा रोग झालेला आहे व ज्या पेशंटला हे इन्फेक्शन झालेले आहे त्याच्या रोगप्रतिकारशक्तीवर हा व्हायरस आघात करतो. त्यामुळे हळूहळू रोगप्रतिकारशक्ती ही कमी होऊ लागते आणि बरीच इन्फेक्शन्स व जंतुसंसर्ग या आजारात या रुग्णांना होतो. हा आजार मुख्यतः एचआयव्ही या इन्फेक्शनने ग्रस्त झालेल्या रोगांच्या रक्त किंवा शरीरातले द्रव्य यांच्याशी जर एखाद्या व्यक्तीचा संपर्क आला आणि त्यांचे विषाणूंनी जर एखाद्या निरोगी माणसांमध्ये शिरकाव केले तर मग त्याला याचा आजार होतो. हा आजार असुरक्षितपणे लैंगिक संबंधातून केल्यास एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीकडून एखाद्या निरोगी व्यक्तीला होतो. तसेच हा आजार एचआयव्हीग्रस्त आईकडून तिच्या बाळाला पण होऊ शकतो. हा आजार एचआयव्हीग्रस्त माणसाचे रक्त जर एखाद्या चांगल्या निरोगी माणसाला देण्यात आले तर हा आजार त्या व्यक्तीला होतो किंवा कधी कधी तरुण वर्गामध्ये ड्रग्स होण्याचे प्रमाण वाढते. एका एचआयव्ही ग्रस्त एड्स झालेल्या व्यक्तीची सुई ही जर दुसऱ्याच्या शरीरामध्ये त्याच सुईने जर ड्रग्स किंवा इंजेक्शन देण्यात आले तर याचा संसर्ग वाढतो. तसेच बऱ्याच ठिकाणी एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या शरीरातली वेगळीवेगळी द्रव्य जसे की, रक्त, वीर्य अशा या संबंधातून या विषाणूचा शरीरामध्ये शिरकाव होतो. जेव्हा हा शिरकाव शरीरामध्ये होतो तेव्हा त्याची लागण होते. जी निरोगी व्यक्ती आहे व त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे तसेच ज्याची इम्युनिटी चांगली आहे त्यांना हा आजार झाला तरी ती व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने उपचार घेऊन त्यातून बरी होते. काही व्यक्ती ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली नाही अशा व्यक्तींच्या संपूर्ण शरीरामध्ये एचआयव्हीचा फायदा होऊन एक सिंड्रोम तयार होतो, त्याला आपण (एड्स) अक्वायर्ड इम्मयुनो डेफिशयन्सी सिंड्रोम म्हणतात. एड्सग्रस्त रुग्णाला फुप्फुसाचे इन्फेक्शन, निमोनिया होणे, बॉडीमध्ये इतर ठिकाणी इन्फेक्शन होणे, हाडांमध्ये इन्फेक्शन होणे या गोष्टी होत राहतात.

आपण याची लक्षणे पाहूयात…
सतत ताप येणे, शरीरात इन्फेक्शनचा शिरकाव होणे, वजन कमी होणे तसेच हा ताप येणे. अशा व्यक्ती उपचारांनाही प्रतिसाद देत नाहीत. तेव्हा अशा रुग्णांची जर आपण एचआयव्हीची टेस्ट केली व त्यांच्यामध्ये आपल्याला ती पॉझिटिव्ह आली तर त्याला एचआयव्ही इन्फेक्शन होते. याचे निदान एलायजा टेस्ट आणि वेस्टर्नब्लाट टेस्ट यांनी केले जाते. त्यानंतर जेव्हा इन्फेक्शन वाढते तेव्हा त्यातील पांढऱ्या रक्त पेशीचे प्रमाण कमी होत जाते.

आता आपण बघूया आईपासून मुलाला हा आजार कसा पसरतो???

गर्भ जेव्हा गरोदरपणामध्ये आईच्या पोटामध्ये गर्भाशयात वाढत राहतो, तेव्हा आई जर एचआयव्ही इन्फेक्शन या आजाराने ग्रस्त असेल, तर ते विषाणू त्या बाळापर्यंत रक्तातून पोहोचले जातात व कधी कधी डिलिव्हरीमध्ये जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा हे जंतू बाळाच्या नाकात किंवा डोळ्यांत योनी मार्गांमधून पण जातात. मग त्यानंतर आपण बाळाची टेस्ट करून आपण त्याची लागण झाली का नाही याचे निदान करू शकतो. नॅशनल एड्स कंट्रोल ऑफ इंडिया नॅको यांनी खूप चांगल्या पद्धतीने एड्स कंट्रोल करण्याचे जे काही प्रोग्राम आतापर्यंत घेतले, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हा आजार आता कंट्रोलमध्ये आलेला आहे. महाराष्ट्र मुंबई एमडॅक आणि एमसॅक या दोन्ही सोसायटी महाराष्ट्रात एड्स नियंत्रणासाठी काम करतात. पंधरा वर्षांपूर्वीची जर परिस्थिती बघितली तर त्यावेळेस खूप घाबरल्यासारखी परिस्थिती होती. पण त्यानंतर हळूहळू समाजामध्ये याबद्दल जागृती निर्माण झाली. एचआयव्हीची टेस्ट ही गरोदर स्त्रियांमध्ये आपण प्रीटेस्ट कॉन्सिलिंग करतो. त्यानंतर जेव्हा ती पॉझिटिव्ह येते तेव्हा परत पोस्ट टेस्ट कौन्सिल करतो. टेस्ट झाल्यानंतर त्यांना समजावून सांगतो. त्यातले धोके समजावून सांगतो, त्यांना धीर देतो, कॉन्सिलिंग करतो आणि आपण योग्य ती ट्रीटमेंट त्यांना गरोदरपणामध्ये देतो. डिलिव्हरीच्या अगोदर पण एड्स प्रतिबंधक औषध देतो. त्यामुळे मातेकडून होणाऱ्या बाळासाठी जो संसर्ग आहे तो कमी प्रमाणात होतो.

डिलिव्हरी करताना विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे :
रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी या सगळ्यांनाही हा संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही युनिवर्सल प्रिकॉशन्स घेतो. म्हणजे ज्यामध्ये डोक्यावर कॅप घालणे, डोळ्यांवर गॉगल, गाऊन घालणे, डबल ग्लोव्हज घालून त्यांची डिलिव्हरी किंवा सिजेरियन सेक्शन आपण करतो. या रुग्णांना उपचार देताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच जेव्हा आपण त्यांच्यावर उपचार करतो तेव्हा चुकूनही आपल्याला कुठली नीडल प्रिक किंवा जखम होणे हे धोक्याचे असते पण कधी कधी जर समजा असे झाले, तर तत्काळ आपण एचआयव्हीचे औषध तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून घेण्यात यावे आणि स्वतःच्या टेस्ट पण करून घेण्यात याव्यात.

आपण घरच्यांची आणि स्वत:ची कशी काळजी घेतली पाहिजे :
एचआयव्हीचे रुग्ण व त्यांच्या शरीरातली लघवी, रक्तद्रव्य यांचा डायरेक्ट संबंध निरोगी मानसाच्या शरीरातील जखमेशी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पण समाजामध्ये याबद्दल खूप गैरसमज आहेत. जसे की, एड्सग्रस्त व्यक्तींबद्दल या व्यक्तीला हात मिळवू नये, शेख हँड करू नये, त्यांना आलिंगन देऊ नये, त्याचबरोबर जेवण करू नये, काम करू नये हे सगळे गैरसमज आहेत. यातून कधीही एड्स होऊ शकत नाही. त्यामुळे असा गैरसमज करून नैतिकतेने व कायद्याच्या दृष्टिकोनातून एड्सग्रस्त रुग्णांना आयसोलेट करू नये. कोणाला जर एचआयव्हीचा संसर्ग असेल तर त्यांना आपण समजून घेतले पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे. जगामध्ये आता खूप यावर संशोधन झालेले आहे. चांगल्या टेस्ट उपलब्ध आहेत. निदान करण्यासाठी खूप चांगली औषधे आता जगात उपलब्ध आहेत. फर्स्ट लाइन ऑफ ट्रीटमेंट, सेकंड लाइन ऑफ ट्रीटमेंट अशा बऱ्याच आधुनिक उपचारांची सुविधा ही चांगल्या सरकारी रुग्णालयात पण उपलब्ध आहे. त्यामुळे आज आपण पाहतो की, जगामध्ये याबद्दलची खूप जागृती निर्माण झाल्याने लोक स्वतःची काळजी घेतात. सुरक्षित संभोग करतात आणि निरोधचा वापर सुद्धा करतात. तरुण वर्गातील लोकांनी कधीही असुरक्षित संभोग न करता निरोधचा वापर करणे हे योग्य ठरेल. त्यानंतर कधीपण एकाच सुईने ड्रग्स घेणे किंवा गोंदवून घेणे हे पण एचआयव्हीचा संसर्ग होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

म्हणून नेहमी स्वतःची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. चुकून जर असे काही आयुष्यात घडले असेल तर घाबरून जाऊ नका. तज्ज्ञांकडे जा. स्वतःची तपासणी करून घ्या आणि योग्य ते उपचार करून घ्या. आज एचआयव्हीग्रस्त रुग्ण आपले आयुष्य पण चांगल्या पद्धतीने जगतात. जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि योग्य व्यायाम, समतोल आहार, आहारात प्रोटीनचे प्रमाण, फळे, पालेभाज्या, दूध, अंडी या सगळ्यांचा समावेश केला व योग्य ती औषधे घेतली तर आपण एचआयव्हीग्रस्त रुग्ण सुद्धा चांगल्या पद्धतीने यातून बाहेर पडू आणि चांगले आयुष्य जगू शकतो. बऱ्याच जणांनी स्वतः एचआयव्हीतून बाहेर पडलेल्या रुग्णांनी समाजामध्ये एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी मदत केल्याची बरीच उदाहरणे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे एचआयव्हीग्रस्त रुग्णांना एक चांगला आधार दिसतो व आशा निर्माण होते. आज जागतिक एड्स दिनानिमित्त आपण सर्वांनी माहिती घेऊया की, या आजाराला आपण कसे प्रतिबंध करता येईल तसेच निराश न होता यातून उपचार घेऊन व सकारात्मक दृष्टिकोन चांगला ठेवून या आजारातून चांगले आयुष्य कसे जगता येईल याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. लस तयार करण्यासाठी यावर संशोधन चालू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -