लता गुठे
काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती दूध पिते ही अफवा सर्वदूर पसरली आणि जो तो गणपतीच्या मूर्तीला दूध पाजू लागला. इथपर्यंत ठीक आहे, पण मला एका मैत्रिणीने सांगितले की, उज्जैन येथील कालभैरव या देवतेची मूर्ती मदिरा प्राशन करते हे ऐकून आश्चर्य वाटले आणि या मागची कथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामागे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा जे काय असेल ते; परंतु जेव्हा याविषयी बरेच वाचले त्या वेळेला हे आश्चर्य काय आहे ते समजू शकले नाही. नगर जिल्ह्यामध्ये शनिशिंगणापूर हे गाव आहे आणि या गावातील घरांना दरवाजा नाही, हे सर्वजण आपण जाणत आहोत… यामागेही अशीच आश्चर्यजनक कहाणी आहे. आज विज्ञान युगामध्येही हजारो वर्षे चालत आलेली ही परंपरा आजही चालू आहे… कालभैरवाच्या मूर्ती मागील रहस्य कोणीही खोलू शकले नाही.
‘कालभैरव’ या देवतेचे हे मंदिर भारतातील मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात स्थित असलेले एक हिंदू मंदिर आहे. कालभैरव ही उज्जैन शहराची पालक देवता समजली जाते. कालभैरवाचे हे अतिशय आकर्षक मंदिर शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या देवतेला नैवेद्य हा दारूचा असल्यामुळे प्रसादासाठी मद्य हे मंदिरातील देवतेला अर्पण केले जाते. कालभैरव देवतेला दारूचा नैवेद्य कसा काय चालतो त्याची उत्सुकता अनेक दिवसांपासून मनात असल्यामुळे जरा या मागची कथा जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. नावाप्रमाणेच हे मंदिर कालभैरव देवतेचे आहे. या देवतेची प्रतिमा ही शेंदूर लावलेली पाषाणातील मूर्ती आहे. या देवतेच्या डोक्यावर चांदीचे उलटे नरसाळ्याच्या आकाराचा टोप आणि त्यावर मुंडासासारखे कापड गुंडाळलेले असते. ही परंपरा महादजी शिंदे यांच्या काळापासून चालत आली आहे. या देवतेचा इतिहास जाणून घेण्यासाठी जरा मागे जाऊया. अष्ट भैरवाची उपासना शैव परंपरेपासून केली जात आहे. या अष्टभैरवापैकी कालभैरव हा त्यांचा प्रमुख मानला जातो. कालभैरवाची पूजा कापालिक आणि अघोर पंथांमध्ये पारंपरिकपणे लोकप्रिय होती आणि उज्जैन हे या पंथांचे प्रमुख केंद्र असल्यामुळे काल भैरव हे उज्जैनचे रक्षक देवता मानले जाते. त्याला त्यामुळेच असेल कदाचित उज्जैन नगरचे मुख्य सेनापती हे कालभैरव मानले जातात.
सध्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून मंदिराची रचना जुन्या मंदिराच्या अवशेषांवर बांधण्यात आली आहे. मूळ मंदिर भद्रसेन नावाच्या राजाने बांधले असे मानले जाते. याचा उल्लेख स्कंद पुराणात अवंती खंडात आढळतो. येथील शिवपार्वती विष्णू आणि गणेश यांच्या प्रतिमा परमार काळातील इ.स. तेराव्या शतकातील आहेत. एकेकाळी मंदिराच्या भिंती सजलेल्या विविध चित्रांनी सजविलेल्या होत्या. आज त्या चित्रांच्या फक्त खुणा दिसतात. काळानुसार व त्या त्या राज्यकर्त्यांच्या नुसार मंदिराच्या रचनेतही बदल झालेला आढळतो. उदाहरण सांगायचे झाल्यास पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या पराभवानंतर मराठा सेनापती महादजी शिंदे यांनी उत्तर भारतात मराठा राजवट पुनर्स्थापित करण्याच्या मोहिमेत विजयासाठी प्रार्थना करून कालभैरव देवतेला साकडे घातले व आपली पगडी अर्पण केली. मराठा सत्तेचे यशस्वी पुनरुत्थान केल्यानंतर महादजी शिंदे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. कालभैरव जयंती कार्तिक शुक्ल अष्टमीला साजरी केली जाते. या काळात लाखो भाविक दर्शनाला येतात. कारण उज्जैनचे कालभैरव मंदिर हे जग प्रसिद्ध मद्याच्या चमत्कारामुळे प्रसिद्ध आहे. या भैरव मंदिरात बाबा कालभैरवाला मद्य अर्पण केले जाते. येथे भैरवबाबांच्या पूजेच्या साहित्यात मद्य हे महत्त्वाचा नैवेद्य आहे. बाबा भैरवांना मद्य अर्पण करण्यामागील कारण जाणून घेऊया.
कालभैरवाला मद्याचा नैवेद्य का दाखवतात? याची मिळालेली माहिती अशी आहे की, काळभैरव ही सूडबुद्धीची देवता मानली जाते. तसेच भैरव बाबा दुष्कृत्यांचा नाश करतात त्यासाठी ते मद्याचे सेवन करतात. त्यामुळे या मंदिरात या देवतेला मद्य अर्पण केले जाते.
पूर्वी भैरवबाबांना मद्याबरोबरच मांसही अर्पण केले जात असे, पण नंतर फक्त मद्य अर्पण करण्याची पद्धत सुरू राहिली. कालभैरवाच्या मंदिरात मद्य अर्पण करणे हे देखील दृढनिश्चय आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. इथे लोक मद्य देतात, पण प्रसाद म्हणून सेवन करत नाहीत. या मंदिरात दररोज सुमारे २००० पेक्षा जास्त मद्याच्या बाटल्या अर्पण केल्या जातात. अनेक भाविक असेही म्हणतात की, या मंदिराविषयी एक रंजक आणि चमत्कारिक तथ्य म्हणजे या मंदिरात असलेली कालभैरवची मूर्ती मद्याचे सेवन कसे करते ते पुरातत्त्व विभाग आणि शास्त्रज्ञ ही हे रहस्य शोधण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे गूढ अजूनही उलगडलेले नाही. कालभैरवाच्या मंदिरात रविवारी मद्य अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते, असेही मानले जाते. कालसर्प दोष, अकाली मृत्यू आणि पितृदोष यांसारख्या घातक दोषांपासूनही आराम मिळतो.
मंदिराबाहेर, विक्रेते प्रसादाच्या टोपल्या विकतात, ज्यात नारळ, फुले आणि दारूची बाटली असते. २०१५ मध्ये, परवाना नसलेल्या दारू विक्रेत्यांकडून भाविकांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य सरकारने मंदिराबाहेर दारूचे काउंटर उभारले. या काउंटरमध्ये देशी दारू आणि विदेशी दारू दोन्ही विकली जाते. ज्यांना जी परवडते ते भक्त दारूच्या बाटल्या पुजाऱ्याकडे देतात, जो बशीत दारू ओततो. त्यानंतर तो प्रार्थना करतो आणि देवतेच्या ओठांजवळ बशी घेतो, ज्यामध्ये एक फाटा असतो. त्याने प्लेट थोडीशी झुकवली जाऊन दारू गायब होऊ लागली. सुमारे एक तृतीयांश बाटली प्रसाद म्हणून भक्ताला परत केली जाते. मंदिराचे पुजारी, तसेच अनेक भक्तांचा असा दावा आहे की, त्या स्लीटमध्ये कोणतीही पोकळी नाही आणि देवता चमत्कारिकपणे अर्पण केलेली दारू प्राशन करते. मात्र, मंदिराचे पुजारी दर्शनार्थींना मूर्तीचे परीक्षण करू देत नाहीत. ज्यांनी ज्यांनी असा देवावर गैरविश्वास केला त्यांना त्याचे फळ मिळाले असेही पुजारी सांगतात. अशी ही कालभैरवाची रहस्यमय कहानी असून हा एक चमत्कारच आहे.