Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीऑनलाईन असा बुक करा आता तुमच्या आवडीचा गाडीचा नंबर

ऑनलाईन असा बुक करा आता तुमच्या आवडीचा गाडीचा नंबर

मुंबई : नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविरहित) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती जारी करण्यात येईल.

या फेसलेस सेवेमुळे सुमारे २.५० लाख वाहन मालकांना परिवहन कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता नाही. नागरिकांना काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी [email protected] येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा. आकर्षक/पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी वरीलप्रमाणे (workflow) कार्यपद्धतीचा अवलंब वाहनधारकांनी करावा व या फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

अशी करा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जावून न्यू युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -