मायभाषा – डॉ. वीणा सानेकर
माणूस म्हणून जन्माला येणे सोपे आहे पण माणूस म्हणून जगणे अवघड आहे कारण आपले माणुसकीचे भान हरवले आहे. आपली जी काही मानवी प्रगती, सभ्यता तिचा पाया चुकलेला आहे. जी गोष्ट सकारात्मक प्रेमावर उभी असते ती टिकते पण मानवी समाजाची वाटचाल द्वेष, मत्सर, क्रूरता, खोटेपणा यांच्या आधारे सुरू आहे.
माणूस हा निसर्गाचा भाग आहे. खरे तर निसर्गाचा पाया प्रेम आहे. निसर्गामध्ये समता आहे नि आपण सर्व प्रकारच्या विषमता कवटाळून बसलो आहोत. निसर्गाचा गाभा आनंद आणि माणसाचे आयुष्य मात्र दुःखाने व्यापले आहे. सबंध जग सात वेळा नष्ट केल्यावर देखील उरतील इतकी शस्त्रे माणसाने हिंसेने प्रेरित होऊन निर्माण केली. गेल्या काही वर्षांत जी काही तंत्रज्ञानाची प्रगती झाली, ती मानवी विकासाचा भाग म्हणून होणारच होती पण या सर्व काळात माणसाला परत निसर्गाकडे जाता आले नाही.
जगण्याकरिता जी काही साधने हवी होती, ती माणसाने शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केली. खरे तर हेही त्याला नीट जमले नाही. निसर्गाचा मूळ स्वभाव आनंद आहे. पूर्वी निसर्गाशी माणूस कधी संघर्ष करत होता पण हेही बदलले. निसर्गाशी हातमिळवणी करून तो जगायला शिकला. मात्र नंतर हेही बदलले. तो निसर्गापासून दुरावत गेला.
माणसाला वाटते जणू तो अखंड जगणार आहे. मृत्यूचा अर्थ कळला तर तो अधिक चांगले जगू शकेल पण तो स्वीकारण्याची माणसाची तयारी नसते. म्हणून खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण देणारी शाळा हवी.
हे सारे अतिशय तळमळीने बोलत होते आपल्या आवाजातून उजेड पेरणारे गायक संगीतकार संभाजी भगत. आज एका बैठकीत त्यांची भेट झाली नि एका अतिशय क्रांतिकारक उपक्रमाची ओळख त्यांनी करून दिली. मुळात जवळपास तीन दशके शिक्षक म्हणून कार्यरत राहिलेल्या या माणसाने शिक्षण काय घडवू शकते आणि शिक्षणाने काय घडवले नाही हे जवळून पाहिले आहे.
संभाजी यांच्या सर्व मांडणीला चळवळीची बैठक आहे. विद्रोही जलशांच्या माध्यमातून अनेकांच्या काळजात क्रांतीचा एल्गार रुजवणारा हा कलावंत गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्राला माणुसकीच्या शाळेची ओळख करून देतो आहे.
वाडी वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये भरवली जाणारी ही शाळा कोरोनामध्ये ऑनलाईन माध्यमातून देखील नेमाने सुरू होती. ९-१० वर्षांपासून १६-१७ वर्षांपर्यंतची मुले आठवड्यातून भरणाऱ्या या शाळेत येतात. महाराष्ट्रातील हजारो मुलांपर्यंत माणुसकीची शाळा पोहोचली आहे. मैत्री कशी जोडायची, आनंद कसे जगायचे, आपले संविधान, मूल्ये अशा अनेक पैलूची ओळख,वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे मुलांच्या मनात रुजवले जाते.
या शाळेतले शिक्षक म्हणजे माणुसकीचे दूत आणि आता स्वयंस्फूर्तीने दूत तयार झाल्यामुळे माणुसकीच्या शाळेला मनुष्यबळाची चिंता नाही. मुली आता म्हणू लागल्या आहेत की, आईला पण माणुसकीच्या शाळेत घेऊन यायला हवे.
अंधश्रद्धा, कर्मकांडे यावरही माणुसकीची शाळा काम करते आहे. मुले सहज गाणी रचतात. ती सादर करतात. वेगवेगळ्या खेळांचा अर्थ समजून घेतात. कला, खेळ, प्रयोग यांच्या माध्यमातून मुले जगण्यातला आनंद वेचायला शिकतात. माणुसकीच्या शाळेची खरी गरज मुलांपेक्षादेखील मोठ्यांना आहे. मात्र ओल्या मातीत बीज सहज रुजते नि ओली माती असली की, आकारही सहज देता येतो.
आता मोठ्यांचे काय करायचे? आव्हान आहे खरे !