BMC :महाविजयानंतर आता मिशन महापालिका

Share

अल्पेश म्हात्रे

महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून महायुतीने महाआघाडीचा पूर्णपणे धुव्वा उडवला. या निकालाद्वारे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी आपली ओरिजिनल शिवसेना असल्याचे सिद्ध करून दाखवले. त्याचप्रमाणे अजित पवार यांनीही खरे राष्ट्रवादीचे वारसदार आपणच आहोत हे या निकालाद्वारे दाखवून दिले. उद्धव ठाकरे नेहमी जनतेच्या न्यायालयात निर्णय होईल असे आव्हान देत होते. त्या आव्हानाला शिंदे यांनी मूहतोड जवाब देत परतवून लावले. मुळात शिंदे यांच्याबरोबर गेलेले बहुतांश आमदार पुन्हा निवडून आल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून गद्दार म्हणणे हे कसे चुकीचे होते ते या निकालाने स्पष्ट केले. अजित पवारांनी देखील शरद पवार यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आमदार जिंकून आणत आपला वेगळा ठसा उमटविला.
उद्धव ठाकरे यांना आतातरी ग्राऊंडवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची किंमत कळली तरी पुरेसे आहे. राजकीय पक्ष घरातून चालत नाही तर त्यासाठी खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावे लागते आणि ते एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले. नेत्याला कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते ओळखणे महत्त्वाचे असते. शिंदे यांनी हे लक्षात घेऊन तळागाळापर्यंतच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा विश्वास संपादन करीत हा विजय मिळविला. भाजपाचे महाराष्ट्रातील चाणक्य आपणच असल्याचे सिद्ध करीत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या समोर कोणताही इगो न बाळगता आपला मोठा पक्ष असूनही केंद्रातील आपल्या पक्षश्रेष्ठींचा मान राखीत एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली. खरे तर उद्धव ठाकरे यांनी यावरून काही बोध घेण्याची गरज आहे. केवळ मी आणि मीच हा अट्टाहास पक्षाच्या ऱ्हासाला कसा कारणीभूत ठरतो हे या निकालाने दाखवून दिले.

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरातून कारभार चालविला, तर एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत पायाला भिंगरी लावल्यासारखा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यात विकासाच्या कामांना प्रथम प्राध्यान्य देत सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारला विश्वासात घेत आपले दोन्ही जोडीदार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन, सल्ला घेत त्यांनी यशस्वी राज्यकारभार चालविला. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेकार युवकांना लाडका भाऊ योजनेतून आर्थिक सहाय्य आणि सगळ्यात महत्त्वाची विजयाला सोनेरी किनार लाभलेली लाडकी बहीण योजनांमुळे हा देदीप्यमान विजय मिळविता आला. केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात विरोधकांचा सुपडा साफ झाला. या विजयात एका महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे, भाजपाची बंधू संघटना आरएसएसच्या स्वयंसेवकांनी या निवडणुकीत जीव ओतून काम केले. त्याचाही परिणाम निवडणुकीच्या विजयात दिसला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी तसेच आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष व इतर सर्व समविचारी लोकांची मोळी बांधत ‘एक है तो सेफ है” म्हणत विजय मिळवीत ते सिद्ध करून दाखवले गेले. नुसते शरीराने नव्हे, तर मनानेही आणि विचाराने आम्ही एक आहोत हे या निवडणुकीच्या महाविजयाने दाखवून दिले. मात्र आता शांत न बसता दुप्पट काम करण्याची जबाबदारी या सर्वांवर आली आहे. लोकसभा विधानसभेनंतर आता मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवून मुंबईकरांच्या आशा व अपेक्षा कशा पूर्ण करता येईल याकडे पाहण्याची वेळ आली आहे. देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही गेल्या दोन वर्षांपासून झालेली नाही. सध्या तेथे प्रशासकीय राज आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड व त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती व जनमानसातील प्रतिमा यामुळे काही ना काही कारणांमुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येत नव्हती मात्र आता जनतेनेच सकारात्मक निर्णय दिल्यामुळे आता तरी निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे. त्या पुढील दोन ते तीन महिन्यात होतील ही निश्चितच अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर ही परिणाम होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कठीण जाईल यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे आहे तो महापालिकेतील गड राखणे व ऊबाठा गटाला कठीण जाईल. विधानसभा निवडणुकीतील प्रभावाचा बदला घेणे आता उबाठा गटाला तेवढे सोपे नाही. जागतिक पातळीवर मानाचे स्थान असलेल्या मुंबईमध्ये आज घडीला अनेक समस्या भेडसावत आहेत. मुंबईतील लोकसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पाणी प्रश्न गंभीर होत आहे. पाण्याचे कोणते स्तोत्र वाढत नसल्याने आहे त्या पाण्यात भागवणे दिवसेंदिवस मुश्किल होत चालले आहे. मुंबईतील वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे त्यावर एक तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुंबईतील कचऱ्याची समस्या आजही सुटू शकलेली नाही. आहे ते डम्पिंग ग्राऊंड बंद करणे तसेच नवीन डम्पिंगसाठी जागा नसल्याने कचऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी हे नित्यनेमाचे दुखणे झाले आहे. मुंबईतील अनेक प्रकल्प रखडत रखडत सुरू आहेत. नवनवीन सुरू झालेल्या मेट्रो सेवा ही वाहतूक कोंडी सोडवू शकलेल्या नाहीत. मोडकळीस झालेल्या इमारतींचा प्रश्न असो की झोपडपट्ट्यांचे एसआरए प्रकल्प असो. असे अनेक प्रश्न सध्या मुंबईला भेडसावत आहेत. त्यात मुंबई महापालिकेतील अर्थकारण हे सुद्धा महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहेत व प्रकल्पांवरील खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसणे कठीण होत चालला आहे तसेच मुंबईकरांना सध्या नगरसेवक नसल्याने त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे कठीण होत चालले आहे. म्हणून लवकरात लवकर मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणे आवश्यक आहे. मुंबईतील परिवहन सेवा असलेल्या बेस्ट सेवेचा बोजवारा उडला आहे. वाढत्या खाजगीकरणामुळे बेस्ट सेवेची अक्षरशः वाताहत झाली आहे. त्यात नगरसेवक नसल्यामुळे बेस्ट समिती नाही तसेच कोणताही कायम टिकणारा बेस्ट महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रमाला मिळत नाही. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना सध्या दिव्यातून जावे लागत आहे. बेस्ट बसचा ताफा वाढत नाही. खासगी कंत्राटदार बेस्ट सोडून जात आहेत. अशा असंख्य समस्या बेस्ट पुढे आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता तरी घेणे गरजेचे आहे. केंद्रात भाजपाची सत्ता व राज्यातील भाजपा व महायुतीची सत्ता आहे त्यामुळे जर पालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर घेतल्या, तर सत्ताधारी पक्षाला ते सोयीचे ठरणार आहे व मुंबईकरांच्याही ते सोयीचे ठरेल यात कोणतीच शंका नाही.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

34 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

43 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

52 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago