रचना लचके बागवे
आज या वृद्धाश्रमाला भेटीचा योग आला. जिथे माणसांमधले देव भेटले. बदलापूर येथील बेंडशील गावातील प्राजक्ता कुर्ले यांनी सेवा म्हणून वृद्धांसाठी आणि गरजू लोकांसाठी सुरू केलेले हे एक सुंदर घर आणि कुटुंब म्हणजे राम कृष्ण हरी वृद्धाश्रम. तुकाराम महाराज म्हणतात, “संसारात सर्वांचा आधार हरि आहे.” तिथे असलेल्या निराधार लोकांची सेवा प्राजक्ता यांच्या माध्यमातून खरं तर हरीच करते असे जाणवते. आपण तिथे जाताच आपले स्वागत “राम कृष्ण हरी” या शब्दांनीच हसतमुखाने होते. निसर्गाच्या कुशीत जशी झाडे, फुले मोकळा श्वास घेतात, तसाच मोकळा श्वास इकडचे आजी – आजोबा घेतात, अगदी मनमोकळेपणाने, कसलेही दडपण नाही, नाही कोणाचा त्रास… छान आनंदात एका मोठ्या कुटुंबासारखे इथे सर्व राहतात. प्राजक्ता कुर्ले या एक सृजनशील व्यक्ती असून, आपण फक्त आपल्यापुरते न जगता, समाजातील निराधार लोकांसाठी जगावे आणि त्यांच्यासाठी काही करावे या हेतूने “राम कृष्ण हरी’’ या संस्थेची २०१५ साली सुरुवात झाली. कोणत्याही स्त्रीला तिचे दागिने खूप मोलाचे असतात, अशा वेळेस आपले सर्व दागिने विकून अनोळख्या लोकांसाठी जागा घेऊन त्यांचा तिथे सांभाळ करणे हे कोणत्याही गृहिणीला असे करण्याचे धाडस आणि मनात समर्पणाची भावना असल्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. एक गृहिणी ते एक समाजसेविका ही आयुष्याची कलाटणी प्राजक्ता कुर्ले आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. रस्त्यावरील निराधार लोकं किंवा ज्यांचे कुटुंब असून देखील त्यांचा परिवार त्यांची काळजी घेऊ शकत नाही, असे अनेक लोकं इथे येऊन आपल्या नवीन जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करत. तेथील राहणाऱ्या लोकांना ते आपलाच परिवार मानत.
या संस्थेमध्ये येण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा जातीधर्माची बंधने नाहीत, फक्त एकच कारण असते ती म्हणजे “गरज”. विविध वयाचे आणि जाती-धर्माचे लोकं इथे एकत्र आनंदाने नांदत आहेत. एकमेकांची काळजी आणि सांभाळ करत ते त्यांचे आयुष्य व्यतीत करत आहेत. खूप लांबून देखील लोकं इथे येऊन स्थायिक झाली आहेत. निसर्गाची उधळण असलेले बेंडशील गावातील हे ठिकाण अत्यंत शांत आणि सुंदर आहे. त्याचबरोबर प्राजक्ता यांनी इथे त्यांच्या मायेने सुगंध पसरविला आहे. अशा वातावरणात आयुष्याच्या झळामुळे कोमेजलेली फुले पुन्हा एकदा उमलू लागली आहेत. त्यांच्या परिसरात एक सुंदर असे शंखराचे छोटेसे मंदिर आहे. प्राणी, पक्षी, फुले, झाडे आणि माणसे इथे आनंदाने एकत्र राहत आहेत. म्हणूनच कदाचित त्या हवेमध्ये एक पवित्रतेचा गंध पसरला आहे. हे शिवधनुष्य उभारत असताना ते जेवढे सुरू करणे सोपे होते, त्याहून जास्त ते सुरू ठेवणे आहे. एकदा का जबाबदारी घेतली तर मग पाठीमागे जाणे नाही. एका वेळेस अनेक जीवांची जबाबदारी कायमस्वरूपी मग आपल्या पाठी राहील याची संपूर्ण जाणीव प्राजक्ता कुर्ले यांना आहे. म्हणूनच त्या जागेवर भक्कम मोठे घर बांधण्याचे काम आता तेथे सुरू आहे. या सर्वच गोष्टींना लागतो तो पैसा. माणूस सर्व गोष्टींचे सोंग घेऊ शकतो पण कधीही पैशाचे सोंग घेता येत नाही. जरी अनेक मंडळी काही ना काही वस्तू, धान्य आणि इतर गोष्टींचे दान देत असतात तरी देखील इतर बऱ्याच गोष्टींना पैसाच लागतो. अशा वेळेस देवरूपी माणसे त्यांच्या पाठी भक्कमपणे उभी राहतात. ते म्हणजे हरीशभाई आहुजा, कमलेशभाई भटिजा या दोघांनी आजवर अनेकदा आर्थिक आणि मानसिकरीत्या मदत केली आहे. त्यासोबत परिवाराच्या साथीशिवाय असे मोठे कार्य होणे शक्य नाही. त्यांच्या कुटुंबातील डॉ. रमेश कुर्ले, तेजस कुर्ले, समिधा कुर्ले आणि त्यांचे पती एकनाथ कुर्ले या सर्वांची त्यांना या कार्यात कायम मदत राहिली. तसेच त्यांचे गुरू परमपूज्य आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज यांचा उपदेश त्यांना या कार्याला वेळोवेळी उपयोगात आला. असे कार्य सुरू करत असताना श्री. मधुसूधन पाटील आणि डॉ. शुक्ला या दोघांकडून सुरुवातीपासून खूप प्रोत्साहन मिळाले.
तिथे असलेल्या आजी-आजोबांसोबत गप्पा मारून समजले की, कोणत्याही दुःखापेक्षा जास्त, आपण स्वातंत्र आनंदाने जगतो हे समाधान जास्त होते. कोणाची मुले परदेशात होती, तर कोणाला नाती होती पण ती नाती आता जिवंत नव्हती. प्रत्येकाची जगण्याची कारणे वेगळी, तिकडे स्वतःचं घर सोडून राहण्याची कारणं वेगळी. इथे त्यांना वेळच्या वेळी चांगले खायला मिळते, डोक्यावर हक्काचे छत मिळते, आठवड्यातून एकदा डॉक्टर येऊन सर्वांची वैद्यकीय तपासणी करतात. विरंगुळा म्हणून निसर्ग आहे, प्राणी, पक्षी आहेत आणि मनोरंजनासाठी टीव्ही आहे. तिकडे असलेली बरीच लोकं चांगली शिकलेली आहेत, चांगली नोकरी करत होते, पण आता या उतारवयात घरी एकटे बसण्यापेक्षा इथे येऊन राहणे त्यांनी निवडले. स्वतंत्र निवडलंय. आतापर्यंत तेथे पत्र्याचे घर आहे, ते २-३ वेळेस जोराच्या हवेने उडून गेले होते, म्हणून आता कमलेश यांच्या सहकार्याने आता नवीन स्लॅबच्या घराचे काम सुरू आहे. पुन्हा तेथे अनेक वस्तू लागणार आहेत, खूप पैसा देखील लागणार आहे, कुर्ले परिवारातर्फे जमेल तितकी पैशांची सोय करत आहेत तरी देखील अजून मदत लागणार आहे, तेव्हा आपल्यासारख्या लोकांनी पुढे येऊन या कामास खारीचा हातभार लावला तर अनेकांच्या डोक्यावर कायमचे सुंदर छप्पर राहील. त्याचबरोबर प्राजक्ता कुर्ले यांच्या पुढच्या आकांक्षा आहेत की, त्या लहान मुलांसाठी देखील तेथेच गुरुकुलाची सुरुवात करावी, यावर देखील त्यांचे काम सुरू आहे. निराधार मुले आणि वृद्ध यांच्यासाठी त्यांना एक सुंदर मोठे कुटुंब बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. निराधार मुले आणि वृद्ध मंडळी या सर्वांची काळजी, सेवा प्राजक्ता कुर्ले आणि त्यांचे कुटुंबीय आनंदाने आणि सेवाभावाने करतात.