Tuesday, August 5, 2025

माझा नवा मित्र : कविता आणि काव्यकोडी

माझा नवा मित्र : कविता आणि काव्यकोडी
खेळ खेळता येतो
हिशेब ठेवता येतो
माहितीचा खजिना
नवा उघडून देतो.

ब्लॉग लिहिता येतो
ई-बुक वाचायला देतो
फेसबुक, ट्वीटरवर
आपल्याला जोडून घेतो.

मेल पाठवून पत्राचे
मिळवतो हा उत्तर
मनोरंजन करायला
सदा असतो तत्पर.

घरबसल्या खरेदी
त्याच्याच मुळे होई
ऑनलाइन बँकिंगलाही
वेळ लावत नाही

सीपीयू, माऊस, कीबोर्ड
त्याचेच जोडीदार
त्याच्यामुळे शिक्षणातली
गोडी वाढते फार

पदोपदी माणसांच्या
उपयोगी हा पडतो
संगणक माझा मित्र
मला जगाशी जोडतो.

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) मोठ्या कण्यांचे त्यात
प्रमाण अधिक असते
पाणी धरून ठेवण्याची
क्षमता फार नसते

खेळत्या हवेचे त्यात
प्रमाण असते जास्त
काकडी, खरबूज कोणत्या
मातीत येते मस्त ?

२) वयाच्या चौदाव्या वर्षी
त्यांचा कवितासंग्रह आला
‘गीतांजली’ संग्रह तर
जगप्रसिद्ध झाला

इंग्रजांच्या ‘सर’ पदवीचा
त्याग त्यांनी केला
नोबेल पुरस्कार सांगा
कोणास मिळाला ?

३) भावार्थ रामायण लिहून
रामाची सांगितली कथा
गवळण, भारुडातून
मांडल्या समाजाच्या व्यथा

‘जनता हाच जनार्दन’
हा विचार दिला त्यांनी
एका जनार्दनी असा स्वतःचा
उल्लेख केलाय कोणी ?

उत्तर -


१) रेताड माती

२) रवींद्रनाथ टागोर

३) संत एकनाथ
Comments
Add Comment