Sunday, February 9, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीनको देवाची परीक्षा तोच उतरवेल तुमचा नक्षा

नको देवाची परीक्षा तोच उतरवेल तुमचा नक्षा

समर्थ कृपा – विलास खानोलकर

सोलापूरचे बापूराव हे भगवद्भक्त होते. ते गाणगापुरास किंवा अक्कलकोटास जाणारा यात्रेकरू भेटल्यास त्याचे चांगले आतिथ्य करीत. एकदा ते अक्कलकोटास जात असता, दोन गृहस्थ भेटले. त्यातील एकाचे लग्न झाले नव्हते. आणि दुसरा दारिद्र्याने फार पिडलेला होता. वाटेत जाताना पहिला गृहस्थ म्हणाला,’अवतारी आहे असे म्हणतात, माझे वय चाळीस वर्षांचे असून माझेजवळ पैसेही पुष्कळ आहे; परंतु लग्न होत नाही.’ दुसरा म्हणाला,’मला लिहिणे, वाचणे वगैरे येत असूनही चाकरी मिळत नाही. आमची कार्ये झाल्यास स्वामी अवतारी आहेत, असे आम्ही म्हणू.’

स्वामींचा नवयुगाचा संदेश

बापूरावांनी त्यांना सांगितले,‘शपोकळ म्हणणे काही उपयोगाचे नाही. तुम्ही काही तरी नवस करा.’ हे ऐकून ते दोघे म्हणाले,‘आमची कार्य झाल्यास आम्ही श्री स्वामींची वारी करू.’ इतके बोलून ते अक्कलकोटास गेले. श्री स्वामींचे दर्शन घेऊन ते तिथेही हात जोडून उभे राहिले. तोच श्री स्वामी म्हणाले,‘रंडी लेव, तू एके ठिकाणी बैस. संन्याशाची काय परीक्षा करतो… ची’ हे ऐकून ते दोघेजण थरथर कापू लागले. मनात खूण पटातच ते दोघे श्रीमुखावर स्वहस्ते मारून घेऊन कानास दाबून चिमटे घेऊ लागले. श्री स्वामींची वारंवार क्षमयाचना करू लागले. तेव्हा श्री स्वामींनी त्या तिघांसही प्रसाद आणि आशीर्वाद दिला. दोन-चार दिवस तेथे राहून ते आपापल्या गावी निघून गेले. पुढे दोन महिन्यांचे आत एकाचे लग्न झाले आणि दुसऱ्यास उत्तम रोजगार मिळाला. तेव्हापासून ते स्वामीरायांची वारी करीत असत.

भावार्थ : या लीला कथेत बापूराव नावाचे साधे-सरळ निरपेक्ष वृत्तीने वागणारे श्री स्वामी समर्थांचे निष्ठावान सेवेकरी आहेत. अक्कलकोट अथवा गाणगापूरला जाणाऱ्या गरजू यात्रेकरूंचे ते चांगले आतिथ्य करीत. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ दर्शनास जाणाऱ्या त्या दोघां यात्रेकरूंचे बोलणे ऐकून बापूराव त्यांना ऐकवतात, ‘पोकळ म्हणणे काही उपयोगाचे नाही, तुम्ही काही तरी नवस करा.’ त्यांच्या या उद्गाराून त्यांच्या वृत्तीतील जात-कुळीं लक्षात येते. नवस बोलणे अथवा करणे ही एक कनिष्ठ दर्जाची उपासना का असेना, पण त्यात देवाशी बांधिलकी असते. देवाशी केलेला तो एक करार असतो. सामान्य माणसाला, भावणारी, मानवणारी ती एक जनरीत आहे. हेतू सफल होण्यासाठी देवाशी हा नवसाचा करार उपासक करीत असतात. या कथेतील त्या दोघांनी ‘आपला हेतू सफल झाल्यास अक्कलकोटी वारी करू’ असा नवस केला. आपण यातून कोणता अर्थ-बोध घेऊ शकतो? बापूरावांसारखी वृत्ती अंगी बाणण्याची की त्या दोघां गृहस्थासारखी मनोवृत्ती निर्माण होणार नाही याची? सध्या या जगात आपणास असेही काही लोक भेटतात की, जे म्हणतात देव जर सर्वत्र आणि सर्वज्ञ आहे, तर त्याला आमची दुःखे का कळत नाही? त्यासाठी त्यास हाक का मारावी लागते? त्याचा धावा का करावा लागतो? आम्ही सुखात आहोत की दुःखात हे तो सर्वज्ञ आहे म्हणून त्यानेच जाणावे.

आम्ही दुःखात असल्यावर आपण होऊन धावत यावे आणि आम्हाला दुःखमुक्त करावे; परंतु या अशा प्रकारची मनोधारणा असणे सर्वथा चुकीचे आणि कृतघ्नपणाचे आहे. आम्ही देवासाठी काहीच करायचे नाही. (अर्थात देवदेवतांस कुणी काही त्यांच्यासाठी करावे अशी अपेक्षा नसते.) त्याने मात्र आमच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहायचे. हा कुठला न्याय? अर्थात काही लोक देवभक्ती-उपासना करतात. पण १.ती मनापासून नसते. २. ती हिशोबी- मनात काही तरी इच्छा ठेवून केलेली असते. २. ती एखाद्या भयापोटी अथवा कोणत्याही प्रकारच्या असुरक्षितेतून सुरक्षितता मिळावा म्हणून केलेली असते. ४. ती निर्धाराने, सातत्याने, निर्मोहीपणे केलेली नसते.

अशी उपासना देवाकडे रूजूच होत नाही, तर तिचे फळ कसे मिळणार? मग देवालाच दोष देणार दुसरे काय करणार? अशी दिखाऊ, उत्सवी, प्रदर्शनी भक्ती सध्या तरी फार ठिकाणी पाहावयास मिळते. हे सर्व आपणास टाळता येणार नाही का? येईल. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न करावयास हवा. या लीला कथेतील एका जवळ भरपूर पैसाअडका असूनही त्याचे लग्न झाले नव्हते. दुसर्याला लिहिता वाचता येत असूनही म्हणजे तो सुशिक्षित असूनही त्यास नोकरी नव्हती. त्यांनी श्री समर्थांच काय पण अन्य कोणत्याही देवदेवतेची उपासना केल्याचे दिसत नाही. फक्त देव-देवतांनी आपल्या मनोकामना पूर्ण कराव्यात, अशा त्यांच्या वांझोट्या इच्छा होत्या. त्यातही त्यांचा उद्दामपणा होता. एक प्रकारची मग्रुरी होती. ‘आमची कार्ये झाल्यास स्वामी अवतारी आहेत असे आम्ही मानू.’ त्या ब्रह्मांड नायकास त्यांच्या प्रमाणप्रत्राची आवश्यकता नव्हती. पण अशी काही नमुनेदार अविवेकी, काहीही न करता, सर्व काही मिळावे अशी इच्छा असणारी माणसे या जगात तेव्हाही होती, आताही आहेत. देवालाही ठाऊक असते. स्वतःच्या खात्यात उपासना रूपी पुण्याईची कोणतीही शिल्लक नसताना देवाकडून अपेक्षा? देवावरच संशय, देवाला आव्हान? पण त्यांच्याबरोबर असलेल्या बापूरावाने त्यांना कसे बजावले त्याचा सविस्तर उल्लेख वर आला आहे. श्री स्वामी समर्थांनी अंतर्ज्ञानाने त्यांचे हेतू जाणले होते. जो अविवाहित होता त्यास ‘रंडी लेव’ म्हणजे विवाह होईल, असा आशीर्वाद दिला. दुसरा जो सुशिक्षित असूनही बेकार होता त्यास ‘एके ठिकाणी बैस’ म्हणजे नोकरी मिळून स्थिरस्थावर होशील असा आशीर्वाद दिला. पण या अगोदर बापूरावांबरोबर येतांना त्यांनी श्री स्वामी समर्थांबद्दल जी मुक्ताफळे उधळली होती, त्याबद्दल सर्वज्ञ श्री स्वामींस कळल्यावाचून का राहिले असेल? श्री स्वामींना त्या दोघांना अतिशय कठोर शब्दात सुनावले, ‘संन्याशाची काय परीक्षा करतोस?’ श्री स्वामींच्या या सज्जड दमाने ते दोघेही थरथर कापू लागले. पश्चात्तापाने स्वतःच्याच तोंडात मारून घेऊ लागले. ते भयचकित झाले. पण पुढे श्री स्वामींच्या आशीर्वादाने त्या दोघांचे दोनच महिन्यात काम झाले. परमेश्वर, भगवान, परब्रह्म श्री स्वामी समर्थ विश्वव्यापक आहेत. ते सर्व काही जाणतात. त्यांची परीक्षा पाहण्याइतके अथवा त्यांनाच आव्हान देण्याइतके वा त्यांच्यावर संशय व्यक्त करण्याइतके आपण मोठेही नाही आणि समर्थही नाही, याची सुस्पष्ट समज देणारी ही लीला आहे. अंतिमतः श्री स्वामी समर्थ हे किती दयाळू, करुणेचे सागर आणि क्षमाशील वृत्तीचे आहेत, याचेही दर्शन या लीलेतून घडते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -