Friday, June 13, 2025

घडीभर जरा थांबशील का...

घडीभर जरा थांबशील का...

हलकं-फुलकं - राजश्री वटे


आई, अगं बघ ना, नाही जमत आहे मला साडीची घडी तुझ्यासारखी नीट...
दहावीच्या फेअरवेलसाठी आईच्या नवीन साडीची घडी तिने आज मोडली होती, आईने कुंकू लाऊन तिच्या हाती दिली नेसायला कौतुकाने! आईचं कपाट म्हणजे परफेक्शन... सर्व कपडे नीट, एकावर एक घडी करून ठेवलेले... ना इकडे ना तिकडे... साड्यांच्या घड्यांवरून आपुलकीचा हात फिरत असतो तिचा अधूनमधून!


लग्नातल्या पैठणीच्या घडीतून येणारा अत्तराचा सुगंध दरवळत जातो आतपर्यंत हृदयात... तिच्याच व जुन्या आठवणी सुगंधित होऊन तरंगत राहतात मनाच्या हिंदोळ्यावर!


तव्यावरची तिच्या हातची घडीची मऊसूत पोळी खाण्याचे सुख काही वेगळंच... आणि सणासुदीला चिरोट्याचे एक एक पापुद्रा उलगडत जातो जेव्हा घड्यांवर घड्या घालून लाटलेले... खुसखुशीत... घड्यांचेच कसब हे!
शाळेत जाताना परीटघडीचा गणवेश रुबाब वाढवतो, आत्मविश्वासही वाढल्यासारखा भासतो... कॉलर कडक!!
गणवेशावरून आठवलं, शाळेत एकदा पेपरच्या अनेक प्रकारे घड्या करून सुंदर कलाकृती बनवणे, ज्याला जॅपनीज ऍरोगामी असं म्हणतात, ते शिकवले जात, नुसत्या घड्यांमधून साकार होऊ शकतं अशी ही कला... वर्गात शिकवताना


शिक्षकांचा नेहमीचा फंडा... ‘हाताची घडी तोंडावर बोट’!!
पोरवयात मैत्रिणींची घडीभर सोबत सुद्धा बरंच काही देऊन जाते...
स्वप्नाळू वय हळुवार गुणगुणतं... ‘घडी घडी मेरा दिल धडके...’
प्रेमात जवळीक वाढते तेव्हा... ‘दो घडी वो जो पास आ बैठे.’
संसाराची स्वप्न साकार होऊ लागतात तेव्हा...
‘जीवनात ही घडी अशीच राहू दे...’
ती हल्ली दमते कामानं...


घडीभर विश्रांती हवी असते तिला... पण घर आवरणं, वाचून घरभर पसरलेलं वर्तमानपत्र घडी करून जागेवर ठेवलंच पाहिजे... ही स्वतःचीच शिस्त!
थकलेल्या आयुष्याला घडीभर कोणाशी तरी बोलावेसे वाटते... मन मोकळे करावेसे वाटते...
पण...
जमाना बदल रहा है...
जब घडी किसी के पास नही थी,
वक्त सबके पास था...
आज घडी सबके पास है,
पर वक्त किसी के पास नही...!!
घडीभराचं आयुष्य हे!
घडीभर जगून घेऊ आनंदाने!!

Comments
Add Comment