Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीशुभमंगल सावधान! ८ महिन्यांत लग्नासाठी तब्बल ७० मुहूर्त

शुभमंगल सावधान! ८ महिन्यांत लग्नासाठी तब्बल ७० मुहूर्त

अमरावती : दिवाळी झाली आणि त्यानंतर तुळशीचे लग्नही पार पडले. यासोबतच राज्यात लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणूकही पार पडली. लोकांनी एकमताने महायुतीच्या पारड्यात मते टाकली. यावर्षी १७ नोव्हेंबरपासून लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून, पुढील आठ महिन्यांत जवळपास ७० मुहूर्त आहेत. यातील तब्बल २४ मुहूर्त फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यांमध्ये आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या डोक्यावर यंदा नोव्हेंबरपासूनच अक्षता पडण्यास प्रारंभ होणार आहे.

यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा आहे. त्या अनुषंगाने विवाहेच्छुकांची तयारी जोमात सुरू आहे. यंदा सर्वाधिक विवाह मुहूर्त जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल व मे महिन्यांत आहेत. अशावेळी वधू-वरांच्या आई-वडिलांकडून सर्वच मुहूर्ताना विशेष अशी पसंती दिली जात आहे. मात्र, यंदा नवीन वर्षात मे महिन्यात मुहूर्त अधिक असल्याने सर्वाधिक लग्न मे महिन्यातच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लग्न जुळलेल्या मुला-मुलींच्या कुटुंबीयांनी मंगल कार्यालयासह लग्नासाठीचे बुकिंग सुरू केले आहे. त्या अनुषंगाने उपवर मुला-मुलींच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत तुळशी विवाह पार पडला. भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणीही झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गुंतलेले पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते निवांत झाले आहेत.

लग्नाच्या अनुषंगाने दागिने आणि वस्त्र खरेदी दसरा आणि दिवाळीच्या काळात अनेकांनी केली. त्याचबरोबर लग्न समारंभ आयोजनाचे नियोजन सुरू आहे. वन्हाडी मंडळींच्या वाहनांची व्यवस्था, मंगल कार्यालय, वाजंत्री, इव्हेंट, फोटोशूट आदी विषयांवर नियोजन केले जात आहे. यंदा जूनपर्यंत ७० विवाह मुहूर्त आहेत. याशिवाय इतर तारखांबाबतही पुरोहितांकडे कुंडल्या दाखवून चौकशी केली जाते व सोयीनुसार मुहूर्त काढले जात आहेत.

सुसज्ज मंगल कार्यालयांना पसंती

सर्व सुविधा असलेले सुसज्ज मंगल कार्यालय, पार्किंगसाठी प्रशस्त जागा, सुरक्षितता, वीजपुरवठा या बाबींना महत्त्व दिले जात आहे. अनेक कुटुंबांनी तर, मागील सहा महिन्यांपासून नियोजन करत यंदाच्या तुळशी विवाहानंतरच्या तारखांनुसार मुहूर्त काढून मंगल कार्यालयांचे बुकिंग केले आहे.

यंदाचे विवाह मुहूर्त याप्रमाणे

नोव्हेंबर : २५, २६, २७.

डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २२, २३, २४, २६.

जानेवारी : १६, १७, १९, २१, २२, २६.

फेब्रुवारी : ३, ४, ७, १३, १६, १७, २०, २१, २२, २३, २५.

मार्च : १, २, ३, ६, ७, १२, १५, २६,

एप्रिल : १४, १८, १९, २०, २१, २२, २५, ३०,

मे: १, ५, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १६, १७, २०, २३, २४.

जून : २, ४, ६, ८.

वैशाखातील मुहूर्ताला पसंती

मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांना सुटी असते. त्याचबरोबर वैशाखाचा महिना असल्याने या काळातील मुहूर्त साधण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. गेल्यावर्षी मे महिन्यात वैशाखात मुहूर्त नव्हते. मात्र, यंदा नवीन वर्षात मे महिन्यात अधिक मुहूर्त असल्याचे लक्षात घेत या महिन्यातील तारखांबाबत पुरोहितांकडे वर-वधूकडील मंडळी चौकशी करून मुहूर्त काढत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -