भालचंद्र कुबल
ऐतिहासिक दाखल्यांनुसार दशावतार ही लोककला साधारणतः आठशे ते नऊशे वर्षे जुनी असावी, कारण त्यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. दशावतारी नाटकाची पूर्वपीठिका फार प्राचीन असून ती इ.स.सातव्या शतकापर्यंत मागे नेता येते, असे एक मत आहे; परंतु त्याला निश्चित आधार नाही. रामदासांच्या दासबोधातही दशावतारी खेळांचा उल्लेख सापडतो; परंतु त्या काळी हे महाराष्ट्रात प्रचलित होते किंवा नाही अथवा त्यांचे स्वरूप कसे होते, यासंबंधी काहीच माहिती मिळत नाही. सामान्यपणे दशावतारी नाटकाचे मूळ कर्नाटकात असून तेथून ते महाराष्ट्रात आले, असे म्हटले जाते. इ.स.१७२८ मध्ये श्यामाजी नाईक काळे यांनी हे दशावतारी खेळ कर्नाटकातून आडिवऱ्यास आणले, तेथून पुढे त्यांचा प्रसार उ. कोकणात झाला, असा उल्लेख आडिवऱ्याची महाकाली या आपल्या पुस्तकात चिं.कृ.दीक्षित यांनी केला आहे. तर वेंगुर्ले-गोवे भागात दशावताराची प्रथा फार जुनी असून ही नाटके काळ्यांनी द. कोकणातूनच आडिवऱ्यास नेली, असे प्रतिपादन पु. गो. काणेकर आपल्या नाट्यस्मृतीमध्ये करतात. या दोन्ही मतांतील सत्यांश गृहीत धरून अडिवरे येथे ही नाटके सरळ द. कोकणातून न जाता बेळगावमार्गे (कर्नाटक) गेली असावी, अशी समन्वयात्मक भूमिका वि.कृ.जोशींनी मांडली आहे. स्थूलमानाने दशावतारी नाटकाची परंपरा महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच धरली जाते.
परंतु दशावताराच्या प्रयोगांवर दृष्टिक्षेप टाकल्यास लोककला व लोकजीवन यांचा सुरेख मेळ यात दिसून येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे प्रमुख सण असले, तरी ग्रामदैवतांचा वार्षिक जत्रोत्सव प्रत्येक ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा असतो. उत्सवानिमित्त दैवताची पालखी निघते. विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात आणि सर्वांत महत्त्वाचे आकर्षण असते, ते रात्री होणाऱ्या दशावतारी कलेच्या सादरीकरणाचे. दशावताराची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. मुख्य म्हणजे हा नाट्याविष्कार असला, तरी कोणतीही लिखित संहिता या नाटकांना नसते. अत्यंत उत्स्फूर्तपणे नाटकातले संवाद सादर केले जातात. लिहिलेले संवाद नसतानासुद्धा सहा तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ नाटक नुसते चालते नव्हे, तर उत्तरोत्तर रंगत जाते.
देव-दानवांचे युद्ध म्हणजे दशावतारी नाटकातील प्रमुख आकर्षण. राक्षसाच्या प्रवेशाच्या वेळी राळेचा भपकारा उडवीत व त्याचे सैन्य समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून येई. त्यांची ती भयानक रौद्र रूपे, त्या अललर्डुरच्या आरोळ्या, त्या हातातील लखलखणाऱ्या तलवारी व राळेचा उसळलेला डोंब यांमुळे प्रेक्षकांची दाणादाण उडे. लहान मुले तर भीतीने किंचाळून रडत. त्यात आणखी भर म्हणजे देव-दानवाच्या लढाईत राक्षस ओरडून बोलत व बोलताना ते आपले पाय आपटून चाळांच्या आवाजाने आपल्या वाक्यात विरामचिन्हे देत. दोन्ही पक्षांकडील योद्ध्यांच्या तलवारीचे हात होत व तेही मृदंग किंवा तबला यांच्या तालावर युद्ध खेळत. या प्रकारामुळेच या नाटकांना गमतीने ‘तागड्थोम’ची (ताकडधोम) किंवा ‘अललर्डुर’ची नाटके म्हणण्यात येई. शेवटी आख्यानानंतर पहाटेच्या सुमारास गौळणकाला होई. त्यावेळी नाटकातील स्त्रीवेशधारी पात्र हातात आरती घेऊन ती प्रेक्षकांत फिरवी. प्रेक्षकही आरतीत पैसे टाकीत. जत्रेतील नाटकाचा शेवट गौळणकाल्याने होत असल्यामुळे त्याला दहीकाला असेही म्हणत, अजूनही गोमंतकात ही दहीकाल्याची प्रथा आहे.
आजच्या पिढीला यातील बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत; परंतु निरनिराळ्या विषयांवर चित्रपटांचे विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या तरुण चित्रपट दिग्दर्शकांनी दशावताराचा विषय हाताळला. त्यातील बारकावे कथासूत्रातून जतन करून ठेवल्यामुळे आजही संदर्भ म्हणून शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘निर्माल्य’ आणि अभिजित वारंग दिग्दर्शित ‘पिकासो’ संग्रही आहेत. दोन्ही चित्रपट अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून गाजले. दशावताराचे मार्केटिंग जेवढे स्थानिक मंडळांनी आणि अभ्यासकांनी केले नसेल तेवढे या चित्रपट माध्यमाने केले. बाबी कलिंगण, गंगाराम मेस्त्री, राजाभाऊ आजगावकर, बाळकृष्ण गोरे, बाबा सावंत, नितीन आसयेकर, चारूहास मांजरेकर आदी कलाकारांनी दशावतार वाढीसाठी खूप कष्ट घेतले आहेत. दशावताराच्या सद्यस्थितीबद्दल मत व्यक्त करताना अखिल दशावतार कला अकादमीचे अध्यक्ष बाळकृष्ण नारायण गोरे म्हणाले, “कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण एकशे अडतीस दशावतारी मंडळे आहेत, पैकी शहाऐंशी मंडळे नोंदणीकृत आहेत.”
खेळता नेटके दशावतारी । तेथे येती सुंदर नारी ।
नेत्र मोडिती कळाकुसरी । परी अवघे धटिंगण ।।
असे अनुमान करण्यात येते, की रामदासांच्या काळी महाराष्ट्रात दशावतार नाट्य प्रचारात असावे आणि मध्यंतरी ते लुप्त झाल्यामुळे काळे यांनी पुन्हा ते कर्नाटकातून महाराष्ट्रात आणले असावे; परंतु रामदासांचा संचार महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रदेशांत असल्यामुळे त्यांनी केलेला उल्लेख कर्नाटकातील नाट्याविषयीही असणे शक्य आहे. इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ वगैरे यांसारख्या नव्या नटांमुळे त्या कलाप्रकाराबद्दल औत्सुक्य वाढत आहे. विष्णुदास भावे यांनी या दशावतारी नाट्यतंत्राचे मूलगामी संस्करण करून त्यांची पौराणिक नाटके सादर केली. त्या दृष्टीने पाहता मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाऊन भिडते. हे सारे जरी खरे असले तरी आजमितिला दशावतारी मंडळांची आणि कलाकारांची आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची आहे. शासनाकडून कायम स्वरूपी कुठलेही अर्थसहाय्य वा योजना या मंडळांसाठी नाहीत. बँका अथवा शासकीय अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेऊन ही लोककला जपली पाहिजे, या मानसिकतेतून काम करत नाहीत. त्यामुळे आजही जी स्थिती ५० वर्षांपूर्वी होती, ती म्हणजे “रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा” घेऊन भटकंती करत दुर्दैवाचे दशावतार दूर झाले पाहिजेत हीच त्या गणरायाचरणी प्रार्थना.