युवराज अवसरमल
जय जय श्री स्वामी समर्थ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलेला व श्री स्वामी समर्थच्या भूमिकेत असलेला कलाकार म्हणजे अक्षय मुडावदकर. अक्षय मूळचा नाशिकचा, त्यामुळे त्याचे बालपण, शाळा, कॉलेज नाशिकमध्येच झाले. पंचवटीमधील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे बालपण तेथे गेले. प्रत्येक वर्षी शाळेतील स्नेहसंमेलनात त्याचा सहभाग असायचा. ११वी, १२ वी विज्ञान केल्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली.
दरवर्षी फ्रेशर पार्टीला त्याने कार्यक्रम केला. पुण्यातील ताज ब्ल्यू डायमंड, मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील इंटर कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये काही काळ नोकरी केली. त्यानंतर काही काळ त्यांनी नाशिक येथे या क्षेत्रात नोकरी केली. त्यानंतर त्याने एम.पी.एम. (मास्टर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट) पूर्ण केले. त्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटकडून इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. तेथे आठ वर्षे त्याने प्रशासनाचे काम पाहिले. नोकरी करता करता त्याने हौशी कलाकारांचा ग्रुप जॉईन केला. राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण मंडळ स्पर्धामध्ये काम करत गेला. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्याचे गांधी हत्या आणि मी हे नाटक प्राथमिक फेरीत पहिले आणि शेवटच्या स्पर्धेमध्ये दुसरे आले. त्यामध्ये त्याची नारायण आपटेची भूमिका गाजली. त्याबद्दल राज्य सरकारचे त्याला पारितोषिक मिळाले. नंतर त्याने चार दिवस प्रेमाचे या नाटकाचे काही प्रयोग केले. दी लास्ट व्हॉईस रॉय हे त्याचे राज्य नाट्य स्पर्धेतील शेवटचे नाटक होते. त्याला त्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट ॲक्टरचे अॅवॉर्ड मिळाले. यापासून त्याला प्रेरणा मिळाली.
अभिनयाच्या क्षेत्रात त्याला काम करायचे होते. त्याचा संघर्ष सुरू होता. सोमवार ते शनिवार मुंबईत ऑडिशन कुठे सुरू आहे याची माहिती तो काढायचा. रविवारी सकाळी नाशिकहून तो पंचवटी एक्स्प्रेस पकडून सकाळी मुंबईला यायचा आणि दिवसभर ऑडिशन देऊन संध्याकाळी परत पंचवटी एक्स्प्रेस पकडून नाशिक गाठायचा, असे काही महिने त्याचा संघर्ष सुरूच राहिला. एके दिवशी त्याने घरच्यांशी विचारविमर्श केला आणि अभिनयाच्या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याच्या नोकरीला आठ वर्षे झाली होती व लग्नाला सात वर्षे झाली होती. महिन्याच्या एका तारखेला निश्चित रक्कम मिळायची. ते सर्व सोडून त्याने मोठ्या हिमतीने अभिनयाच्या या क्षेत्रात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
डिसेंबर २०१८ ला त्याने मुंबईमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला ऑडिशन कुठे होतात, काहीच माहिती नव्हते. मग हळूहळू मित्रांच्या ओळखीने ऑडिशन कळू लागल्या. मालिकेमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या. असेच ओळखीने जगदंब प्रोडक्शनची ‘स्वराज्य जननी जिजामाता’ ही मालिका मिळाली. त्या मालिकेमध्ये विठोजी राजे भोसले ही व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. ते शहाजी महाराजांचे काका होते. जवळजवळ चार ते पाच महिने हा ट्रॅक चालला होता. त्यानंतर त्याचं एक प्रायोगिक नाटक व्यावसायिक रंगमंचावर येणार होते. मालिका संपल्यावर लगेच त्या नाटकाची रिहर्सल सुरू झाली. एक काम संपल्यावर लगेच दुसरे काम सुरू झाले, याचे त्याला समाधान होते. गांधी हत्या आणि मी या नाटकाचे पंचवीस प्रयोग झाले आणि लॉक डाऊन लागले. त्या काळात काहीच काम नव्हते. सर्व थांबले होते.
पुढे त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. एके दिवशी त्याला अचानक एक फोन आला आणि म्हणाले की, आम्ही एक स्वामींवर मालिका करीत आहोत, तुम्ही त्यात स्वामीची भूमिका करणार का? नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने होकार दिला आणि ‘जय जय श्री स्वामी समर्थ’ ही मालिका सुरू झाली. नशिबाने आणि स्वामीच्या आशीर्वादाने ही मालिका अक्षयला मिळाली. जवळजवळ चार वर्षे झाले ही मालिका सुरू आहे. कलर्स वाहिनीवरील या मालिकेने नुकतेच १३०० भाग पूर्ण केले आहेत. अक्षय म्हणाला, “स्वामी समर्थ मालिकेच्या लूक टेस्टसाठी मला डोक्यावरचे केस काढून जायचे होते. त्यावेळी मी आजीला विचारले की, डोक्यावरचे केस काढू का? ती म्हणाली नवीन काम आहे का? मी हो म्हणालो. तिने डोक्यावरचे केस काढण्यास संमती दिली. आमच्या घरी स्वामी समर्थ यांचा मोठा फोटो आहे. मी त्या फोटोच्या बाजूला उभा राहिलो आणि आजीला विचारले की, स्वामी आणि माझ्यात काही साम्य आहे का? आणि आजी म्हणाल्या हो आहे. तुला स्वामीची भूमिका मिळो.”
आजीचा आशीर्वाद त्याला मिळाला आणि स्वामी समर्थांची भूमिका त्याला मिळाली. ही मालिका मिळाल्यानंतर त्यांचे काम पाहून प्रेक्षक भारावून गेले, आज देखील काही जण पाया पडतात; परंतु तो नमस्कार स्वामीजींना असतो. अक्षयचा अभिनय पाहिला तिच्या तोंडावरच हास्य आणि समाधान हे मोठं अवॉर्ड असल्याचं अक्षय मानतो.ही मालिका मिळणं व लोकांच त्याला प्रेम मिळणे हे सारे काही स्वामींमुळे घडल्याचे तो मानतो. अक्षयला या मालिकेबद्दल व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!