भालचंद्र ठोंबरे
धौम्य ऋषींचा शिष्य असलेल्या वेद ऋषींच्या आश्रमात उत्तंक नावाचा एक शिष्य विद्यार्जन करीत होता. वेद विद्यार्जन झाल्यानंतर घरी परत जाण्यापूर्वी उत्तंकाने गुरुंना गुरुदक्षिणेबाबत विचारणा केली. तेव्हा तुझ्या सेवेनेच मी प्रसन्न आहे, तीच माझी गुरुदक्षिणा असून ती मला मिळाली. तेव्हा उत्तंक गुरुमातेकडे जाऊन गुरु मातेला दक्षिणेबाबत विनंती केली. तिनेही नकार दिला. मात्र विद्यार्थ्यांने विद्यार्जन केल्यानंतर गुरुदक्षिणा देणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, तेव्हा मला माझी कर्तव्यपूर्ती करण्यास सहाय्य करा व गुरुदक्षिणा सांगा, असा बालहट्ट गुरुमातेजवळ उत्तंकाने केला असता माता म्हणाली वत्सा, पौष्य राजाच्या राणीच्या कानात असलेली दिव्य मण्यांची कुंडली मला आणून दे. उत्तंक त्याप्रमाणे निघाला असता वाटेत त्याला एक पुरुष एका बैलावर बसून येत असलेला दिसला. त्या पुरुषांनी उत्तंकाला आवाज देऊन या बैलाचे शेण व मूत्र प्राशन कर असे म्हटले. उत्तंक ते ऐकून घुटमळला. तेव्हा तो पुरुष म्हणाला ‘‘तुझ्या गुरुने सुद्धा हे प्राशन केले आहे, तेव्हा तुला संकोच करण्याचे काहीही कारण नाही.’’ हे ऐकून उत्तंकाने शेण व मूत्र प्राशन केले व पुढील प्रवासाला निघाला.
उत्तंक राजा पौष्याच्या दरबारात गेला. पौष्याने त्यांचा आदर सत्कार व नम्रपणे मी आपली काय सेवा करू शकतो म्हणून विचारणा केली. तेव्हा उत्तंक राजाला म्हणाला “ हे राजन, मला माझ्या गुरुंना गुरुदक्षिणा देण्यासाठी आपल्या राणीच्या कानातील कुंडले हवी आहेत. तेव्हा राजाने उत्तंकाला अंत:पुरात जाऊन राणीला कुंडले मागण्यास सांगितले. उत्तंक अंत:पुरात गेला व राणीला आपला येण्याचा हेतू कथन केला. राणीने मोठ्या आनंदाने आपल्या कानातील कुंडले काढून उत्तंकाला दिली. ही कवच कुंडली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व विविध गुणसंपन्न असून यांच्या प्राप्तीसाठी अनेकांसह स्वतः नागराज तक्षकही इच्छुक असल्याने आपण ही कवच कुंडले सांभाळून न्यावीत असा सल्लाही दिला. उत्तंक परत जात असताना एक चोर त्याच्या पाठलागावर होता. उत्तंक एका ठिकाणी स्नान संध्या आदी धार्मिक विधी करण्यासाठी थांबला. आपल्या स्नान संध्येत मग्न असतांना त्या चोराने ती कुंडले पळवली. उत्तंकाने त्याचा पाठलाग केला तेव्हा काही दूर अंतरावर गेल्यानंतर त्या चोराने मानव रूप सोडून सर्प रूप धारण करून तो एका बिळात शिरला व नागलोकात गेला.
उत्तंकाने सापाला पाहण्याच्या व पकडण्याच्या उद्देशाने काठीच्या सहाय्याने बिळाच्या ठिकाणी खोदून बीळ मोठे करण्यास सुरुवात केली. गुरुसाठी करत असलेल्या त्याच्या या प्रयत्नामुळे प्रसन्न होऊन इंद्राने आपले वज्र त्याच्या मदतीला दिले व तो नाग पाताळात नागलोकात गेल्याचे उत्तंकास सांगितले. त्याप्रमाणे उत्तंक नाग लोकात गेला. तेथे त्याने नागांची प्रशंशा केली व कुंडले देण्याची विनंती केली; परंतु स्तुती व विनंती करूनही नागांनी ती कुंडली परत केली नाहीत.
तेव्हा त्याला थोड्या अंतरावर दोन स्त्रिया एका चरख्यावर काळ्या व पांढऱ्या धाग्याच्या साह्याने एक वस्त्र विणतांना दिसल्या. तसेच १२ आरे असलेले एक चाक सहा व्यक्ती फिरवत असून बाजूला एक पुरुष उभा असून एक घोडाही उभा असलेला पाहिला. उत्तंकाने नागांची केलेली स्तुती ऐकून तो पुरुष म्हणाला “ हे मुनीवर तुम्ही येथे काय करीत आहात.”? तेव्हा आपली कुंडले नागाने आणली असून ती परत घेण्यासाठी मी येथे आलो आहे असे उत्तंकाने सांगितले. तेव्हा तो पुरुष म्हणाला हा घोडा आहे, याच्या अंगावर जोराने फुंकर मार, उत्तंकाने त्याप्रमाणे फुंकले असता त्या घोड्याच्या शरीरातून धूर व ज्वाला निघू लागल्या त्या धुराने सर्व नागलोक व्यापून घेतला व अग्नीमुळे सर्वत्र वातावरण तापले असता नाग त्रस्त झाले, तेव्हा तक्षक उत्तंकासमोर प्रकट झाला व त्याने उत्तंकाला कुंडले परत दिली. त्यानंतर त्याच पुरुषाने उत्तंकाला याच घोड्यावर स्वार होऊन तू परत आपल्या गुरूकडे जा असे सांगितले. त्याप्रमाणे उत्तंक घोड्यावर स्वार होऊन एका क्षणात वेद ऋषींच्या आश्रमात पोहोचला. त्याने ती कुंडले गुरुमातेला दिली. कुंडले पाहून गुरुमाता अत्यंत प्रसन्न झाल्या.
वेदगुरुंनी उत्तंकाला विचारले तुला येण्यास इतका वेळ का लागला? तेव्हा उत्तंकानी पूर्ण हकीकत सांगितली व मला भेटलेली बैलावरील ती व्यक्ती कोण होती? त्याने मला शेण, मूत्र प्राशन करण्यास का सांगितले? तसेच नाग लोकात आपल्याला दिसलेल्या दोन स्त्रिया, पुरुष, चक्र, या सर्व संबंधाची माहिती दिली व यांचा अर्थ काय हे गुरुंना विचारले. तेव्हा गुरू म्हणाले ‘‘तुला वाटेत भेटलेला बैल व त्यावर बसलेला पुरुष म्हणजे ऐरावतावर बसलेला इंद्र असून त्यांनी मलमुत्राद्वारे तुला अमृत दिले. त्या अमृतामुळेच तू नागलोकांत सुरक्षित राहू शकला. नागांच्या विषाचा तुझ्यावर परिणाम झाला नाही. आता नागलोकात तुला दिसलेल्या दोन स्त्रिया म्हणजे धाता व विधाता होत्या, काळे पांढरे धागे म्हणजे दिवस व रात्र होते. चक्र म्हणजे संवत्सर, (वर्ष) व त्यातील बारा आरे म्हणजे बारा महिने व सहा पुरुष म्हणजे सहा ऋतू असून उभा असलेला व्यक्ती म्हणजे पर्जन्य व अश्व म्हणजे अग्नी हे होते. इंद्रदेव माझे मित्र असल्यानेच ते तुझ्या मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी धावून आले. अशाप्रकारे गुरुकृपेनेच गुरुदक्षिणा पूर्ण करण्याच्या मार्गात मिळालेल्या गुरुंच्याच सहाय्यामुळे त्याला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. याच उत्तंक ऋषीच्या मार्गदर्शनावरून जन्मेजयाने सर्प यज्ञ केला होता.