
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला जनादेश मिळाल्यानमतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाभोवती चर्चेने फेर धरला असतानाच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बुधवारी (२७ नोव्हेंबर) रात्री बैठक झाली. या भेटीत नेमकी काय झाली चर्चा, यावर आता राज्यात जोरदार चर्चा रंगलीय.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तब्बल ४० मिनिटे महत्त्वाची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आणि मराठा समीकरण यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले त्यानंतरही अद्याप महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्याच्या (Chief Minister) चेहऱ्याबाबत ...
या बैठकीत महाराष्ट्रात मराठेत्तर मुख्यमंत्री बनवल्यास मराठा समाज नाराजी होण्याची चिंता भाजपाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले गेले, तर मराठा मतपेढी कशापद्धतीने भाजपासोबत एकसंध ठेवता येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते.
देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केल्यास मराठा मतं कशी टिकवता येतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतं, यावर दोघांमध्ये खलबतं झाली. २०१४ ते २०२४ या काळात मराठा समाजाची आंदोलनं, मराठा नेत्यांच्या भूमिका आणि कोर्टाचे निकाल शाहांनी जाणून घेतले. पक्षाच्या भविष्यासाठी मराठा चेहरा किती महत्त्वाचा आहे, याबाबतही राजकीय आकडेमोड करण्यात आली.
काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर आता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे नेते अंतिम निर्णयासाठी आज गुरुवारी दिल्लीला जाणार आहेत. आता मोदी-शाह कोणता निर्णय देतात या बाबत कमालीची उत्सुकता आहे.