क्राइम – अॅड. रिया करंजकर
फसवणूक म्हटले की, ती अनेक प्रकारची असते. आर्थिक फसवणूक असते, कौटुंबिक असते किंवा नात्यातली फसवणूक असते. नात्यांमध्ये फसवणूक होण्याचे प्रकरण वाढलेले आहेत. याचा परिणाम नात्यावर होत असल्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
आफ्रिन ही घटस्फोटित स्त्री होती. पहिल्या नवऱ्यापासून तिचा घटस्फोट झाला होता. कारण तो त्याच्या कुटुंबाची जबाबदारीच घ्यायला तयार नव्हता आणि कोणताही कामधंदाही करत नव्हता. आफ्रिन एकटी कमवत होती आणि तिच्या जीवावर तो जगत होता. त्यांच्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले आणि शेवटी आफ्रिनने पहिल्या नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
आफ्रिन ही कॉल सेंटरमध्ये कामाला होती. तिला अनेक लोकांशी बोलावं लागत होतं. यातूनच तिची ओळख संदीप या मराठी मुलाशी झाली. ही ओळख मैत्रीमध्ये रूपांतरित झाली. आफ्रिनने आपल्या आयुष्याबद्दल त्याला सर्व काही खरं सांगितलं होतं आणि त्यालाही ते सर्व मान्य होतं. म्हणून संदीप आफ्रिनच्या आईला येऊन भेटला आणि आपण तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. संदीप चांगल्या ठिकाणी नोकरीला होता. आफ्रिनच्या घरी येऊन राहत असल्यामुळे आफ्रिनच्या आईने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला.
संदीप म्हणाला की, घाई कशाला व्यवस्थित लग्न करू. लोकं विचारत असतील तर तू गळ्यात मंगळसूत्र घाल आणि कुंकू लाव असेही त्याने सांगितले. संदीपने सांगितल्यामुळे ती पत्नीसारखी राहू लागली. एवढेच नाही, तर हिंदू सणवारही ती करू लागली. यात तिला दिवस गेले. आपल्याला लग्न करेपर्यंत बाळ नको असे संदीप बोलू लागला आणि सहाव्या महिन्यांत त्यानेच काहीतरी औषध देऊन ते मूल पाडायला सांगितले. घरातल्या घरात ही गोष्ट झाल्यामुळे ती तिथेच दाबली गेली. आफ्रिनचा संदीपवर स्वतःपेक्षाही विश्वास होता. तो करेल ते योग्यच करेल असे ती आपल्या आईला सांगत असे. पुन्हा एकदा तिला दिवस गेले आणि त्यावेळेस तिला असे समजले की, गावाकडे संदीपचे लग्न ठरले असल्यामुळे तो काही दिवसांत लग्न करणार असल्यामुळे आफ्रिनने इन्स्टाग्रामवरून त्या मुलीचा शोध घेतला. त्या मुलीला व्हीडिओ कॉल करून आपण त्याच्यासोबत राहत असल्याचे सांगितले. हे समजल्यावर त्या मुलीने संदीपशी लग्न मोडले.
संदीपच्या घरातील सर्व लोकांना आफ्रिनचे आणि संदीपचे असलेले संबंध माहिती होते. संदीपची आई तिला बोलू लागली की, तुला जर आम्ही घरात घेतले, तर आम्हाला गावातील लोक पाणीसुद्धा देणार नाहीत. संदीप सांगत होता की, मी घरातल्या लोकांसाठी करतोय माझा नाईलाज आहे. परत संदीपला मुलगी बघितली गेली. ही गोष्ट आफ्रिनला समजताच आफ्रिनने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.कारण ती एवढी वर्षे त्याच्यासोबत राहिली होती. एवढेच नाही, तर तिचे पहिले मूलही गेले होते आणि परत ती गरोदर असताना तो एका दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता. पोलिसांना तिने झालेली सर्व घटना सांगितली होती. संदीप मुंबई सोडून फरार झाला होता. तो तिला वेगवेगळ्या नंबरवरून भेटायला बोलवत होता पण आफ्रिन त्याला भेटण्यास नकार देत होती. आफ्रिनच्या मनात भीती होती की, त्याने तिला परत काही तरी पाजलं तर मुलाला याचा धोका निर्माण होऊ शकतो. तिला हळूहळू समजू लागले होते की, अशा अनेक घटना समाजात घडत असतात. संदीपसारखे अनेक मुलं-मुलींचा गैरफायदा घेऊन त्यांना फसविण्याचा प्रयत्न करतात. संदीपनेही आफ्रिनसोबत तसेच केले होते. संदीपचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध होते. याच्यामध्ये अनेक घटस्फोटित महिलाही होत्या. संदीप महिलांना, मुलींना पटवण्यात आणि फसवण्यात पटाईत होता हे तिला समजले होते. आफ्रिनला आता न्याय हवा होता आणि तोही आपल्या पोटातल्या बाळासाठी. पहिल्या मुलाचा संदीपने बळी घेतला होता.
त्यामुळे आफ्रिनला संदीपला धडा शिकवायचा होता की जेणेकरून पुढे तो कुठल्याही मुलीला किंवा महिलेला फसवू नये.
आफ्रिन आज पश्चाताप करत होती. कारण पहिला नवरा त्रास देत असल्यामुळे त्या त्रासातून ती बाहेर पडली आणि संदीपच्या प्रेमात पडून आयुष्य पुन्हा एकदा बरबाद करून बसली. आपण नको त्या माणसावर विश्वास ठेवला यावरच तिचा विश्वास बसत नव्हता. आपली खरोखरच घोर फसवणूक झाली आहे. याची जाणीव तिला फार उशिरा झाली. पोलीस संदीपचा अजूनही तपास करत आहेत पण तो त्यांच्या अजूनही हाती लागलेला नाही. घटस्फोटित महिला अगोदरच आपल्या दुःखामध्ये असतात आणि त्यांना सहानुभूती देण्याच्या नादात अनेक तरुण त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचा गैरफायदा घेतात. असे अनेक प्रकार समाजात घडत आहेत.
(सत्यघटनेवर आधारित)