सतीश पाटणकर
श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी ही महाराष्ट्रातील सर्व हिंदू – मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची कुलदेवता आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते. अर्थात रामवरदायिनीची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केली अशी श्रीरामवरदायिनीची आख्यायिका एकनाथ महाराजांनी आपल्या भावार्थरामायणातील अरण्यकांड भागात आणि पुढे श्रीधरस्वामींनी आपल्या रामविजय ग्रंथात कथन केली आहे. या देवीच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. प्रभू रामचंद्र वनवासात सीतामाईचा शोध घेत असताना पार्वती देवीने सीतेचे रूप घेऊन आपणच सीतामाई आहोत असे रामचंद्रांना सांगितल़े त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी पार्वतीदेवीला ओळखल़े प्रभू रामांना वर दिला म्हणून या देवीला श्रीरामवरदायिनी म्हणतात, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तसेच इ.स.१५१० ते १५१२ च्या दरम्यान रामाजीराव शिंदे हे कोकणात स्वारीवर आले होत़े. त्यावेळी एका साधू पुरुष नेत्यांना देवीची मूर्ती आपल्या झोळीतून काढून दिली आणि या देवीला कुलस्वामिनी मान, तुला यश मिळेल असे सांगितल़े त्याप्रमाणे स्वारीत यश मिळाल्यानंतर शिंदे, कदम सरदारांनी दादर गावी देवीची स्थापना केली असाही देवीचा इतिहास सांगण्यात येतो़
शिवपूर्व काळापासून या देवतेला ऐतिहासिक महत्त्व असून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून दादर येथे देवीचे भव्य व आकर्षक मंदिर उभारण्यात आले आहे. श्रीरामवरदायिनी देवी शिंदे आणि कदम कुटुंबीयांची कुलस्वामिनी आह़े शिवपूर्व काळापासून या देवतेला ऐतिहासिक महत्त्व असून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून दादर येथे देवीचे भव्य व आकर्षक मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रीरामवरदायिनी, श्रीवाघजाई व श्रीमहिषासुरमर्दिनी यांच्या जयपूरहून आणलेल्या मूर्ती खास वैशिष्ट्य आहेत़ या व्यतिरिक्त त्या ठिकाणी श्रीगणेश, साईबाबा या देवतांचेही दर्शन भाविकांना घडत़े मंदिराचे रंगकाम उत्कृष्ट असून रात्रीच्या वेळी तेथील विद्युत रोषणाई आकर्षक असत़े या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे १३ खांब, प्रवेशद्वारावर १३ भाले, १३ छोटी प्रवेशद्वारे आणि १३ घुमट असे १३ गावांतील मानकरी यातून प्रथित होतात. दादर, कळकवणे, मोरवणे, टेरव, तिवरे, पेढांबे, कोळकेवाडी, नांदिवसे, स्वयंदेव, ओवळी, अडरे, रिक्टोली, आकले या गावांना दसपटी म्हणून ओळखले जाते. येथील बाराराव कोळ्यांची जुलमी सत्ता उलथून शिंदे व कदम सरदारांनी आपले प्रस्थ निर्माण केले. तीच दसपटी होय. कुलाचार दसपटीची पूरातन मुद्रा दसपटीच्या मुद्रेत दशमांकित फणिधर नाग असून ते शेषवंशी शिंदे घराण्याचे प्रतीक आहे. आजही शिंदे घराण्यातील देव्हाऱ्यात नागाची पूजा केली जाते.
ज्योती व सूर्य हे ज्योतिबा कुलदेवताचे प्रतीक मानले गेले आहेत. तलवार हे क्षात्रतेज दर्शक धर्म संरक्षक प्रतीक असून ॐ हे मित्याक्षर परब्रह्म आहे, तर ध्वजस्तंभी सूर्य व नाग आहेत. ही सर्व उद्योन्मुख पराक्रमी संस्कृतीची प्रतीके मानली जातात. सप्तसिंधूतील आर्य संस्कृतीत ही चिन्हे प्रामुख्याने आढळून येतात. श्रीरामवरदायिनीचे आसन अश्व हे असून ते नागवंशी शिंदे घराण्याचे प्रतीक आहे. श्रीरामवरदायिनी मंदिराच्या आवारात प्रवेश करताच १२ ज्योतिर्लिगांचे दर्शन घडते. श्रीरामवरदायिनी या देवीचे मूळस्थान हे मौजे पारसोंड, महाबळेश्वर तालुका, जिल्हा सातारा येथे आहे. या देवीची इतर स्थाने खालीलप्रमाणे- जय रघुवीर रामवरदायिनी देवी, शिरगाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, श्रीरामवरदायिनी, (दसपटी) दादर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, श्रीवर्धनीदेवी, वर्धनगड, तालुका खटाव, जिल्हा सातारा, कालगाव(चिंचणी), तालुका कऱ्हाड, जिल्हा सातारा, रामवरदायिनी, खर्शी, तालुका जावळी, जिल्हा सातारा, वर्धनीदेवी, चिंचणी, तालुका जावळी जिल्हा सातारा, भवनीमाता, प्रतापगड, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा, वरदायिनी (कोळ दुर्ग किल्ला – मेट) पारघाट, तालुका महाबळेश्वर. जिल्हा सातारा, कापडे, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. श्रावण मासातही या ठिकाणी भाविकांची गर्दी असत़े देवीची चैत्र पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते. हजारो भाविक या निमित्ताने देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात़. नवरात्रोत्सवात या देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात़ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात़े.