Saturday, February 15, 2025

आमची पन्नाशी…

माेरपीस – पूजा काळे

विसरतो कधी कधी, आठवत नाहीत चेहरे |
संवादाची ऐशी तैशी दिवसामागे
दिवस सरे ||
अशी उतरती कॅन्व्हासवर,
रंगबिरंगी फुलपाखरे |
शुभेच्छात दिसून येती तव मैत्रीचे रंग गहरे ||

वरील पंक्तीत उतरलेल्या शुभेच्छा या सामान्यतः मैत्रीला अनुसरून असतात. या शुभेच्छा देता, घेताना कोण आनंद होतो म्हणू सांगू! अहो वर्षभर इथं शुभेच्छांचे पीक असत. अगदी सण, सोहळे, लग्न, मुंज आणि काहीच नाही तर, नवीन वास्तू वा एखादं प्रेमप्रकरण. या सगळ्यावर खात्रीदायक असलेला रामबाण उपाय ज्याला पर्याय नाही काय.? असा सहज आणि सोपा शुभेच्छारूपी वर्षाव; मनाला तृप्ती दिल्याशिवाय राहात नाही. त्या स्वीकारल्या की मणभर मास अंगभर चढलचं म्हणून समजा! त्यातही वर्षातून एकदाचं येणाऱ्या विशेष दिवसाचे म्हणजे वाढदिवसाचे औचित्य म्हणजे कमाल की ओ…ऽऽऽ कारण एकच आणि ते म्हणजे वय वाढल्याचे हक्काने दाखवून देणारा तो दिवस. म्हणजे बघा वर्षभरातील सुखदुःखाचा जमा-खर्च मांडण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस. त्यातून आपण काय कमवले, याचा थोडाबहुत विचार करण्याचा दिवस जो, थोडं हसवून, थोडं भावनिक करून जातो. सुखाला कोंदण लावणारा हा दिवस म्हणजे, केशर पेढ्यावर सजलेला वेलदोडा होय. आता हेच पाहा ना, थोडा हुशार, थोडा बावळट असा साधा भोळा मी एक. आदल्या दिवशी आयुष्य मनमुराद जगलो. ऑफिसमधून थेट नाटक पाहायला गेलो. तिथून चौपाटीवर फेरफटका आणि रात्रीच्या जेवणाचा बेत मस्त कुटुंबासमवेत घालवायचा म्हणून लगबगीने चाललेलो. पारिवारिक आनंदाचे क्षण याच्या आधीही अनुभवले होते मी. पण पन्नाशीचा अनुभव खऱ्या अर्थाने हुरहूर लावणारा. वयाने श्रीमंत झाल्याची खुणगाठ पक्की करणारा. मागे वळून पाहाताना अनुभवाची शिदोरी भरून वाहिल्यासारखी, नव्हे ओसंडल्यासारखी वाटत होती. तत्क्षणी डोळे बंद करत हे सत्य वा स्वप्न यातलाही फरक कळेनासा झाला. एवढे भारावलेपण आणि ते ही बाराच्या ठोक्याला. ती ओजस्वी वेळ ओंजळीतल्या फुलाप्रमाणे मूठभर हाताला लागलेल्या आनंदी क्षणांनी मनाला हलकं करणारी. वाढदिवसाच्या आदल्या रात्रीची अनुभवाची पोतडी बहू मोठी वाटते कारण ती जेव्हा वाचून काढतो तेव्हा, वर्षाकाठी साचत जाणाऱ्या यादगार आठवणींची माळ माझ्या देहालगत गुंफण घालते. मी रमतो माझ्या भूत आणि वर्तमानकाळात. मंद चालणाऱ्या घड्याळाचे ठोके १२ वाजताच घणाणतात तेव्हा लगबगीने फोन, मेसेजच्या एकसुरी नादाने, भानावर येतो मी!

Share Market : स्कॅलपिंग अर्थात डे ट्रेडिंग

दीर्घायुषी व्हा. शतायुषी व्हा. “मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे”, एकाच अर्थाच्या अनेकविध मथळ्यांच्या शुभेच्छांनी रात्री बरोबर आनंदाला नशा चढते. या नशेत असणाऱ्या प्रत्येकाबरोबर माझा मित्र शिरीष असतो. मी त्याची आठवण काढतो. फोन लावतो. दोन-चार शिव्या घालतो आणि त्याचेही अभिनंदन करतो.

वर्गमित्र ते फॅमिली फ्रेंड प्रवासातले आमचे नाते अगदी घट्ट. आमची जन्मतारीख ही एकच, त्यामुळे वयही सारखेच. नाहीतर एवढा कुठला योगायोग असणार हो!

पण एकाला लागले तर दुसऱ्याला त्रास व्हावा एवढी लंगोटी मैत्री आमची. सांगायचे झाल तर त्या काळची आमची परिस्थिती बेताचीचं होती. एक वेळच्या अन्नात दोन वेळच्या अन्नाचे कसब पणाला लावत, काम उरकण्याची हातोटी आमच्या आईची. बाबांच्या नोकरीतून वर्षाकाठी दोनदा नवे कपड्यांचे जोड अंगावर पडत. दिवाळीच्या फराळा व्यतिरिक्त पाडव्याच्या गोड जेवणावर धन्यता मानणारे आम्ही, मित्राच्या श्रीमंतीला कधी बुजलो नाही. तसे शिरीषनेही आमच्या नात्यात श्रीमंती पुजली नाही. दंगा मस्तीत नंबर वन असलेलो आम्ही टवाळ पोरं शाळेबरोबर क्रमाने कॉलेजची पायरी हातात हात घालून चढलो. नोकरी दरम्यान शिरीषला परगावी जावे लागले आणि ते निमित्त ठरले. डाव खेळली होती नियती. म्हणजे एका ठिकाणी ब्लड डोनेशनची पाटी वाचून त्याच्यातल्या परोपकाराच्या जाणिवेने त्याला स्वस्थ बसू दिले नव्हते. पुढे रक्तदान जोशात झाले पण त्यानंतरचा जोश मावळल्यागत होता. दानासारख्या सेवा व्रताने चिंता निर्माण झाली. चित्र बदलले. शिरीषची तब्येत बिघडू लागली. त्यास्तव उपचाराला जोर येत नव्हता. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. शेवट एचआयवीचे निदान झाले आणि एक छोटीशी मदत मित्राच्या आयुष्यावर काळी रेघोटी मारून गेली होती.

शिरीष संपला होता. संकट समोर उभे होते. “पावलापुरती वाट दिसली तरी, ती मला पुरेशी आहे जगण्याला सामोरे जाताना” महात्मा गांधीजींच्या या वाक्याची सहजता मित्राच्या जगण्याला आली होती. संयम ठेवत, घरच्यांना धीर देत, त्याच्या उभं राहण्याच्या धाडसी निर्णयाला आम्ही सलाम ठोकला. औषधोपचार, व्यायाम, योग्य आहार विहार यावर नियंत्रण ठेवत, प्रथम नोकरीला आणि नंतर त्याच्या लग्नाच्या निर्णयाला सगळ्यांनीच उचलून धरले. मनात संजीवनी भरली. आनंदाच्या प्रसंगी वरवर आनंदी दाखवत दुःखाला कवटळण्याचे एक भेसूर चित्र म्हणून मी अनुभवतो तेव्हा मनात चर्रss होतं. दुसऱ्याला आनंद द्यायचा, त्याचा अट्टहास पाहिला की, आनंद ही असह्य होतो. वीस-बावीस वर्षे आजारावर मात करत पन्नाशी गाठलेल्या मित्राचा आज वाढदिवस. शतायुषी व्हावे त्याने. उमदा मित्र दिल्याबद्दल देवाचे आभार मानत मी फोन उचलतो. हँलो…ऽऽऽ पलीकडून आवाज येतो. अरे काळ्या लेका पन्नाशीचा झालास गड्या. ते एेकून मी सुखावतो. दोस्तीत चालणाऱ्या भाषेत दमटावत त्यालाही पन्नाशीची सरमरीत भेट देतो. अरे शिऱ्या तुझेही अभिनंदन. साल्या तू ही पन्नाशी गाठलीस की रे. या प्रसंगाला साजेशी गजल मला आठवते. ज्यात कवी समीर शेख बरेच काही सांगून जातात.

“आसवांचे गीत मी गाणार नाही,
कढ तसे नयनी पुन्हा दिसणार नाही
चाललेल्या रोजच्या रणकंदनी या,
सहजगत्या मी असा हरणार नाही
ईश्वरा तूच मजला तारणारा,
अन्य कोणा वेदना कळणार नाही ||
मित्रा तुला, तुझ्या कर्तृत्वाला वंदन. हा प्रवास चिरंतन घडत राहो, हीच सदिच्छा.

असंख्य नात्यांना मायेचे खत पाणी घालत खुशाल ‌अधिकार गाजवणारा तू. मैत्रीच्या प्रवाहात वाहत जाणारा तू. गुणदोष स्वीकारत मार्गावर आणणारा तू. माझ्याशी सरमिसळ करत राहणाऱ्या अगणित भूमिका तुझ्या तरी, राग, लोभ कधीच ‌दिसत नाही ‌तुझ्या चेहऱ्यावरी. मित्रा तुझा स्वभाव समजायला बरीच वर्षे गेलीत. पण त्यानंतर कळलेला तू म्हणजे मृदूबोल वाणी, मनातली गाणी, सामावली कैक वैशिष्ट्य, मित्र असा गुणी. वेगळ्याच रुबाबात वावरणाऱ्या, या मित्राचा आज वाढदिवस. सर्वव्यापी सुंदरता तुझ्यासोबत कायम राहो. अनमोल क्षणांनी तुझे आयुष्य बहरत राहो. शुभेच्छा देताना म्हणावेसे वाटते की,
हार मी मानणार नाही, लाख येऊ दे संकटे |
जगण्याच्या लढाईमध्ये,
आपण सगळे एकटे |
जागेपणी उमजताना अंतरंगी ऊज पेटे |
दुख: वेलीवर अधीमधी
सुखांनाही कोंब फुटे |

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -