Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत दोन दिवस या...

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत दोन दिवस या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद;

मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. तब्बल २२ तास मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. येणाऱ्या गुरुवारी (२८ नोव्हेंबर) आणि शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) या दिवशी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद पूर्णपणे राहणार आहे. पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये चांगला पाऊस झाला. तलाव पूर्ण भरून त्यात मुबलक पाणीसाठाही उपलब्ध झाला. मात्र आता मुंबईत अनेकवेळा जलवाहिनी गळती आणि इतर कारणांमुळे पाणीपुरवठ्यावर खूप परिणाम होतो.

लोअर परळ परिसरामधील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे २८ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजल्यापासून २९ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल २२ तासांच्या कालावधीत जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील करी रोड, लोअर परळ, प्रभादेवी इत्यादी परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यापूर्वी नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि त्याचा गरजेप्रमाणे काटकसरीने वापर करण्यात यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

या विभागात पाणीपुरवठा राहणार बंद

जी/ दक्षिण विभाग : करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

जी/ दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी २.३० ते दुपारी ३.३०) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

जी/दक्षिण विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ३.३० ते संध्याकाळी ७.००) पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

जी/उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – दुपारी ३.३० ते संध्याकाळी ७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

जी/उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.००) पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -