Friday, February 14, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकरेक्ट करण्यापेक्षा कनेक्ट राहूया पालकांनो...

करेक्ट करण्यापेक्षा कनेक्ट राहूया पालकांनो…

डाॅ. स्वाती गानू

मुलं बऱ्याच वेळेला आपल्याबरोबर गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतात. शाळेतून आल्यावर, खाली खेळून आल्यावर काही गंमतीजमती, काही महत्त्वाच्या गोष्टी, कदाचित तुम्हाला त्या तितक्या महत्त्वाच्या वाटत नसतीलही. नेमके त्याचवेळी आपण मुलांशी कनेक्ट होण्याऐवजी त्यांना करेक्ट करण्यात इंटरेस्टेड असतो. मुलांना शिस्त लावण्याची गरज असते. ते आवश्यकही असते पण मग जे सांगायचंय त्याचे काय करावे हे मुलांना कळत नाही. शाळेत साडेचार पाच तास शाळेच्या शिस्तबद्ध वातावरणात घालवल्यानंतर घरी थोडे मनमोकळे राहावे, बागडावे, लोळावे, पाय पसरून मनात येईल ते करावे अशा मनस्थितीत असणाऱ्या मुलांशी कनेक्ट न होता त्यांना दुरुस्त करत असतो. मुले त्या मूडमध्ये नसल्याने ते अजिबात ऐकत नाहीत. जोपर्यंत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. तोपर्यंत ते करेक्ट करण्याची पालकांची धडपड कामास येत नाही. शिस्त लावणे, वस्तू जागेवर, व्यवस्थित ठेवण्याची सवय लावणे ही निश्चितच पालकत्वाची जबाबदारी आहे; पण त्या नादात मुलांशी कनेक्ट होणे ही तितकेच गरजेचे आहे. हे आपल्याला विसरायला नको. ठाऊक आहे की, मुले मस्ती करतात, कुठे लोंबकळत असतात, उड्या मारतात, पसारा करतात. आपला पारा चढतो. आपण त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. मुले खेळण्यात गुंग असतात. कितीही वेळा सांगितले तरी त्यांच्या कानापर्यंत तुमचा आवाज पोचत नाही. अशावेळेस आपला तोल सुटणे स्वाभाविकच असते. पण अशावेळेस, त्या क्षणी स्वतःला स्टाॅप म्हणू या. शांत राहण्याचा प्रयत्न करु या. दोन्ही बाजूंनी आरडाओरडा सुरु झाला तर फक्त तमाशाच होतो. मुले रुसतात, रागावतात, संतापतात, कधीकधी आपल्या भावंडांना मारतात. जोरात दार आपटून राग व्यक्त करतात. विरोध करतात. हे फाईट आणि फ्रीज सारखं असतं. जेव्हा आपण घाबरतो, धोकादायक परिस्थितीत सापडतो. तेव्हा शरीराचा येणारा नैसर्गिक प्रतिसाद हा संकटाला तोंड देणे किंवा तिथेच गोठून जाणे असा असतो. आता मुलांशी वागताना शांत राहून प्रतिसाद देणे उपयोगाला येतं.

करेक्शनपूर्वी कनेक्शन हे मुख्यतः आपला मेंदू आणि मन यासारखेच असते. काहीवेळेस मुले चुकत असताना आपण त्यांना थांबवण्याचा किंवा त्यांचे वागणे सुधारण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याआधी मुलांशी असलेले आपले नाते, आपले बाॅन्डिंग यांचे पोषण करणे हे जास्त महत्वाचे आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जेव्हा मुलांचे आपल्या पालकांशी चांगले कनेक्शन असते, नातं जोडलेले असते, मजबूत बाॅन्डिंग असते, तेव्हा मुलांना असे वाटते की, आपण सुरक्षित आहोत. ते मुक्तपणे खेळू शकतात, नव्या गोष्टी एक्सप्लोअर करु शकतात. आपल्यावर आईवडिलांचे प्रेम आहे. आपल्याला कोणी कारणाशिवाय रागावणार नाही. या भावनेने ती मोकळेपणाने जगू शकतील. करेक्शनच्या आधी कनेक्शन करण्याकरिता एक छान गोष्ट वापरता येईल आणि ती म्हणजे मुलांना असे सांगायला हवे की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. पण मघाशी तू जे वागलास ते मला आवडले नाही. तुम्ही मुलांना अमान्य करत नाहीय. त्यांचे वागणे तुम्हाला अमान्य वाटतंय, हे सांगायलाच हवे.याकरिता मुलांशी कनेक्ट होण्यासाठी वेळ द्यायला हवा. तरच त्यांना करेक्ट करण्याचा अधिकार आपण घेऊ शकतो.

अ) कसं करायचं कनेक्शन, बाॅन्डिंग मजबूत?
१)मुलांबरोबर वेळ घालवा.
●तुम्हाला आणि मुलांना आवडणाऱ्या गोष्टी या वेळेत जरूर करा. एकत्र फिल्म पहा, फिरायला जा, खेळा, गप्पा मारा, मज्जा करा.

●तुमच्या मुलांच्या भावनांचे मोल जाणून घ्या.
जेव्हा आपल्याला समजून घेतले जाते तेव्हा त्या व्यक्तीशी आपले एक सुरेख नाते निर्माण होते. जर तुम्ही स्वतःच्या भावना मुक्तपणे एखाद्याकडे व्यक्त केल्या तर ते नाते मजबूत होते.

● मुलांना कुशीत घ्या. एक घट्ट मिठी मारा. शरीरस्पर्शात एक जादू असते. नात्यांची वीण छान बांधली जाते. एखाद्याच्या मनापर्यंत पोचण्याचे ते एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
● मुलांसाठी आपण नेहमीच मनापासून तिथे असायला हवे. केवळ शरीराने हजर राहून उपयोग नाही. कर्तव्य म्हणून नको. खेळत असताना, एकत्र पुस्तक वाचताना, फिरायला जाताना छान एन्जॉय करा. मुलांची कंपनी. मोबाईल, लॅपटॉप, टी.व्ही जरा बाजूला ठेवला तर मुलेही पुढे तुमचेच अनुकरण करतील. हे अडथळे नकोतच.

● २) मुलांचा विश्वास मिळवा
मुलांना दिलेली वचने वारंवार मोडली जात असतील तर मुले तुमचे हे वागणे पाहत असतात. मुलांना वचन देत असाल तर ते नक्कीच पूर्ण करायला हवे.

● ३) मुलांना प्रोत्साहन द्या
तुम्ही जर तुमच्या मुलांना असे सांगितले की, तू हे करु शकतोस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मग मुलेही स्वतःवर विश्वास ठेवतील आणि नवनवीन प्रयोग करुन बघतील.

● ४) प्रशंसा करा
मुलांच्या चांगल्या कामाची, गुणांची प्रशंसा करा. जेव्हा काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत; पण मुले मात्र निर्माण झालेल्या प्रश्नांवर मार्ग शोधून काढतात. तेव्हा मुलांची प्रशंसा करा.
● ५) मुलांना प्रश्न विचारा
मुलं तुमच्याशी बोलतात असतील तेव्हा मधून मधून त्यांना प्रश्न विचारा. यातून एक गोष्ट मुलांना जाणवते की, आपल्या बोलण्याकडे आईवडिलांचे लक्ष आहे. मला महत्त्व आहे. जर ते काही चुकीचे करत असतील तेव्हाही त्यांना नक्कीच प्रश्न विचारा की, या चुकीच्या गोष्टींचे काय परिणाम होतील ते तूच सांग. अशाप्रकारे एकदा का तुमचे तुमच्या मुलांशी चांगले कनेक्शन प्रस्थापित होईल. मजबूत नाते तयार होईल. मुलांना चांगली शिस्त लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -