Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीढोल ताशांच्या गजरात साई बाबांच्या मिरवणुकीची पेण शहरात परिक्रमा

ढोल ताशांच्या गजरात साई बाबांच्या मिरवणुकीची पेण शहरात परिक्रमा

ओम साई पदयात्रा मित्र मंडळाच्या मिरवणुकीने संपूर्ण पेण शहर साईमय

पेण(देवा पेरवी): पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात श्री साई बाबांची मानाची पालखी म्हणून समजल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्र मंडळाच्या भव्यदिव्य मिरवणुकीने संपूर्ण पेण शहर साईमय वातावरणात न्हाऊन गेले. पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी सहा वाजता विद्युत रोषणाई, ढोल ताशांच्या गजरात व वरळी बिट्स ब्रॉसबँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणूक सोहळ्यामध्ये तीन चलचित्र रथ शामिल झाले होते. यामध्ये द्वारकामाई मंदिर, बैलगाडी हकताना साईबाबा, हुबेहुब दिसणारे साईबाबा यांचा विशेष समावेश होता. साई बाबांच्या मिरवणुकीची संपूर्ण पेण शहरात परिक्रमा करण्यात आली.

श्री साई बाबांच्या पालखी मिरवणुकीची सुरुवात प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम, अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर यांच्या हस्ते व हजारो महिलांच्या उपस्थितीत साई बाबांची महाआरती घेऊन करण्यात आली.

पेण साई मंदिरा पासून फटाक्यांच्या आतषबाजीत सुरू झालेली मिरवणूक तेरा घरांची आळी, चावडी नाका, आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, राजू पोटे मार्ग, कोळीवाडा, बाजार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कासार आळी, हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे वाजत गाजत आली. पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके, भगवे झेंडे लावण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने महिला वर्ग व पेणकर या पालखी मिरवणुक सोहळयामध्ये सामील झाले होते. गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यत पालखी मिरवणूक पेण शहरात फिरल्या नंतर श्री साई बाबांच्या महाआरतीने व महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता साई बाबांची पालखी पायी चालत शिर्डीकडे मार्गस्थ झाली.

गेली 16 वर्ष ओम साई पदयात्रा मित्र मंडळ पेण ते शिर्डी पर्यंत साई पालखीची सेवा करत आहेत. पेण येथून निघालेली ही बाबांची पालखी सोमवार दि.6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शिर्डीत पोहोचणार आहे. तसेच सोमवार 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सेंच्युरीयन पार्क चिंचपाडा पेण येथे साईंचा भंडारा होणार आहे.

सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली व त्यांचे 200 सभासद गेली महिनाभर दिवस रात्र मेहनत घेत होते. पेणकर वर्षभर या श्री साई बाबांच्या भव्यदिव्य मिरवणुकीची वाट पाहत असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -