एकदा मोठी गंमत झाली
जादूगाराने जादू केली
जादूने मी हादरून गेलो
गुडघ्याएवढा बुटका झालो
रस्त्यात भेटली शाळेतली मुलं
म्हणाली बघा आलंय खुळं
खो-खो सारखी हसत सुटली
म्हणाली याची पाटी फुटली
घरी आलो मी रडत रडत
कडी वाजवली उड्या मारत
‘‘आई म्हणाली, काय झालं?”
तिलाही पटकन रडूच आलं
तिनं घेतलं मला जवळ
जादूने लगेच काढला पळ
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) तो भाऊ, ती बहीण
ते पुस्तक, ते फूल
तो कोळी, ती कोळीण
ते झाड, ते मूल
हा, ही, हे, जो, जी, जे
मी, तू, त्या, तो, ती, ते
नामाऐवजी हे वापरतात
याला काय म्हणती बरे ?
२) मांजराचे नाव ऐकताच
तो होई घामाघूम
मांजर समोर येताच
तो बिळात ठोके धूम
गणरायाच्या समोर मात्र
फारच खाई भाव
या मुषकाचे सांगा
घराघरातले नाव ?
३) एक सूर्य
आठ ग्रह
त्या ग्रहांचे
येती उपग्रह
खूप लघुग्रह
अनेक धूमकेतू
या साऱ्यांच्या समूहास
काय म्हणणार तू?
उत्तर –
१) सर्वनाम
२) उंदीर
३) सूर्यमाला