Monday, February 10, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वशेअर बाजारात बाऊन्स बॅक

शेअर बाजारात बाऊन्स बॅक

डॉ. सर्वेश सुहास सोमण

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी जबरदस्त वाढ दिसून आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. सेन्सेक्सने १,९६१ अंकांची उसळी घेतली. ट्रेडिंग दरम्यान तो २००० अंकांच्या वर गेला होता. त्याचवेळी निफ्टीने ५५० हून अधिक अंकांची उसळी घेत २३,९०० चा टप्पा पार केला. गेल्या ५ महिन्यांतील बाजारातील ही सर्वात मोठी वाढ आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात ७.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ब्रॉडर मार्केटमध्येही तेजी होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक १.२६ टक्क्यांनी व स्मॉलकॅप निर्देशांक ०.९० टक्क्यांनी वधारत बंद झाला. सर्व क्षेत्रीय निर्देशांकही वधारले. आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू, रियल्टी, धातू आणि एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १,९६१.३२ अंकांनी वाढून ७९,११७.११ वर बंद झाला. तर निफ्टी ५५७.३५ अंकांनी वधारून २३,९०७.२५ वर बंद झाला.

शेअर बाजार वाढ होण्याची कारणे –

१. मजबूत यूएस कामगार बाजार डेटा –
यूएस लेबर मार्केटच्या भक्कम डेटामुळे आज भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात यूएसमधील सुरुवातीच्या बेरोजगारीचे प्रमाण ६,००० ने घसरून २,१३,००० वर आले आहेत. ही ७ महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. त्यामुळे आज निफ्टीच्या आयटी निर्देशांकात सुमारे २ टक्क्यांनी उसळी घेतली.
२. सकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेत-
जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आज गुंतवणूकदारांच्या भावना सुधारल्या. गुरुवारी अमेरिकन बाजार सकारात्मक ट्रेंडसह बंद झाले. आशियाई बाजारात, एशिया डाऊ निर्देशांक ०.७० टक्क्यांवर व्यवहार करत होता, तर जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.६३ टक्के वाढीसह व्यवहार करत होता दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक देखील ०.९४ टक्के वधारला.
३. खालच्या पातळीवर खरेदी –
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर खरेदी खालच्या पातळीवर दिसून आली.
पुढील आठवड्याचा विचार करता २४५०० ही निफ्टीची महत्त्वाची विक्रीची पातळी असून जोपर्यंत ही पातळी ओलांडून निर्देशांक स्थिरावत नाहीत तोपर्यंत निर्देशांकाची दिशा मंदीचीच राहील.
२३५०० ही खरेदीची पातळी असून मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या तेजीनंतर जोपर्यंत ही पातळी तुटत नाही तोपर्यंत निर्देशांकात मोठी घसरण होणार नाही.
(सुचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -