मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सहा दिवसाचा कालावधी लोटल्यावरही महायुतीचा शपथविधी न झाल्याने व तारीख अद्यापि जाहीर न झाल्याने महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार, (Maharashtra Politics) याबाबत महाराष्ट्रातील जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक निकाल लागताच भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपाचा मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तथापि देवेंद्र फडणवीस की अन्य कोणी याबाबत मुख्यमंत्रीपदाचे नाव अजून भाजपाकडून जाहीर न झाल्याने कोणाची वर्णि लागणार यावर महाराष्ट्रात आता पैंजा झडू लागल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची सर्वत्र चर्चा असून शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. याबाबत महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री कोण असतील?, याची उत्सुकता कायम आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत झाली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेतली जातील आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे नेत्यांची अमित शहा यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी एक चर्चा होते; ज्यात तोडगा काढला जातो. मुख्यमंत्री महायुतीचा आणि महाराष्ट्राचा असेल. मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुढे नेतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प पूर्ण करतील. हा महाराष्ट्र सरकारचा २० वर्षातील लवकर होणारा शपथविधी असेल.
प्रसार माध्यमांशी बोलण्यास शिंदेंचा नकार
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून वाटाघाटी सुरु आहेत. महायुतीत रस्सीखेच सुरु असताना शिंदे, फडणवीस व अजित पवार गुरुवारी दिल्लीला चर्चेसाठी गेले होते. तिथून परतताच एकनाथ शिंदेंनीमहायुतीच्या चर्चेच्या सर्व बैठका रद्द करून साताऱ्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार शिंदे दरेमध्ये पोहोचले असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते. याशिवाय राजकीय उलटफेर सुरु असतात. त्यावेळी या भाऊगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात. त्यांना येथे शांतता आणि समाधान मिळते. आत्तापर्यंत साधारणत: सहा ते सात वेळा अडचणीच्या काळात ते गावाकडे आले आहेत.
शिंदे नाराज नाहीत तर आजारी
एकनाथ शिंदेंसोबत सन्मानपूर्वक चर्चा झाली. मंत्रिमंडळाची चर्चा लवकरच पूर्ण होईल. काल एकनाथ शिंदे जेव्हा अमित शहा यांना भेटले तेव्हा अतिशय चांगले वातावरण होते. केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते बैठक ठरवतात. निर्णय लवकरात लवकर होईल. केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल, ते शिंदेंना माहिती होईलच. आमची भावना आहे की शिंदेंनी मूळ सरकारमध्ये राहावे आणि सगळ्यांना पुढे घेऊन जावे. यात कुठल्याही चर्चांमध्ये तथ्य नाही, असं म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सरकार स्थापन करायला काही अडचण नाही. भाजपने स्पष्ट केलं आहे की त्यांच्या नेत्याची निवड लवकर होईल. कुठे ही एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते थोडे आजारी आहेत, प्रत्येकाला धावपळीतून अडचणी निर्माण होत असल्याचे माजी मंत्री उदय सामंत म्हणाले.