Saturday, February 15, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यउद्धव ठाकरे, आपण कालबाह्य झालात...!

उद्धव ठाकरे, आपण कालबाह्य झालात…!

निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम मशीन, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर दोषारोप केले. उद्या म्हणाल, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, ते मोदींचे मित्र. रशियाचे अध्यक्ष पुतीन व इस्त्राईलचे नेत्यानेहू हेही मोदींचे मित्र. त्यांनी आम्हाला हरवले. लोकसभेच्या तुटपुंज्या यशाने मदनमस्त हत्तीच्या नशेत आपण चूर राहिलात. निवडणुकीच्या वाऱ्यावरून कळत होते महायुती १६० ते १७० जागा जिंकेल. आपण शिवसेनाप्रमुख, तरीही इतका दारुण पराभव होत असताना आपल्या लक्षात आले नाही. मुख्यमंत्री पदासाठी भांडत होता. विमान, हेलिकॉप्टर परराज्यात रिसॉर्ट, पंचतारांकित हॉटेल यांत गुंतला होता. शिवसेना सोडून गेलेल्यास गद्दार म्हणत हिणवले. जनतेनेच निश्चित केले खरा गद्दार कोण, खरी शिवसेना कोणाची. उद्धवजी आपण कालबाह्य झालेले आहात.

अरुण बेतकेकर – माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना

२०२४ विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे अन् त्यांची शिवसेना चारी मुंड्या चीत झाली. अन्य कोणी असता तर शरमेने स्वतःस कोंडून घेतले असते. पण उद्धव ठाकरे अन्य कोणी थोडेच आहेत. निर्लज्जपणे मीडियासमोर येत म्हणाले, ‘‘करोना काळात कुटुंबप्रमुखाप्रमाणे माझे ऐकणारा महाराष्ट्र असा वागेल असे वाटले नव्हते. काही तरी गडबड आहे. हा निकाल पूर्णपणे अनपेक्षित, अनाकलनीय आहे. कोणत्या रागापोटी ही लाट उसळली कळत नाही.’’ या बोलण्यातून त्यांचा पराकोटीचा अहंकार दिसून येतो. महाराष्ट्रातील दहा कोटी जनता ही मूर्ख आणि मी एकटाच शहाणा. सध्या हिंदू-हिंदुत्वावर पुन्हा संघटितपणे आघात होत आहेत. अशा परिस्थितीत हिंदुजन मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे पाहत होती. त्याच हिंदुत्वास आपण मूठमाती दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीचा आपल्यात अभाव आहे. बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. काळाची पावले ओळखत ती त्यांनी कालांतराने अंगीकारली. भगवी वस्त्रे, अंगावर रुद्राक्षांच्या माळा परिधान केल्या. तेव्हाच शिवसेनेने महाराष्ट्र जिंकला, प्रथमच सत्ता स्थापन केली. अगदी याविरोधात आपण गेलात, तरीही स्वतः युगपुरुष असल्यासारखे आपण वावरत आहात.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक विश्लेषण ‘जोरका धक्का…’

हजारो वर्षे हिंदू धर्माने परकीय आक्रांत्यांना झेलले. पण जेव्हा त्यांनी धर्मावर घाला घालण्यास सुरुवात केली त्या त्या वेळी हिंदू धर्मियांनी प्रतिकार केला. ८०० ते ९०० वर्षे भारतावर परकीयांनी सत्ता गाजवली. धर्म संपविण्याचा प्रयास केला. त्यातील पहिली ५०० ते ६०० वर्षे मुसलमानांनी राज्य केले. हे तर नराधम. महिलांवर अत्याचार केले. मूर्ती-मंदिरे उद्ध्वस्त केली. इस्लाम स्वीकारावा यासाठी छळ केला. अशा अग्निदिव्यातून हिंदू धर्म जिवंत राहिला. त्यानंतर इंग्रज आले. आले ते व्यापाराच्या उद्देशाने पण कालांतराने त्यांनीही आपल्या ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार सुरू केला. यांनी तलवारीचा वापर कमी व बुद्धीचा वापर अधिक केला. पण उद्देश हिंदू खतम करणे हाच. इंग्रजांनी धर्म प्रचारक आणले व त्यांचा वापर दुर्गम दुर्लक्षित आदिवासी भागातील हिंदूंना बाटविण्यासाठी सुरू केला. प्रतिकारही तेथूनच सुरू झाला. त्यानंतर बळाचा वापर सुरू झाला. शेवटी इंग्रजांना देशातून काढता पाय घ्यावा लागला.

१९४७ ला देश स्वातंत्र्य झाला. १९५१ ला पहिले भारतीय सरकार स्थापन झाले आणि नेहरूवादी विचारसरणी देशावर लादण्याचा प्रयत्न सुरू झाला. नेहरू हे स्वतः कट्टर हिंदुद्वेष्ठे शिवाय कट्टर इस्लामवादी. अशाच विचारसरणीचे लोक त्यांनी इतिहास लिहिण्यासाठी निवडले. इतिहासातून हिंदुत्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या राजवटीत अवलंबिला गेला. नेहरू हिंदूंशी वाईट व्यवहार व मुघलांचा उदो उदो करीत. याच महाभागाने आपल्या ‘भारत एक खोज’ या पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘पथभ्रष्ट दरोडेखोर’ असा केला होता आणि मुघलांना भारताचे तारणहार म्हटले होते. मुघल आपला इतिहास होऊ शकत नाही. आमचा इतिहास वेद, पुराण, गीता, राम-कृष्ण, बुद्ध, जैन, नानक, वामपंथीयांनी इतिहासाचे विकृतीकरण केले. जात, वर्णभेद, ब्राह्मण, शूद्र, रूढी, परंपरा, व्यवसाय इत्यादींत हिंदूंचे विभाजन करून भांडणे लावली. हे साध्य करण्यासाठी त्यांनी नव्याने भारताचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले. हे कार्य ज्यांच्या हाती दिले ते सर्व वामपंथी, डाव्या विचारसरणीचे. त्यांच्या राजवटीत भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले ते अब्दुल कलाम आझाद. यांचा जन्म भारतात नव्हे तर मक्का येथे. वयाच्या पहिल्या १५ वर्षे त्यांचे वास्तव्य मक्का येथेच, शिक्षण मदरशात. कोणतेही आधुनिक शिक्षण नाही. भारत-हिंदू याविषयीचा सखोल अभ्यास नाही. अशा माणसाने गोळा केले ते आपल्याप्रमाणेच हिंदुद्वेष्ठ्ये इतिहासकार. शिवाजी घटिया, औरंगजेब अच्छा. मुघल अक्रांता आले ते हिंदूंना वाचविण्यासाठी, कुणापासून तर चेंगेज खानापासून. इथपर्यंत खोटा इतिहास लिहिला गेला. त्यांच्यानंतरही प्रत्येक शिक्षणमंत्री झाला तो मुसलमानच. याच नेहरूवादी काँग्रेसच्या पुढच्या मुस्लीम धार्जिण्या पिढीने वक्फसारख्या मुस्लिमांना पूरक असंख्य कायदे आणले. नेहरू-गांधी घराण्यांनी अगदी २०१४ पर्यंत हिंदूंच्या उरावर बसून हिंदुत्वास नामोहरम करण्याचा अट्टहास केला. पण भारत तुटला नाही, हिंदुत्व झुकले नाही. एकदा तुटला तो मुसलमानामुळे. तरीही मुसलमान हेच सच्चे भारतीय, असे काँग्रेस देशात रुजवते.

२०१४ मध्ये नरेंद्र दामोदरदास मोदी सत्तेत आले आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्व पुनर्जीवित होऊ लागलं. मोदी काँग्रेसच्या मानसिकतेविरुद्ध लढले. अधर्म, निधर्मीपणा, नास्तिकता यावर आघात केला. नेहरूवादी इतिहास पुसून भारताची, हिंदूंची विजयी गाथा सकारात्मकपणे लिहिण्याचे कार्य हाती घेतले ते अगदी पाठ्यपुस्तकाद्वारे अभ्याक्रमात. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ असा प्रयत्न केला. पुरेपूर फायदे घेऊनही मते मिळत नाहीत हे लक्षात आल्यास आता ‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे, सेफ रहेंगे’ ही टोकाची भूमिका घेतली. यास लोकसभेच्या निवडणुकांनंतर देशातील बहुसंख्य हिंदूंनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील कडवा हिंदू जागा झाला अन् महाविकास आघाडीवर बुलडोझर चालवला. त्यात उद्धव ठाकरेंसारख्या वाट चुकलेल्या अन् काँग्रेससारख्या असंगताशी संगत केलेल्या राजकारण्यास जमीनदोस्त केला. उद्धव ठाकरे आपण हिंदुत्वास कमी लेखत इस्लामला डोक्यावर घेतले. हा आपला महामूर्खपणा, वर छातीठोकपणे म्हणता, कोरोना काळात माझे ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल असे वाटले नव्हते. कोणत्या रागापोटी ही लाट उसळली कळत नाही. उद्धवजी तुम्हाला कळणारही नाही. कोरोना काळात इतका गर्व वाटावा असे कोणते तारे आपण तोडले हे जगाने पाहिले आहे. त्याचा उल्लेख करणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेणे. हेही आपणास कळत नाही. कारण तुमची आकलनशक्ती मर्यादित आहे, शिवाय आपण ज्यांना जवळ केलेत ते सारे हुजरे, चाटुकार, बोलघेवडे, खुशमस्करे, स्पष्ट वक्ते व आपल्या चुका दाखविणाऱ्यांस खड्यासारखे आपण बाजूला सारलेत. अशाने आपला स्वतःचा घात केलात, बाळासाहेबांची शिवसेनाही बुडवली.

लोकसभा २०२४ निवडणुकीमध्ये धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव साधारण ३८०० मतांनी निवडून आल्या. भाजपाच्या सुभाष भांबरे यांचा पराभव झाला. या मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. पैकी ५ मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपा साधारण १ लाख ७५ हजार मतांनी आघाडीवर होती. मालेगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आणि ही आघाडी ओलांडून काँग्रेस विजयी झाली. ही किमया मालेगावातील बहुसंख्य असलेल्या मुसलमानांनी केली. त्यानंतर आले बटेंगे तो कटेंगे आणि त्याच लोकसभा मतदारसंघातील पुढे विधानसभा निवडणुकीत ६ पैकी, भाजपा ४ + शिवसेना १ असे ५ महायुतीचे उमेदवार प्रचंड मताने निवडून आले व एकमेव मुस्लीम उमेदवार ओवेसीच्या मुस्लीम पक्षाचा तोही केवळ १६२ मतांनी निवडून आला, तो मालेगाव येथून. दुसरे उदाहरण उत्तर प्रदेशचे, जेथे हिंदू-मुसलमान व बटेंगे तो कटेंगे हे विषय ऐरणीवर आले. तेथे ९ ठिकाणी विधानसभेच्या पोट निवडणुका संपन्न झाल्या. यापूर्वी यातील ६ ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार होते. यातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी विधानसभा मतदारसंघात निवडणूक होती. येथे ६२ टक्के म्हणजे २ लाख २१ हजार मुसलमान मतदार. तेथे एकूण मतदान झाले १ लाख ७० हजार ३७१. यातील समाजवादी पार्टीचे मोहम्मद रिझवान यांना केवळ २६,५८० मते, तर भाजपाचे रणबीर सिंग यांना १,४०,७९० मते, भाजपा जिंकली. हिंदू एकवटलेच पण मुसलमानही समजून चुकले अन् त्यानुसार मतदान केले. ३०-३२ वर्षे येथे भाजपातर उमेदवार निवडून येत. महत्त्वाचे म्हणजे ९ पैकी ७ ठिकाणी भाजपा व केवळ २ ठिकाणी समाजवादी विजयी झाले. हा आहे ‘बटेंगे तो कटेंगे’चा इफेक्ट. यापुढचे राजकारण व यश-अपयश असेच चालत राहणार.

उद्धवजी ऐन मोक्याच्या समयी आपली बुद्धी भ्रष्ट झाली. नरेंद्र मोदींच्या मुळे २०४७ पर्यंत मुस्लिमांचा ‘गजवा-ए-हिंद’ अर्थात भारताचे इस्लामीकरण उघडे पडत असताना आपण मुस्लीमधार्जिणे झालात. मुस्लीम मतांसाठी सडकछाप मौलाना सज्जाद नोमानी यास डोक्यावर घेतले. त्यांच्या इस्लामिक १७ देशविरोधी फतवे मान्य केले. म्हणालात वक्फची एक इंचही जमीन सरकारला घेऊ देणार नाही. उद्धवजी अशा आपल्या वागण्या-बोलण्याने हिंदू धर्मियात आपली प्रतिमा ‘मुसलमान परवडला पण हा बाटगा अधिक धोकायदाक’ अशी झाली आहे. आपणास पालघर हत्याकांडात बळी गेलेल्या साधूंची हाय लागलीच शिवाय अशाच कारणास्तव लाखो साधू-संतांचे श्रापही भोवले. इतका गंभीर विषय आपण हसण्यावारी नेलात. आपल्या कृतीने घायाळ कंगना राणावत या महिलेचे शब्द आठवतात का, “उद्धव ठाकरे, यह समय का पहिया हर समय एक जैसा नही चलता, आज तुने मेरा घर तोडा, कल तेरा घमंड टुटेगा.” साधुसंतांचे आणि दुखावलेल्या महिलांचे शाप हलक्यात घेऊन चालत नाही, हे आपणास कळायला हवे होते. अदानी-अदानी करत त्यांच्या नावाने खडे फोडलेत, हरल्यानंतर म्हणालात त्यांच्या पैशाने आम्हाला हरवले. ऐवजी शांत राहून जिंकला असता व त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे उचित ठरले असते. बैलापुढे गाडी जुंपली हे तुमचे राजकीय ज्ञान.

एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा म्हणालात, घरोघरी जाऊ पक्ष पुन्हा उभा करू. यासाठी आपल्याकडे अडीच वर्षांचा कालावधी उपलब्ध होता. ऐवजी आपण सरळ निवडणुकीवेळी जागे झालात. ही आपली परिश्रम करण्याची तऱ्हा. भाजपसंगे होतात त्यावेळी आपला मान-सन्मान राखला जाई. देशाचे गृहमंत्री अमित शहा जे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे म्हणजे भाजपाचे अध्यक्षही, आपल्यापेक्षा प्रचंड शक्तिमान आहेत. शिवाय भाजपाशासित देशातील २३ राज्यांवर विजय संपादन करण्याची किमया त्यांनी केलेली, तरी ते मातोश्रीवर येत. त्यांना आपण हेतूपुरस्सर रखडवून ठेवत. त्यांच्याबरोबर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेदरम्यान बाहेर बसवून ठेवत. असा अपमान सहन करूनही निव्वळ बाळासाहेबांच्या आदरापायी ते आपल्याकडे येत असत. आज आपण महाविकास आघाडीत आहात. कोण मातोश्रीवर येतो? याउलट आपणासच त्यांचे उंबरडे झिजवण्यासाठी दरोदार फिरावे लागते. शरद पवारांनी तर आपणास दरवाजावरून बाहेर हाकलले होते. मान तुकवून मुकाट्याने आपण बाहेर गेलात. हे जगानेही पाहिले आहे. स्वतःची किंमत आपणास राखता आली नाही आणि हातचे घालवून बसलात. २०१९ ला भाजपा-शिवसेना युतीस मतदारांनी प्रचंड मताधिक्याने सत्ता हाती दिली होती. केवळ खुर्चीच्या हव्यासापोटी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेलात, गद्दारी केलीत. ती केली नसती तर त्याचवेळी तुम्ही, नाहीतरी आदित्य उपमुख्यमंत्री झाला असता, तर आज २०२४ निवडणुकीपूर्वी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागितले असते, तर मोठ्या मनाने मोदीजींनी ते मान्य केले असते आणि आपली शिवसेनेस मुख्यमंत्री पद ही इच्छा पूर्ण झाली असती. पण आपल्या उतावळेपणाने घात केला. मुख्यमंत्री पदासाठी आपणच कोलांटउडी मारली. यात खरे नुकसान झाले ते आदित्यचे. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रिमोटच्या सन्मानास आपण पात्र झाला असता. असो.

आता लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. येथे वक्फ बिलावर चर्चा होणार आहे. ही आपली चूक सुधारण्याची चालून आलेली पहिली नामी संधी असेल. मागील वक्फ बिल चर्चेदरम्यान आपण सभात्याग केला होतात. स्पष्ट मुस्लीमधार्जिणी भूमिका न घेतल्याने आपल्या मुस्लीम मतदारांनी मातोश्रीवर संताप व्यक्त केला होता. यंदा काय कराल यावर समस्त हिंदूंचे लक्ष आहे. आपली राजकीय आकलन क्षमता येथे सिद्ध होईल. एक पाऊल मागे येऊन तडजोडीची भूमिका घेऊन चार पावले पुढे जाणे वा राजकीय आत्महत्या करणे, एवढे दोनच मार्ग आपल्या पुढे आहेत. पाहू तडजोड जिंकते की अहंकार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -