Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीBMC : लिपिक पदाच्या १८४६ पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

BMC : लिपिक पदाच्या १८४६ पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) विधानसभा निवडणूक पार पडल्याबरोबर लगेचच पालिकेच्या विविध खात्यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी २ ते ६ डिसेंबर दरम्यान तसेच ११ आणि १२ डिसेंबरला परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या परीक्षेमध्ये पात्र ठरणारे उमेदवार हे सर्व प्रकारच्या कागदोपत्री तपासणी अखेर महापालिकेत लिपिक पदावर काम करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून १८४६ लिपिक पदे रिक्त राहिल्याने त्याचा पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर विपरित परिणाम होत होता. पण आता लिपिक पदावर नव्याने पात्र उमेदवार आपले काम करण्यासाठी पालिका सेवेत दाखल होणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये असलेल्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावेत आणि वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रावर निश्वित वेळेत उपस्थित राहावे, असे महापालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून २० ऑगस्टपासून ९ सप्टेंबर २०२४ दरम्यान तसेच सुधारित जाहिरातीनुसार, २१ सप्टेंबर २०२४ पासून ११ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते.

सदर अर्ज प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी २ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान तसेच ११ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधी दरम्यान रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे.

या ठिकाणी उमेदवाराने केलेल्या अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करता येणार आहे. लॉगिन केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेश पत्रावर उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी. दरम्यान, उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी ९५१३२ ५३२३३ हा मदत सेवा क्रमांकही जारी करण्यात आलेला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत (१.३० ते २.३० वाजेपर्यंतचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महापालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -