कथा – प्रा. देवबा पाटील
जयश्रीचे बाबा हातपाय धुवून आले. आईने त्यांना वाढले. त्या दोघींनीही जेवायला घेतले. तिघांचीही रमतगमत जेवणे झाली. जेवणानंतर जयश्रीने अभ्यास केला. तरी झोपताना ती आईस म्हणालीच, “आई, आपल्याला झोप कशी येते गं?””
“दिवसभर शारीरिक व बौद्धिक कामे केल्याने आपल्या शरीराची झीज होते. त्यामुळे माणसाचे सारे अवयव, मेंदू, त्यांच्या पेशी, रक्तवाहिन्या दमतात तेव्हा त्यांना विश्रांतीची गरज असते. आपले शरीर व मेंदू दोन्हीही थकतात. ती झीज भरून काढून शरीराला दुसऱ्या दिवशीच्या कार्यासाठी ताजेतवाने होणे आवश्यक असते. त्यासाठी शरीराच्या इतर सर्व हालचाली बंद करून शरीराला आराम देण्याची नैसर्गिक अवस्था म्हणजे झोप. आपल्या मेंदूत मध्यभागी एक मज्जाकेंद्र असते.
त्याला झोपेचे केंद्र किंवा निद्राकेंद्र म्हणतात. तेही थकते तेव्हा त्यालाही आरामाची आवश्यकता असते. शरीर व मेंदू थकले म्हणजे निद्राकेंद्रात काही रासायनिक प्रक्रिया घडतात व त्याला होणारा रक्तपुरवठा थोडासा मंदावतो. हे केंद्र हळूहळू सर्व अवयवांचे काम बंद करते. त्यामुळे डोळे जड होतात, पापण्या मिटू लागतात, डुलक्या येऊ लागतात, ग्रहणशक्ती कमी होते, हातापायांचे स्नायू सैल पडतात, त्यांची हालचाल थांबते व आपणास हळ्ूहळ्ू झोप येते. म्हणजे आपला मेंदूही झोपतो व शरीरही झोपते,” आईने सांगितले.
“झोपेत जर शरीराच्या स्नायूंची हालचाल थांबते तर मग माणसे तर मरून जातील,” जयश्रीने शंका काढली.
“अगं बाई, झोपेत शरीरांच्या स्नायूंची हालचाल थांबते म्हणजे ते काही पूर्णपणे निष्क्रिय होत नाहीत, तर ते फक्त विश्रांतीसाठी शिथिल होतात. अवयवांचे कामही अतिशय मंदगतीने सुरू राहते. झोपेतही शरीराचे पचनकार्य व्यवस्थित सुरूच असते. रक्ताभिसरणही चालूच असते; परंतु हृदयाचे स्पंदन मंदावते, श्वासोच्छ्वास मंदगतीने होतो. फुप्फुसे, यकृत, मूत्रपिंड यांचेही कार्य मंद वेगाने चालूच असते. मात्र आपल्या शरीराचे तापमान साधारण एका अंशाने कमी होते,” आईने सांगितले.
“मग आपण झोपेतून जागे कसे होतो?” जयश्रीने प्रश्न टाकला.
आई म्हणाली, “झोपेत जेव्हा शरीराच्या सर्व अवयवांना पुरेसा आराम होतो तेव्हा आपोआप मेंदूतील निद्राकेंद्रात पुन्हा काही रासायनिक प्रक्रिया घडतात व त्या केंद्राचा रक्तपुरवठा हळूहळू वाढतो. ते आता जागृत केंद्र म्हणून कार्य करते नि आपणांस जाग येते; परंतु आपल्या डोक्यात जर विचारसत्र सुरू राहले, तर मात्र या केंद्राला होणारा रक्तपुरवठा कमी होत नाही, तो सुरूच राहतो. त्यामुळे मग माणसाला झोप काही येत नाही. तसेच झोपेत जर आपणास भूक, तहान, थंडी वाजण्याची, अतिशय उकाडा होण्याची, भीतीची जाणीव झाली किंवा एखादे भावनिक वा भयंकर स्वप्न पडले, तर मग मात्र ते केंद्र त्वरित उत्तेजित होते व आपण जागे होतो. ते जर अति वेगाने व जोराने उत्तेजित झाले तर आपण दचकून उठतो.”
“आई आपल्या शरीराला झोपेची किती आवश्यकता असते?” जयश्रीने प्रश्न टाकला.
आई म्हणाली, “आपल्या शरीराला शारीरिक व मेंदूला आंतरिक विश्रांती मिळण्यासाठी दररोज सलग सहा तासांच्या झोपेची आवश्यकता असते. झोप ही रात्रीच घेणे अत्यावश्यक असते. कारण रात्रीच खरी गाढ झोप लागत असते. रात्रीच्या झोपेतच आपल्या शरीराला व मेंदूला खरा आराम मिळत असतो नि आपले शरीर दुसऱ्या दिवशीच्या कामकाजासाठी ताजेतवाने होते. मात्र कष्टकऱ्यांना दररोज आठ तास झोप हवी असते. सहा तासांपेक्षा कमी झोप ही अनारोग्याचे कारण ठरू शकते, तर आठ तासांपेक्षा जास्तीची झोप ही शरीराला अतिशय हानिकारक असते. दिवसा घेतलेली झोप ही माणसाला निष्क्रिय बनवते.”
“ हो आई, मी हे आता पूर्णपणे लक्षात ठेवीन आणि माझ्या मैत्रिणींनाही दिवसा झोप कशी घातक असते हे समजाऊन सांगेल.” जयश्री म्हणाली.