Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीनिर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे

निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की, आपण गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणोपासनेत स्वत:चा विसर पडला की, एकीकडे ‘ मी ’ नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो, आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे. स्वत:चा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी दुसरे कोणते राहिले? परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण, निर्गुण, दोन्ही कुठे गोड लागतात? ‘सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो’ म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुत: तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात, त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे?

परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते. एखादा नास्तिक जर म्हणाला की, ‘देव नाहीच; तो कुठे आहे हे दाखवा, ’ तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की, ‘ देव कुठे नाही हे दाखवा. ’ पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणाऱ्यालासुद्धा, त्या स्वरूपाचे काही तरी आहे ही जाणीव असतेच; फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावे देऊन तो त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण ‘ देव ’ नाही असे तो म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणाऱ्याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणाऱ्याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून, मूळ वस्तूचे वर्णन स्वत: अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा कर्ता आहे असे समजून, आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.

तात्पर्य: निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही. म्हणून ते अवताररूपाने, अथवा संतरूपाने, सगुणरूप घेऊन येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -