मुंबई: विधानसभा निवडणुकीत(Assembly election 2024) महायुतीचा अभूतपूर्व आणि निर्विवाद एकतर्फी विजय झाला. महायुतीला २३६ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धुळधाण झाली. मविआला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० आणि मित्रपक्षाला चार जागाच जिंकता आल्या.
महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची पुढील राज्यसभेचा कार्यकाळ देखील मिळणार नाही. महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे ४३ चा कोटा निर्धारित होतो. त्यानुसार महाविकास आघाडीत तेही एका नावावर सहमती झाल्यास केवळ एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल असं समोर आलं आहे.
शरद पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येणार आहे. त्यामुळे यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता तर नसेलच, पण आता मविआचे (इंडी आघाडी) राज्यसभेतील संख्याबळही कमी होणार आहे.
राज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक २८+१ = २९ सदस्यांची संख्या सध्या कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाही. सत्ता स्थापन करताना एकत्रित येऊन संख्याबळ सादर कराव लागतं. मात्र पक्षनेता निवडताना किमान एका पक्षाकडे २९ सदस्य असणं गरजेचं आहे. सध्या विरोधी पक्षातील कोणताच पक्ष अपेक्षित संख्याबळ गाठत नाही.