Sunday, June 22, 2025

राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान मोदी, अमित शहांच्या भेटीला

राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान मोदी, अमित शहांच्या भेटीला

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील महायुतीच्या विजयानंतर या दोन्ही भेटी केवळ अभिनंदनासाठी होत्या, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.


संसद परिसरात झालेल्या या भेटींसदर्भात तटकरे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे मोठे यश एखाद्या युतीला मिळाले. तसेच आम्ही महायुतीचा भाग झाल्यापासून अमित शाह यांचे सातत्याने मार्गदर्शन, सहकार्य आहे. त्यामुळे आभार व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेट झाली. अमित शाह हे भाजपचे नेते आहेतच मात्र महायुतीचेही नेते आहेत. योगायोगाने संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. त्यांचेही आभार व्यक्त केले आणि अभिनंदन केले. राज्यातील जनतेने जे यश आम्हाला दिले त्यात पंतप्रधान मोदींचा मोठा वाटा आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, कोणाचे नाव ठरले याबद्दल मला माहिती नाही. आमची भेट केवळ सदिच्छा भेट होती. आमच्या पक्षाने विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांची निवड केली आणि मंत्रिमंडळाबद्दल किंवा सरकारबद्दल निर्णय घेण्याचे सर्वाधिकार अजित पवारांना दिले. तसेच तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहेत, त्यामुळे सरकार स्थापनेला थोडा वेळ लागत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे दीर्घकाळ राज्यात नेते आहेत. त्यांनी अडीच वर्षे सरकारचे नेतृत्व केले आहे. मात्र आकडे भाजपकडे आहेत ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने महायुतीने सरकार आजवर चालवले त्याच पद्धतीने पुन्हा पाच वर्षे सरकार चालेल, पुढच्या दोन दिवसात राज्य सरकारबद्दल निर्णय होईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.


ईव्हीएमवर बोलताना तटकरे म्हणाले की, ईव्हीएमविरुद्ध गळे काढणे म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव आहे. जेव्हा लोकसभेत त्यांना चांगले यश मिळाले तेव्हा त्यांचे कर्तृत्व आणि आम्हाला यश मिळाले तर ईव्हीएमवर दोष द्यायचा हे विरोधकांचे दुटप्पी धोरण आहे. या निवडणुकीत मोठ्या अपेक्षा मविआला होत्या, त्या पूर्ण झाल्या नाही त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला त्यामुळे नैराश्यातून ते बोलत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Comments
Add Comment