सेन्सेक्स- निफ्टी तेजीत, गुंतवणूकदार मालामाल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपा- महायुतीच्या विजयानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजाराने (stock market) जोरदार सलामी दिली. सोमवारी ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्सने सुमारे १,३०० अंकांनी वाढून ८०,४७३ च्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४१३ अंकांनी वाढला. सुरुवातीची सेन्सेक्स- निफ्टीची ही वाढ अनुक्रमे १.६ टक्के आणि १.७ टक्के एवढी होती. त्यानंतर सेन्सेक्स ९९२ अंकांच्या वाढीसह ८०,१०९ वर बंद झाला. तर निफ्टी ३१४ अंकांच्या वाढीसह २४,२२१ वर स्थिरावला.
निफ्टी पीएसयू बँक ४ टक्के वाढला. निफ्टी बँक २ टक्के, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांकात १.८ टक्के वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप १.६ टक्के तर स्मॉलकॅप १.८ टक्के वाढला. निफ्टी ५० निर्देशांकाने २४,३५१ अंकांपर्यंत वाढ नोंदवली.
गुंतवणूकदारांच्या आशावादामुळे बाजार तेजीत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप- महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजपला १३२, शिंदे शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला केवळ ४६ जागा मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला २०, काँग्रेस १६ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला १० जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीच्या विजयानंतर गुंतवणूकदारांच्या आशावादामुळे निफ्टी, सेन्सेक्समध्ये वाढ झाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
8th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे लवकरच येणार ‘अच्छे दिन’!
कोणते शेअर्स टॉप गेनर्स?
आज (stock market) सेन्सेक्सवर एलटीचा शेअर्स टॉप गेनर ठरला. हा शेअर्स ४ टक्के वाढला. त्याचबरोबर एसबीआय, अदानी पोर्ट्स, रिलायन्स, पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस, कोटक बँक, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एम अँड एम हे शेअर्स १ ते ३.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, मारुती या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.