नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस झाले त्यानंतरही अद्याप महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्याच्या (Chief Minister) चेहऱ्याबाबत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदेंनी या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर हे निश्चित आहे की मुख्यमंत्री भाजपा पक्षाचाच असणार आहे. या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस बसणार की आणखी कोण याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.
४० मिनिटे सुरू होती बैठक
सूत्रांच्या माहितीनुसार सरकार स्थापन होण्याआधी बुधवारी रात्री दिल्लीत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक साधारण ४० मिनिटे सुरू होती.
एकनाथ शिंदे यांची माघार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या चार दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते पत्रकार परिषदेत म्हणाले की मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं. त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.






