Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सMohan Joshi : ‘रंगकर्मी’ मोहन जोशींच्या अंतरंगातले तरंग...!

Mohan Joshi : ‘रंगकर्मी’ मोहन जोशींच्या अंतरंगातले तरंग…!

राज चिंचणकर

नटवर्य भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, किशोर प्रधान, शोभा प्रधान, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी या मंडळींमध्ये अर्थातच समान धागा आहे, तो म्हणजे ‘कलावंत’ असण्याचा! पण या मंडळींच्या बाबतीत इतकेच म्हणता येणार नाही; कारण या कलावंतांना अलीकडच्या काळात अजून एका अखंड धाग्यात ओवले गेले आहे आणि तो धागा म्हणजे या मंडळींना मराठी नाट्य कलाकार संघाचा ‘रंगकर्मी जीवनगौरव’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या मंडळींच्या मांदियाळीत आता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचेही नाव दाखल झाले आहे. कारण यंदाच्या रंगकर्मी जीवनगौरव पुरस्काराने मोहन जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला खरा; पण त्यावेळी मोहन जोशी यांचा जीवनपट उलगडणारी ‘लाईव्ह’ मुलाखत हा या सोहळ्याचा सर्वोच्च बिंदू ठरला.

मोहन जोशी यांच्या रंगमंचावरच्या व पडद्यावरच्या कामगिरीसोबतच, त्यांचा दमदार आवाज आणि त्यांचे एकूणच भारदस्त व्यक्तिमत्त्व याने त्यांच्याभोवती कायमच वलय निर्माण करून ठेवले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचे आत्मचरित्रही लिहून सिद्ध केले व त्यातून मोहन जोशी यांच्या अंतरंगातले विविध तरंग वाचक आणि रसिकांना अनुभवायला मिळाले. मराठी नाट्य कलाकार संघाच्या व्यासपीठावरून जेव्हा अभिनेता विघ्नेश जोशी त्यांना बोलते करत होता; तेव्हा मोहन जोशी यांनी, ‘तू माझे पुस्तक वाचूनच आला आहेस ना?’ असे त्याला दोन-तीनदा विचारले सुद्धा! अर्थात, यावर मौन पाळेल तर तो ‘मुलाखतकार’ विघ्नेश कसला? तो सुद्धा, मोहन जोशी यांच्याभोवती वावरणाऱ्या काही कलाकारांची नावे सांगत, त्यांच्याकडूनच मोहन जोशींविषयी अनेक गोष्टी कळल्याचे स्पष्ट करत राहिला. रंगमंचावरची ही मुलाखत तर उत्स्फूर्तपणे रंगलीच; पण त्यातून मोहन जोशी यांचा दिलदारपणा आणि इतर अनेक स्वभाव वैशिष्ट्ये रसिकांना समजली.

ज्येष्ठ दिवंगत पत्रकार व नाट्यसमीक्षक दीनानाथ घारपुरे यांच्या संदर्भातली ही आठवण सांगताना, माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपल्या भूतकाळाची संवेदनशील शिदोरी कायम जवळ ठेवतो. हे मोहन जोशींच्या माध्यमातून अधोरेखित झाले. मोहन जोशी त्यांच्या उमेदवारीच्या काळात जेव्हा मुंबईत आले; तेव्हा गिरगावात राहणाऱ्या दीनानाथ घारपुरेंच्या घरी ते पेईंगगेस्ट म्हणून वास्तव्यास होते. पण त्यांचे संबंध एवढ्यावरच मर्यादित राहिले नाहीत; तर आपुलकीचा धागा त्या दोघांमध्ये कायमस्वरूपी निर्माण झाला. अगदी आजही मोहन जोशी त्यांच्या आयुष्यातले ते दिवस अजिबात विसरलेले नाहीत, हे महत्त्वाचे…! माणसाला उगाच काही मोठेपण प्राप्त होत नाही; याचे प्रतिबिंब मोहन जोशींसारख्या मागच्या पिढीतल्या अनेक रंगकर्मींच्या आचरणातून रंगभूमीवर आणि आयुष्याच्या रंगमंचावर पडत असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -