पुणे : महाराष्ट्र नवनिर्माणाची स्वप्ने पाहणाऱ्या मनसेला (MNS) विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. २८८ पैकी १२८ जागा लढविलेल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभेच्या मैदानात उतरले होते, मात्र मतदारांनी नाकारल्याने त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघातून मनसेने उमेदवार निवडणुकीत उतरविले होते, मात्र तेथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केला आहे.
Eknath Shinde : मोदी-शाहांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य – एकनाथ शिंदे
महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवली जाईल, या भ्रमात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले. त्यामुळे निवडणुकीची फारशी तयारी झाली नाही. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. मात्र एकही जागा मनसेला मिळाली नाही.
निवडणुकीत पक्षाची (MNS) वाताहात झाली असून, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. या पार्श्वभूमीवर पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक गुरुवारी बोलवण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता असून पुणे शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मनसेचे पराभूत उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.