महाराष्ट्र फेलोशिप फॉर डेफ शाळेत रोटरीच्या इंटरॲक्ट क्लबअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. क्लबअंतर्गत दिव्यांग मुलांसाठी करण्यात आलेले काम खरंच खूप उल्लेखनीय आहे. शारीरिक उणिवांवर मात करून सामान्य आयुष्य जगण्याची जिद्द बाळगणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना रोटरीच्या माध्यमातून मदतीचा हात नक्कीच मिळत आहे.
मृदुला घोडके
महाराष्ट्र फेलोशिप फॉर डेफ शाळेत रोटरीच्या इंटरॲक्ट क्लबअंतर्गत बधिर मुला-मुलींचा एक फुटबॉल सामना आयोजित करताना, सुरुवातीला मी जरा साशंक होते. आवाजाशी काहीच नाते नसलेली ही मुले फुटबॉलसारखा जोषपूर्ण खेळ कसा खेळत असतील? पण ज्यावेळी इंटरॲक्ट स्थापन केला तेव्हापासून या विशेष मुलांनी वेळोवेळी आश्चर्याचे धक्के देऊन आम्ही जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतो हे ठामपणे दाखवून दिले आहे. रोटरीच्या प्रथेप्रमाणे प्रथम राष्ट्रगीत झाल्यानंतर… जसा सामना सुरू झाला तशी मी किती मर्यादित विचार करू शकते हे मला कळू लागले. मैदानावर जाण्याची त्यांची तयारी… वॉर्म अप… स्ट्रेचिंग वगैरे पासून ते सामना संपल्यानंतर पुन्हा रिलॅक्स व्यायाम करण्यापर्यंत सगळे काही यथासांग. मात्र सगळे निःशब्द ! मैदानावर उतरलेल्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर मंद हसू आणि डोळ्यांत अव्वल चिकाटी दिसून येत होती. सामना सुरू झाला, कोचने रंगीत झेंड्याने केलेल्या इशाऱ्याने. मुलांनी बॉलचा पाठलाग सुरू केला. मैदानावर फक्त आवाज होता पळणाऱ्या पावलांचा आणि बॉलला किक मारण्याचा. गोल झाला तरी आणि गोल हुकला तरी तोंडावरचे हावभाव सगळं बोलत होते. मी आणि माझ्यासारखे काही बघे, तथ्य विसरून सामन्यात समरस होऊन मोठा गोंगाट करत होतो पण सामना खेळणाऱ्या मुलांवर त्याचा काही परिणाम होत नव्हता… त्यांचे सगळे लक्ष मैदानातल्या फुटबॉलवर होते. आपल्या प्रशिक्षकाच्या इशाऱ्यावर होते. एका संघाचा ३ विरुद्ध एका गोलने विजय झाला. त्यांच्या तोंडून आनंदाचे चित्कार निघाले नाहीत पण हावभाव मात्र विजयी होते. दोन्ही संघांनी हात मिळवून विजय साजरा केला.
त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या कोचचे मला खूप कौतुक वाटले. नियोमी राष्ट्रीय पातळीवरची कोच असूनही सेवाभावे या मुलांना गेले सहा महिने शिकवत आहे. “तुझे सांगणे या मुलांना कसे समजते?” असा प्रश्न मी तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, “ही मुले कानाने ऐकत नाहीत, तर हृदयाने ऐकतात.” खरंच की… म्हणून तर निःशब्द सामना जीवनाच्या मैदानावरही खेळतात. मी सुरुवातीला राष्ट्रगीताने रोटरीच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात होते असे म्हटले आहे. हा इंटरॲक्ट क्लब स्थापन केला गेला एका जिद्दीने… ध्येयाने… की, अशा विशेष मुलांना सामान्य जीवन प्रवाहात आणण्यासाठी काही प्रयत्न करण्याकरिता. अशा कामासाठी रोटरी… आणि विशेषतः माझा, रोटरी क्लब पुणे साऊथ… नेहमीच आघाडीवर. माझ्या क्लबचे प्रेसिडेंट रो डॉ. मंदार अंबिके स्वतः वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी प्रोत्साहन दिले. आता कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत वाजवून जरी केली तरी या बधिर मुलांना ते समजणार कसे? पण हा प्रश्न त्या शाळेतील तत्पर शिक्षकांनी सोडवला. त्यांच्यासाठी तो प्रश्नच नव्हता. माईकवर राष्ट्रगीत सुरू झाले आणि शिक्षकांच्या इशाऱ्यावर मुलांनी सांकेतिक भाषेत ‘जन गण मन’ सादर केले. ओतप्रोत देशाभिमान भरलेल्या या सादरीकरणाने मनाचा ठाव घेतला. त्यानंतर रोटरी क्लबने या शाळेत बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली. कुठल्याही आवाजाला पारखे असणारे हे विद्यार्थी सराईतपणे पटावरील सोंगट्या हलवून प्रतिस्पर्ध्यांवर मात करत होते. खरे तर अशा जिद्दीने त्यांनी आपल्या नशिबाला शह दिला आहे.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी तिथल्या छोट्या कर्णबधिर मित्रांनी नेहमीच अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कोरियन नृत्य अप्रतिम होते. त्यांची पावले तालावर कशी पडतात हे एक कोडे असे. एकदा तिरंगा राष्ट्रध्वज सन्मान राखण्याबाबतची एक नाटिका अतिशय समर्पकपणे सादर करण्यात आली. याचे श्रेय तेथील शिक्षकांना नक्कीच जाते.
क्रोशे वर्क, शिवण, पेपर बॅग बनवणे… एवढेच नव्हे तर कमीत कमी २०-२५ टक्के जरी ऐकण्याची क्षमता असेल तर अशांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण मोफत देऊन सक्षम बनवण्याचे सामाजिक उत्तरदायित्व आमचा रोटरी क्लब पुणे साऊथ उत्तमरीतीने पार पाडत आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात डाऊन सिंड्रोम ग्रस्त मुलांच्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशिष्ट ठेवणीतले डोळे, नाक, कान आणि इतर अवयव असलेली आणि गतिमंद असलेली ही मुले, अतिशय उत्साहात झेंबे वादन, नृत्य आणि इतर कलागुण सादर करतात. त्यांच्या पोहण्याच्या स्पर्धा, त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो.
या मुलांनी केलेल्या अनेक सुंदर वस्तूंचे प्रदर्शन त्यावेळी आयोजित करण्यात येते. त्यात सुंदर रंगवलेल्या मातीच्या पणत्या, वारली चित्रकला आणि ब्लॉक छपाई असलेल्या शोभेच्या वस्तू, कोस्टर, मेणबत्या इत्यादी वस्तूंचा समावेश असतो. रोटरीचे सामाजिक कार्यक्षेत्र खूप विस्तारलेले आहे. त्यात केवळ अशा दिव्यांग मुलांसाठी करण्यात येत असलेल्या कामाचा मी इथे उल्लेख केला आहे. या मुलांच्या समवेत विं. दा. करंदीकर यांची ही कविता नेहमी आठवते…
“असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावून अत्तर,
नजरेमध्ये नजर भिडवूनी
आयुष्याला द्यावे उत्तर”
कदाचित नियतीचे फासे उलटे पडले असतील यांच्या जीवनात पण त्यावर मात करून ते आयुष्याला ठणकावून उत्तर देत आहेत. शारीरिक उणिवांवर मात करून सामान्य आयुष्य जगण्याची जिद्द बाळगणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना रोटरीच्या माध्यमातून मदतीचा हात नक्कीच मिळत आहे.