पणजी : ‘घरत गणपती’, ‘लंपन’सह अनेक मराठी कलाकृतींचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गोव्यात संपन्न झालेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) मध्ये रेड कार्पेटवरील तारे-तारकांची उपस्थित, विविध भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज मास्टरक्लास अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पुरस्कार वितरण सोहळ्याने या महोत्सवाची सांगता झाली. विविध श्रेणीतील उत्कृष्ट कलाकृती, कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अनेक मराठी कलाकृतींचादेखील समावेश होता.
दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर या तरुण दिग्दर्शकाला ‘घरत गणपती’ या त्याच्या चित्रपटासाठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारानंतर नवज्योत सिनेविश्वातील नव्या दमाचा प्रतिभावान दिग्दर्शक आहे; असा सूर महोत्सवात उमटला. युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं यंदाच्या इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुरू केला आहे. परंपरा आणि आधुनिक भावनांना जोडणाऱ्या हृदयस्पर्शी कथेचं सादरीकरण यासाठी परीक्षकांनी नवज्योतची प्रशंसा केली. दुसरीकडे ‘लंपन’ला सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) हा पुरस्कार मिळाला आहे. उल्लेखनीय कथाकथन, उच्च निर्मितीमूल्यं आणि उत्कृष्ट कामगिरी यासाठी या वेब सीरिजला पुरस्कार प्राप्त झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ ही एका स्वप्नाळू मुलाची कथा आहे. ओटीटीविश्वातील नावीन्यपूर्ण कामाला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा ‘लंपन’ या सीरिजने पटकावला.
View this post on Instagram
Mumbai Pune Mumbai 4 : मुंबई पुणे मुंबई ४ येणार का? बघा स्वप्नील जोशी काय म्हणाला!
‘घरत गणपती’, ‘लंपन’ कलाकृतींसह महोत्सवात शशी खंदारे याचा ‘जिप्सी’, निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ तर पंकज सोनवणे याचा ‘प्राणप्रतिष्ठा’ हा मराठी आणि शिवम हरमळकर- संतोष शेटकर यांचा ‘सावट’ हा कोकणी माहितीपट अशा अनेक कलाकृती प्रदर्शित झाल्या. त्याचप्रमाणे हृषिकेश गुप्ते दिग्दर्शित ‘हजारवेळा शोले पाहिलेला, माणूस’ हा सिनेमादेखील महोत्सवात दाखवला गेला. महोत्सवाच्या ‘फिल्म बाजार’ या विभागात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘छबिला’, ‘विषय हार्ड’, ‘तेरव’, ‘आत्मपॅम्प्लेट’ यांसारखे मराठी सिनेमेही सहभागी झाले होते.