मेघना साने
कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या म्हणजे कोमसापच्या २०२२-२३ च्या साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी मालगुंड येथे एक भव्य सोहळा आयोजित केला होता. हा सोहळा रत्नागिरीजवळील मालगुंड येथे म्हणजे कविवर्य केशवसुतांच्या जन्मगावी कोमसापने उभारलेल्या कवी केशवसुत स्मारक प्रकल्पातील सभागृहात होणार होता म्हणून, आम्हाला त्याचे अप्रूप वाटत होते. कोमसापचे पुरस्कार हे मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरातील अनेक शहरांमधील लेखकांना जाहीर झाले असल्याने अनेक नव्या दमाच्या लेखकांचे संमेलन येथे भरले होते. बरीचशी लेखक व साहित्यप्रेमी मंडळी येथे आदल्या दिवशीपासूनच मुक्कामाला होती. प्रकल्पाला भेट देऊन, केशवसुतांच्या घरात वावरून तेथील केशवसुतकालीन वस्तूंचे संग्रहालय, केशवसुत काव्यशिल्प, केशवसुत स्मृती उद्यान, आधुनिक मराठी काव्यसंपदा दालन व सुसज्ज वाचनालय यांचाही मंडळी आनंद घेत होती. सोहळ्याच्या आदल्या दिवशी रात्री प्रकल्पातील सभागृहातच सर्व लेखकांचा सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अशाच आनंदी वातावरणात १७ नोव्हेंबर रोजी कोमसाप वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यासाठी प्रमुख पाहुणे लाभले होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोमसापच्या केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त रमेश कीर, डॉ. सुरेश जोशी असे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. केंद्रीय समितीचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रम नेटका केला. या सोहळ्यात भाषण करताना मधु मंगेश कर्णिक म्हणजेच आमचे मधुभाई, कवी केशवसुत स्मारकाच्या उद्घाटनाच्या आठवणी सांगू लागले. “या स्मारकाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, कविवर्य कुसुमाग्रजांच्या (तात्यांच्या) हस्ते झाले होते. आम्ही तात्यांना आमंत्रण द्यायला गेलो तेव्हा तात्यांनी प्रथम नकारच दिला होता. मग मी हिम्मत करून म्हणालो, ठीक आहे. मी या स्मारकाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातून आपल्याशिवाय अन्य कोणत्या कवीला बोलवावे हे आपणच सुचवावे. आम्ही आपली आज्ञा शिरसावंद्य मानू. या आमच्या युक्तिवादावर तात्या विचारात पडले. अखेर तारखा पाहून मे मधील एक तारीख त्यांनी आम्हाला निश्चित करून दिली. आम्हाला स्वर्ग ठेंगणा झाला.” नव्वदी पार केलेले मधुभाई उत्साहाने बोलत होते आणि नव्या पिढीचे सर्व लेखक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. ज्या स्मारक प्रकल्पात सारे जमले होते, त्या प्रकल्पाची संकल्पना मांडणारा आणि ते स्वप्न पूर्ण करून दाखविणारा अवलिया म्हणजे मधु मंगेश कर्णिक स्वतःच आमच्यासमोर होते. हा क्षण अंगावर रोमांच आणणारा होता. पुरस्कार वितरण सोहळा संपल्यावर स्मारकासमोर झालेल्या मधुभाईंच्या अल्पशा भेटीत मी भाईंना या स्मारकाची जन्मकथा सांगण्याचा आग्रह केला. या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी सपत्नीक उपस्थित असलेले डॉ. सुरेश जोशी या संभाषणात भाग घेत होते. कुसुमाग्रजांनी केलेल्या भाषणाचे वर्णन सांगत होते. ते म्हणाले, “त्या समारंभात अध्यक्ष म्हणून पु. भागवत उपस्थित होते. स्मारकाबद्दल कुसुमाग्रजांनी काढलेले उद्गार आम्हाला अजून स्मरणात आहेत. कुसुमाग्रज म्हणाले होते की, कोकण मराठी साहित्य परिषद आणि माझे स्नेही मधु मंगेश कर्णिक यांनी मालगुंड या ठिकाणी केशवसुतांचे हे स्मारक केले. पण हे दगडमातीचे, इमारतीचे स्मारक नव्हे. तर या ठिकाणी त्यांनी मराठी कवितेची राजधानी उभारली आहे. हे एक काव्यतीर्थ आहे. “मधुभाईसुद्धा गतस्मृतींत रंगून गेले होते. ते म्हणाले, “कुसुमाग्रज बोलत असताना असे वाटत होते जणू शारदेची वीणाच झंकारत आहे. एका थोर कविवर्याच्या जन्मगावी, जन्मस्थळी दुसऱ्या तशाच अलौकिक कवीने हृदयातून काढलेले हे उद्गार केशवसुत स्मारकात अजूनही घुमत आहेत.”
केशवसुत स्मारकाचा इतिहास आम्ही भाईंना अधिक बोलते करून जाणून घेतला, तो थोडक्यात असा. १९९०च्या डिसेंबर महिन्यात रत्नागिरीत अखिल भारतीय साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्षपद मधुभाईंनी भूषविले होते. त्यानंतर फक्त तीनच महिन्यात कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली. (१९९१) त्यानंतर वर्षभरातच केशवसुत स्मारकाचे भूमिपूजन आणि दोन वर्षांत प्रकल्पाची पूर्तता होऊन १९९४च्या मेमध्ये स्मारकाचे रितसर उद्घाटन झाले होते. ज्या ठिकाणी केशवसुतांचे जन्मघर होते, त्याच ठिकाणी स्मारकाची वास्तू उभारली होती. जीर्ण झालेले ते जन्मघर ही एक पवित्र व जतन करण्याजोगी वास्तू असल्यामुळे तिचा जीर्णोद्धार करताना मूळ ढाच्याला तिळमात्र धक्का लागू नये, अशी काळजी घेतली गेली. त्या ठिकाणी केशवसुतांच्या काळातील लेखनसाहित्य, गृहोपयोगी वस्तू प्रयत्नपूर्वक मिळवून त्यांचा संग्रह करावा आणि सर्वार्थाने ही एका थोर कवीची वास्तू पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी व अखिल महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी व्हावी असे मधुभाईंना वाटत होते. या स्मारकासाठी मधुभाई आणि कोमसापने जवळजवळ साठ लक्ष रुपयांचा निधी उभा केला. त्यामध्ये त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि शरद पवार या दोघांनी सिंहाचा वाटा उचलला होता.
कवी केशवसुत स्मारक प्रकल्पात केशवसुतांच्या घराला लागूनच मोठी वास्तू उभारली आहे. तेथे केशवसुत ग्रंथालयही तयार केले आहे. आज तिथे सुमारे वीस हजारांच्या वर पुस्तके आहेत. या ग्रंथालयाला डॉ. आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्याच्या बाजूला फुले व्यासपीठ उभारले आहे. कार्यक्रमासाठी पाहुणे आले तर त्यांना राहण्यासाठी खोल्याही आहेत. मधुभाईंनी बोलता बोलता एक खंत बोलून दाखवली. मालगुंड, गणपतीपुळे येथे अनेक मराठी माणसे गणपतीदर्शनाला येतात. समुद्रकिनाऱ्यावर पिकनिक काढतात. पण त्याच्या अगदी जवळच असलेल्या मालगुंड येथील केसावसुत स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत आहे.