स्नेहधारा – पूनम राणे
पहाटेच्या रम्य वेळी फेरफटका मारत असताना एका मुलीने नाजूक कोमल प्राजक्ताची फुले त्यांच्या हातावर ठेवली. पण आता ही ओंजळीतील फुलं कोणत्या खिशात ठेवावीत, बरं. या विचाराने ते बेचैन झाले. कारण कोटाच्या एका खिशात डॉक्टरांची बिले तर दुसरा खिशात घर भाड्याची पावती, तिसऱ्या खिशात किल्ल्यांचा जुडगा तर चौथ्या खिशात लबाड माणसाने पाठवलेले पत्र. बापरे! पत्र असणाऱ्या खिशात ठेवायची म्हणजे लबाड माणसाच्या सहवासात ठेवल्यासारखी होतील आणि किल्ल्यांच्या जुडग्यात ठेवायची म्हणजे अस्सल गुन्हेगारांच्या टोळक्यात ठेवल्यासारखं होईल” नकोच नको…
कोटाच्या कोणत्याच खिशात ठेवायला नको…
असा विचार करून त्यांनी थेट शिंप्याचा रस्ता धरला आणि शिंप्याला म्हणाले, शिंपी भाऊ, शिंपी भाऊ, मला एक कोट शिवायचा आहे. कसाही शिवा पण त्यात मला हवा एक स्वतंत्र किसा. त्यात मी फक्त ठेवणार आहे ही नाजूक फुलं. केवळ फुलांसाठी किसा आणि त्याच्यावर मी पाटी लावणार!
“किल्ली, बिले, नोटा, नो ऍडमिशन,!
बिचारा! अरसिक शिंपी म्हणाला,”असा कसा बरं, कोट शिवता येईल?…
मुलांनो, अत्यंत भावपूर्ण, नाजूक आणि पवित्र विचारांची जपवणूक करण्यासाठी आपल्याही मनाला असा एक स्वतंत्र किसा असावा असा विचार देणाऱ्या एका लेखकाची ही गोष्ट.
या विद्यार्थ्याला शालेय जीवनापासूनच वाचनाची अत्यंत आवड होती. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचाही प्रभाव या विद्यार्थ्यांवर पडला होता. ग्रंथालयात असणाऱ्या कथा-कादंबऱ्या, नाटक यांची त्याने पारायण केली होती.
आदर्श हे टोपणनाव घेऊन त्यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली.
त्यांच्या लिखाणात मानवता तत्त्वचिंतन, स्वार्थत्याग, ध्येयवाद हे लिखाणाचे खास पैलू होते. सुभाषिते उपमा, अलंकार यांनी सजलेली आकर्षक भाषा शैली तात्त्विक, वैचारिक बैठक असणारे, स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारे, मानवतेचा कणव, हे त्यांच्या साहित्याचे विशेष होते.
त्यांचे ललित लेखन वाचताना रांगोळ्या काढल्या आहेत. उदबत्तीचा सुगंध दरवळत आहे आणि रसिक वाचक पंचपक्वानाचा आस्वाद घेत आहेत. अलंकाराचा पाऊस पडत आहे असा भास निश्चितच होतो.
त्यांनी १५ कादंबऱ्या, १ नाटक, ३२ कथासंग्रह, ६ रूपक कथा, ११ लघु निबंध, १८ पटकथा, चरित्र व समीक्षकात्मक, १७ पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या ययाती या कादंबरीला भारतीय साहित्याचा मानाचा नोबेल पुरस्कार म्हणून समजला जाणारा दहावा ज्ञानपीठ पुरस्कार लाभला. साहित्याच्या दालनाला सोनेरी मुकुट वि. स. खांडेकर यांनी चढवला. साहित्यातील नंदादीप म्हणून आजही अनेक वाचकांना, लेखकांना ऊर्जा, प्रेरणा मिळते आहे.