Tuesday, June 17, 2025

११ कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एकाला अटक; ३३ डेबिट कार्ड, १२ चेकबुक जप्त

११ कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी एकाला अटक; ३३ डेबिट कार्ड, १२ चेकबुक जप्त

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीची ११ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यांतील ४४ लाख रुपये आरोपींकडे डेबिटकार्ड असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपीकडून ३३ डेबिटकार्ड व १२ चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस तपास करत आहेत.


कुलाबा येथे वास्तव्यास असलेले ७५ वर्षीय तक्रारदार शिप कॅप्टन म्हणून १९८५ मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत काम केले. तेथून ते ऑपरेशन मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांना अनया स्मिथ नावाच्या महिलेने एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले होते. त्यांनी देशातील मोठ्या ब्रोकिंग कंपनीच्या नावाने हा ग्रुप तयार केला होता. या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा होईल, असे आमिष तक्रारदाराला दाखवण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.


महिलेच्या सांगण्यावरून तक्रारदाराने २२ व्यवहारांद्वारे ११ कोटी १६ लाख ६१ हजार रुपये विविध खात्यात जमा केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रक्कम जमा झालेल्या एका बँक खात्यातून ६ लाख रुपये एका महिलेने काढल्याचे निष्पन्न झाले. यावेळी महिलेने दिलेल्या केवायसीच्या माध्यमातून पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी तिने आरोपी कैफ इब्राहिम मन्सुरी (३२) याच्या सांगण्यावरून रक्कम काढल्याचे महिलेने सांगितले. आरोपी कैफ हा मोहम्मद अली रोड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीकडून ३३ डेबिट कार्ड व १२ चेकबुक जप्त करण्यात आले. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या पाच डेबिटकार्डच्या बँक खात्यावर या गुन्ह्यांतील ४४ लाख रुपये आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा