Saturday, February 15, 2025
Homeसंपादकीयतात्पर्य‘सॅराडिन फ्रॉइड’ एक मानसिकता

‘सॅराडिन फ्रॉइड’ एक मानसिकता

आजपर्यंत आपण विविध लेखांच्या माध्यमातून मानवी स्वभावातील गुण, दोष, वागणुकीचे प्रकार याविषयी सखोल माहिती घेण्यासाठी अनेक मानस शास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास केला. आता सॅराडिन फ्रॉइड या मानसिकतेची व्यक्ती कशी असते, त्याचे गुणधर्म काय हे आपण काही उदाहरणामार्फत जाणून घेणार आहोत.

फॅमिली काऊन्सलिंग – मीनाक्षी जगदाळे

आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव का, कसा, कशामुळे तयार झाला, त्याची वागणूक त्याच्या कशी अंगावळणी पडली या सर्वांच्या मागे जर काही आहे तर ते प्रत्येक व्यक्तीचे मानस शास्त्र त्याची मानसिकता, वैचारिकता.
सॅराडिन फ्रॉइड या मनोवृत्तीच्या लोकांमध्ये दुसऱ्याचे वाईट झाल्यास अथवा दुसऱ्याचे नुकसान झाल्यास यांना सुख मिळते, आनंद होतो हा गुणधर्म पाहायला मिळतो. याला आपण फक्त जळाऊ वृत्ती म्हणू शकत नाही. जळाऊ वृत्तीमध्ये दुसऱ्याकडे काही आहे याचा आपल्याला त्रास होतो, राग येतो, ते आपल्याकडे नाही याचे वाईट वाटते पण SF मध्ये इतरांचे नुकसान, त्रास, कष्ट पाहून आनंद होतो हा फरक आहे. दुसऱ्याच्या कर्मामुळे, चुकांमुळे त्याच वाईट होत आहे आणि त्याचा, त्याच्या परिस्थितीचा आपल्याला फायदा होणार आहे यातून SF मानसिकतेची व्यक्ती खूश होते.

BMC :महाविजयानंतर आता मिशन महापालिका

ही मानसिकता तयार होण्यासाठी तीन मूलभूत कारणं असतात. ती म्हणजे इतरांबद्दल खूप क्रोध, राग, दुसरे म्हणजे प्रचंड दुश्मनीची भावना आणि तिसरे म्हणजे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. दुसऱ्याचे वाईट झाले म्हणजे आपल्याला न्याय मिळाला हा दृष्टिकोन.

आपल्या विरोधातील, आपला प्रतिस्पर्धी, आपल्याला ज्याचा राग आहे जो आपला दुश्मन आहे त्याचे कधीच चांगले होऊ नये या वैचारिक, मानसिक दृष्टीने सतत विचार करण्याची विकृती अशा लोकांमध्ये आढळते. असे लोकं सतत आपले विरोधक, दुश्मन, शत्रू यांचा विचार करणे, त्यांच्या हालचाली, त्यांचे कामं, काय चालले, काय बोलले, कसे वागले यावर लक्ष ठेवून असतात आणि सतत त्यांच्याबद्दल अनुमान, अंदाज घेत असतात. स्वतःपेक्षा स्वतःच्या कामापेक्षा यांचे प्रतिस्पर्धींवर जास्त लक्ष असते. त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे लोकं सतत प्रयत्नशील असतात आणि इरी शिरीला जाऊन त्यांच्याबद्दल बोलत असतात. दुसरा कोणत्याही कारणाने जरी तोट्यात गेला तरी तो आपल्याला विरोध करत होता, आपला शत्रू होता म्हणूनच त्याचे तसे झाले हे ठासून अशा लोकांच्या मनात भरलेले असते. आपल्या विरोधात आहे म्हणून समोरचा वाईट आहे असा यांचा पक्का समज असतो.

प्रत्येकाला स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची, समाजाची, धर्माची, जातीची, पक्ष, प्रांत, राज्य, गाव यांची प्रतिमा कायम स्वच्छ आणि चांगली, सुरक्षित ठेवायची असते. त्यामुळे आपल्या बाबतीत काहीही अनुचित घडले तर आपण न्याय पाहिजे म्हणून त्यावर आवाज उठवायला तत्पर असतो. जी व्यक्ती आपल्या सुरक्षेला, प्रतिष्ठा, स्थान याला छेद देणारी असते ती आपल्यावर अन्याय करणारी आहे हे आपले ठाम मत असते. यांनी आपले ऐकले नाही, आपल्या मनाप्रमाणे ते वागले नाहीत म्हणजेच आपल्यावर अन्याय झाला या भूमिकेतून आपण विचार करतो आणि कोणत्याही कारणास्तव त्या व्यक्तीचे वाईट झाले की, आपल्याला न्याय मिळाला अशी भावना आपल्यात जागृत होते. अशा मानसिकतेमध्ये असणारे लोकं सतत आपल्याला अन्याय सहन करावा लागला आहे आणि तो ज्याच्यामुळे सहन करावा लागला त्याचे कधी वाईट होते याकडे लक्ष ठेवून असतात.

मित्रांच्या ग्रुपमध्ये एकालाच कायम कमी गुण मिळतात पण जर दुसऱ्याला पण कमी गुण मग ते कोणत्याही कारणास्तव मिळाले तरी कायम कमी गुण मिळणारा विद्यार्थी आनंदी होतो. त्याला स्वतःला कमी गुण मिळाल्याच्या दुःखापेक्षा दुसऱ्याला कमी मिळालेत याचा आनंद जास्त असतो.

एखादी व्यक्ती लोकांना लुबाडून मोठी झाली तरी लोकं तिचे वाईट कधी होईल याची वाट पाहतात. तो त्याच्या कर्माची फळं नक्कीच भोगेल वगैरे बोलतात. आता ही व्यक्ती कोणत्याही इतर कारणामुळे जरी अपयशी झाली, तिचे नुकसान झाले तरी लोकांना वाटते आपल्याला फसवलं होतं म्हणूनच झालं, बर झालं. अशी मानसिकता आपण अनेकदा पाहतो. अत्यंत वरवरचा अंदाज आणि माहितीतून लोकं असे निष्कर्ष काढत असतात. त्या व्यक्तीसोबत खरच काय झालं, का झालं, त्याने नेमकं काय काय केले आहे याच्या खोलात न जाता पूर्ण माहिती न घेता कर्म नशीब संकल्पना जोडून तो विषय भलतीकडे वळवून आपल्या मनाचे खोटे समाधान लोकं करून घेतात.

कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सतत कोणीतरी आपला शत्रू आहे, विरोधात आहे, आपल्याला त्रास देणार आहे, आपल्या वाईटावार आहे ही भावना अशा लोकांना सतत जाळत असते. प्रत्येकजण यांच्याविरुद्ध कट कारस्थान, राजकारण करत आहे याचीच सतत यांना भीती असते. अशा स्वभावामुळे हे लोकं इतरांना जास्तीत जास्त लोकांना आपले दुश्मन, शत्रू समजणे, सतत वेगवेगळ्या चाली वापरणे, सतत खोट्या भ्रमात जगणे, खोटं दाखवणे, चुकीचे भासवणे, इतरांची दिशाभूल करत राहणे, सत्य लपवणे यात व्यस्त राहतात. सतत आपल्याला अन्यायाला सामोरे जावे लागत आहे हेच तुणतुणे हे लोकं वाजवत असतात. वास्तविक असे काहीही नसले तरी त्यांनी स्वतःचा पक्का ग्रह कधीही न बदलण्याचा निर्धार केलेला असतो.

त्यामुळे आपण स्वतःला अशा मानसिकतेपासून दूर ठेवणे, आपल्या आजूबाजूला असे लोकं असल्यास त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. अशी लोकं वेळेत ओळखून त्यांच्या बोलण्यात न येणे, पूर्ण विश्वास न ठेवणे हे आपल्याला जमणे आवश्यक आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -