प्रीतीसंगमावर पुतण्याने काकांना केला वाकून नमस्कार
सातारा : यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रीतीसंगमावर अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. अशातच आज पवारांच्या तीन पिढ्या शरद पवार, (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या. यावेळी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार काही वेळासाठी आमने-सामने आले. त्यावेळी काका अजित पवारांना पुतण्या रोहित पवारांनी वाकून नमस्कार केला. अजित पवारांनी रोहित पवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, ऑल द बेस्टही म्हटले.
रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना हस्तांदोलन केले आणि त्यांना काकांच्या पाया पड, असे म्हणत खाली वाकून नमस्कार करण्यासाठी आग्रह केला. रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केले आणि दाद्या, थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर… असा टोलाही अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती.. असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केले, असे रोहित पवार यांनी सांगितले.