श्रीनिवास बेलसरे
काही गाणी लोकप्रिय होतात ती गायकीमुळे, काही लोकप्रिय होतात त्यांच्या आशयामुळे, काही लोकप्रिय होतात गायकाच्या आवाजातील गोडव्यामुळे आणि काही त्या चित्रपटातील प्रसंगाच्या वेगळेपणामुळे! पण काही गाणी मात्र वर्षानुवर्षे ऐकूनही आपल्याला त्यांचा अर्थ माहित नसतो आणि गंमत म्हणजे त्याची गरजही वाटत नाही. तरीही ती लोकप्रियच असतात. आपण अनेकदा ती गुणगुणतो. ही जादू असते संगीताची, विशेषत: त्या गाण्यातील ठेक्याची!
सिनेमा होता जेमिनी पिक्चर्सचा १९६४ सालचा रामानंद सागर दिग्दर्शित ‘जिंदगी’. प्रमुख भूमिकेत एकेक दिग्गज होते–राजेंद्रकुमार, वैजयंतीमाला, राजकुमार, पृथ्वीराज कपूर, हेलन आणि मेहमूद. शिवाय नेहमीचे यशस्वी म्हणून होते जयंत, लीला चिटणीस, जीवन धुमाळ, कन्हैयालाल, बेबी फरीदा (नंतरच्या फरीदा दादी) आणि मुमताज बेगम. सिनेमा चांगला चालला. त्याचे तामिळ आणि तेलुगूमध्ये रिमेकही झाले.
हसरत जयपुरी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘जिंदगी’ची अनेक गाणी लोकप्रिय झाली. त्यात रफी साहेबांनी तबियतमध्ये गायलेले ‘पहले मिले थे सपनो में और आज सामने पाया, हाय कुर्बान जाऊ’ मन्नाडे साहेबांच्या आवाजातले ‘मुस्कुरा लाडले मुस्कुरा’ रसिकांनी गौरविले. लतादीदींच्या आनंदी आणि दु:खी अशा दोन्ही मूडमधल्या ‘हम प्यार का सौदा करते हैं एक बार’ ला बिनाकाच्या यादीत २८ वा क्रमांक मिळाला. परंतु एक गाणे गाजले ते शंकर जयकिशन यांनी त्याला दिलेल्या ठेक्यामुळे! हसरत जयपुरी यांचे आशाताई आणि रफीसाहेबांच्या आवाजातले गोड बोली भाषेतले ते शब्द होते-
“घूंघरवा मोरा छम-छम बाजे,
छम-छमकी धुनपर, जिया मोरा नाचे.
घूंघरवा मोरा छम छम…”
जिला अभिनेत्री न म्हणता केवळ ‘विद्युलता’ म्हणावे अशी महाचपळ चवळीची शेंग हेलन राजेंद्रकुमारच्या वाढदिवसाच्या समारंभात मेहमूदबरोबर नाचत असते. या गाण्यात तिचे केवळ नृत्यकौशल्यच नाही तर अभिनयही बघण्यासारखा होता. ती किती गोड आणि सुंदर दिसते, नाचताना कशी विजेसारखी इकडून तिकडे धावते आणि किती कुशलपणे चेहऱ्यातून सगळे भाव व्यक्त करू शकते ते या गाण्यातच पाहावे. त्यात पुन्हा आशाताईंनी त्यांच्या आवाजात मधाबरोबर हळूच थोडी वाईनही टाकली असल्याने गाणे श्रोत्याला धुंद बनवून टाकते. हेलन मेहमूदची प्रेयसी आहे. ती म्हणते, ‘माझ्या पायातली घुंगरु जसे छम छम वाजतात तसतसे माझे मनही त्या तालावर नाचू लागते.’ मेहमूदने लवकर आपल्या वडिलांना भेटून मागणी घालावी अशी तिची इच्छा आहे. प्रियकराची स्तुती करताना ती म्हणते,
‘आँखों ने आँखों से मस्ती चुराई,
बह के कदम और नजर लडखडाई,
मन के सिंहासन पे तूही बिराजे.
घूंघरवा मोरा छम छम…’
एका नजरभेटीतच आपले प्रेम सुरू झाले होते. तुझ्या डोळ्यांत बघताना मन धुंदावले, चालताना अगदी तोल जाऊ लागला आणि राजा, मनाच्या सिंहासनावर येऊन तू विराजमान झालास! गाण्याच्या पुढच्या ओळी समजायला प्रेमात बुडण्याचा अनुभवच असावा लागतो. हसरत जयपुरी यांनी सहज जाता जाता एका ओळीत एक केवढे सत्य सांगून टाकले होते! ते म्हणतात माणसाला कसली तरी अभिलाषा लागून राहिली असेल, तरच त्याच्या जगण्याला काही अर्थ येतो. कुणाच्या तरी प्रेमाची ओढ लागल्याशिवाय जगणे व्यर्थ ठरते. पुढे मेहमूद हेलनची गंमत करताना म्हणतात, तू तर एका गवळ्याची मुलगी आहेस. तुला काय कळणार या गोष्टी. भगवान कृष्णाच्या भोवती कितीही गोपी असल्या तरी प्रियकर म्हणून तो फक्त राधेलाच शोभतो.
‘चाहत बिना जिन्दगी थी अधूरी,
तू नहीं समझे गवालन की छोरी,
राधा को साजे, तो मोहनही साजे.
घूंघरवा मोरा छम छम…’
हे गाणे ऐकल्यावर कितीतरी वेळ आपल्याला त्याची फक्त पहिलीच ओळ ऐकू येत राहते. आपण तीच गुणगुणत बसतो. हा होता शंकर-जयकिशन यांच्या संगीताचा चमत्कार! असेच एक गाणे होते १९६० साली आलेल्या ‘घुंगट’मध्ये! रवीच्या संगीत दिग्दर्शनात शकील बदायुनी यांची रचना गायली होती लतादीदीने. स्वर्गीय रामानंद सागर यांनी ‘घुंगट’ बेतला होता. चक्क गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या ‘नौकाडूबी’ या १९०६ सालच्या कथेवर. कलाकार होते भारतभूषण, बीना राय, प्रदीपकुमार, रेहमान, आशा पारेख, राजेंद्रनाथ, लीला चिटणीस आणि आगा. सिनेमाची दोन गाणी विशेष गाजली. लतादीदींच्या आवाजातले, रवीजींनी शिवरंजनी रागात बेतलेले ‘लागे ना मोरा जिया’ आणि ‘मोरी छम छम बाजे पायलिया’. बीना रायला या चित्रपटाने फिल्मफेयर पुरस्कार मिळवून दिला.
‘मोरी छम छम बाजे’चा ठेका इतका जबरदस्त होता की, ते गाणेसुद्धा ऐकल्यावर मनात आपल्या रेंगाळत राहते. लतादीदींचा कोवळा आवाज आणि बीना रायचा निरागस अभिनय मोठी जादू करून गेला होता. पतीचे एक पत्र सापडल्यावर ती हरखून जाते. आता पुन्हा आपली पतीशी भेट होईल या आनंदात ती त्याचे छायाचित्र हृदयाशी धरून नाचू लागते असे दृश्य होते. तिला आश्रय देणाऱ्या ज्येष्ठ महिलेकडून ‘ते छायाचित्र नीट ठेवते’ असे सांगून ती दुसऱ्या खोलीत जात असताना तिचे पैंजण वाजतात. त्यावरून तिच्या तोंडी शब्द येतात-
‘मोरी छम-छम बजे पायलिया,
आज मिले हैं मोरे सावरिया…’
पतीशी ताटातूट झाल्याला बरेच दिवस झाले आहेत. आता त्यांच्या पुनर्भेटीची शक्यता निर्माण झाल्याने ती हरखून जाते. क्षणात अतीव आनंदाने तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटते, तर क्षणात ‘त्यांच्या’ समोर जायचे म्हणून ती लाजते. तर कधी आनंदाश्रूनी डोळे भरून येतात. त्यालाही शकीलसाहेबांनी किती सुंदर उपमा देलीय, पहा- ती म्हणते डोळ्यांच्या कळशीतून माझे अश्रू हिंदकळून सांडतात!
‘बड़ी मुद्दतमे दिलके सहारे मिले,
आज डूबे हुओ को किनारे मिले.
कभी मुस्काये मन, कभी शरमाये मन,
कभी नैनोकी छलके गागरिया,
मोरी छम-छम बजे पायलिया…’
पतीच्या भेटीच्या कल्पनेने तिचे मन सुखस्वप्नात रमते, उत्तेजित होते. कल्पनेतच ती जणू पतीशी बोलताना म्हणते, ‘तुम्ही मला आता चंद्र-चांदण्यांचे दागिने आणून द्या. मला पुन्हा नववधुसारखा शृंगार करायचा आहे, नटायचे आहे. तुमच्या भेटीच्या जादूमुळे मी किती गोंधळून गेले आहे…’
‘चांद-तारोके गहने पेहना दो मुझे,
कोई आके दुल्हनिया बना दो मुझे.
नहीं बसमे जिया, कैसा जादू किया,
पिया आज हुई रे मै तो बावरिया.
मोरी छम-छम बजे पायलिया…’
एका ठेक्याच्या प्रभावामुळे ज्या गाण्यांच्या अर्थाकडे दुर्लक्ष होते अशा गाण्यातही किती सुंदर आशय भरलेला असायचा हे पाहिले की आपल्याला गीतकारांचे आणि संगीतकरांचे खरोखरच कौतुक वाटत राहते.