हलकं-फुलकं – राजश्री वटे
काही काळवेळ आहे की नाही… उठलं का सुटलं… वेळेचं काही भानच नसतं कोणाला… हे झालं सरेआम वापरात, वेळेची किंमत असणाऱ्याचं ब्रीदवाक्य!
पण ‘वखत’ हा गावरान शब्द वेळेची अस्सल किंमत दाखवून देतो माणसाला!
वेळेची कदर असणारी व्यक्ती वक्तशीर म्हणून आदरणीय वाटते, अशा व्यक्तीला स्वतःच्या वेळेची तर असतेच पण दुसऱ्याच्या वेळेला ही तितकेच महत्त्व देणारी असते… पण कधी उलट ही असू शकतं!
कधी अतीवक्तशीरपणा दुसऱ्याला धारेवर धरतं… असे ही नसावं… म्हणूनच म्हणतात प्रत्येकाची वेळ यावी लागते त्यांच महत्त्व कळायला… वक्त वक्त कि बात है!!
कोणाचाही जास्त वेळ घेऊ नये पण गरज असल्यास वेळ नक्की द्यावा…
परीक्षा, सार्वजनिक कार्यक्रम, मुलाखत या ठिकाणी वेळेला फार महत्त्व आहे. पेपर लिहिताना तर नजर घड्याळाच्या काट्यावरच असते… तेव्हा वाटतं…
वक्त से कहना जरा…
वो ठहर जाए वही…
वेळ सांगून येत नाही… असे नेहमी म्हटलं जातं…
खरंच, वेळेला बोलता आले असते तर कित्येक प्रश्न बोलता बोलता सुटले असते!
कोणालाही थाप मारताना, वेळच मिळाला नाही… किंवा नसतो… हे गणित बरं जमतं… पण.. खरंच… वेळ नसतो का… काढला तर असतो… शेवटी दुसऱ्यासाठी वेळ काढणं हे इच्छेवर अवलंबून असतं!
कोणाशी खास बोलायचे असल्यास तत्काळ वेळ काढून बोलावे, वेळ निघून गेल्यावर काही अर्थ नसतो, गेलेली वेळ पुन्हा येत नाही.
वेळ मिळाला तर फोन करू नका, वेळ काढून फोन करा!! वेळ कोणासाठी थांबत नाही हे तेवढेच खरे!!
यावरून आठवलं…
वेळ काढणं हा दुसरा प्रकार!!
वेळ काढू धोरण, टाईमपास, आयुष्यात काहीच करण्याचं ध्येय नसणं… ते म्हणजे वेळेचं अजिबात महत्त्व नसणं! याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त असतात… शारीरिक व मानसिक सुद्धा!!
म्हणून कुठल्याही वयात वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे… मनाचा आनंदोत्सव साजरा करायला वेळेचं बंधन नसतं… आणि नसावंच!!
बस… वेळ येऊ द्या… सगळे ठीक होईल… निराशामय मनसुद्धा आशा करत असतं… शेवटी काळ ठरवतो सर्व!!
काळ आला होता पण… वेळ आली नव्हती… वेळ आणि काळ यांची अजब सांगड आहे… काळवेळ!!
काळ, काम, वेग हा मंत्र… आयुष्याचे तंत्र योग्य रीतीने सांभाळतो!
वक्त से पहले और नसीब से जादा कुछ नही मिलता!
वक्त आने दो…
वक्त का इंतजार करो!!