Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलबाय अ‍ॅण्ड थ्रो

बाय अ‍ॅण्ड थ्रो

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

आम्ही मैत्रिणी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा एक मैत्रीण सहजच म्हणाली, “या मुलांचे काय करावे कळतच नाही. काल माझ्या मुलीचे कपाट मी आवरायला घेतले, तर त्याच्यामध्ये अनेक नवीन कपडे सापडले म्हणजे इतके नवीन की त्यांचा टॅगसुद्धा काढलेला नव्हता.” दुसऱ्या मैत्रिणीने लगेच दुजोरा दिला. म्हणाली, “आमच्या घरची परिस्थिती काही वेगळी नाही.”

नंतर मी विचार केला या सगळ्या आपल्या मुलांना दोष देत आहेत; परंतु मी स्वतः विकत घेतलेल्या आणि कधीच न वापरलेल्या अनेक गोष्टी आठवत गेले.

हुशारी

घरात असंख्य चमचे असून एक चमच्यांचा स्टॅण्ड आवडला म्हणून तो विकत घेतला, हो त्याला लटकलेल्या असंख्य चमच्यांसहित! सूप बाऊल खूप वेगळ्या आणि छान आकाराचे होते म्हणून विकत घेतले. घरामध्ये काही कुंड्या आहेत, तर त्या कुंड्या ठेवायच्या नक्षीकार टोपल्या खूपच आकर्षक होत्या म्हणून त्या विकत घेतल्या आणि घराला सिल्कचे सुंदर पडदे असूनही एका मॉलमध्ये पॉलिस्टरच्या पडद्यांचे रंग आवडले म्हणून विकत घेतले म्हणजे घरातल्यांसाठी अनेक वस्तू विकत घेतल्या, पण घरात आणल्यावर कदाचित मलाच आवडल्या नाहीत किंवा घरातल्यांना आवडल्या नाहीत म्हणून त्या एकदाही वापरल्या गेल्या नाहीत.

कपड्यांच्या बाबतीत तर हे नेहमीच घडते. साधारण चार वर्षांपूर्वींची गोष्ट. म्हणजे ताई मला एकदा दुकानात घेऊन गेली. तिला साड्या घ्यायच्या होत्या. तिने तिच्यासाठी साड्यांची खरेदी केली आणि मला खूपच आग्रह केला की, अगं एक तरी साडी घे ना म्हणून! डोळ्यांसमोर ना कोणता सण होता, ना घरात कोणता समारंभ… उगाचच अतिआग्रहामुळे एक साडी विकत घेतली. या चार वर्षांत ती साडी एकदाही वापरली नाही, मग उगाचच याला त्याला कशाला दोष द्यायचा?

आपणसुद्धा किती तरी वस्तू आणतो आणि मग त्या कधीच वापरत नाही; परंतु पूर्वी असे नव्हते. पूर्वी वस्तू खूप जास्त वापरल्या जायच्या. त्याचे आमच्याच घरातील उदाहरण देते. साडीचा जो परकर असतो तो खूप वापरला की त्याची छान पिशवी बनवली जायची. ती पिशवी खूप वापरून झाली की, पिशवीचे बंद काढून त्याचे पुढचे टोक शिवून जमीन पुसण्यासाठी कटका म्हणून वापरले जायचे. त्यापुढेही झिजले की, अगदी चिंध्यासुद्धा काही तेलकट, तुपकट किंवा सायकलमध्ये अडकलेले खराब झालेले ग्रीस काढण्यासाठी वापरले जायचे आणि मग कुठे ते परकर अशा स्थितीत घराबाहेर जायचे.

मध्यंतरी ‘युज अॅण्ड थ्रो’चा काळ आला. म्हणजे आपण पेनमध्ये शाई भरून भरून पेन वापरायचो. त्याऐवजी बॉलपेन आले, मग त्या बॉलपेनमधल्या रिफील आपण नवीन टाकून तो पेन वापरायचो. आता जे बॉलपेन बाजारात मिळतात ते एकदा वापरल्यावर त्यातले रिफील बदलताच येत नाहीत. त्यामुळे तो पेन फेकला जातो. अशा तऱ्हेने अनेक वस्तू जसे की, दाढीचे ब्लेड एकदा वापरून त्याला फेकावेच लागते, तर हा ‘युज अॅण्ड थ्रो’चा जमानाही बदलून आता नवीन जमाना आला आहे. ‘बाय अॅण्ड थ्रो’ आपण अलीकडे मॉलमध्ये फिरतो. त्या मॉलमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे ब्रश दिसतात; परंतु ते आणल्यावर वापरले जात नाहीत. जो घरचा एक ब्रश असतो त्यानेच घरातले कानेकोपरे साफ करत राहतो. अशा तऱ्हेने वस्तू घरात येतात खूप काळ तशाच ठेवल्या जातात आणि मग त्या गंजतात, कुजतात, खराब होतात, डागाळतात किंवा काहीही झाले नाही तरी त्या न वापरताच फेकल्या जातात. काही वस्तू घरातल्या मदतनीस बाया घेऊन जातात; परंतु काही वस्तू अशा असतात की, त्यांनाही त्याचा उपयोग नसतो अशा वेळेस त्या वस्तू कचऱ्याच्या बादलीतून सरळ बाहेर जातात. आता एवढेच लक्षात घ्या की, आपल्याला खरंच वस्तूंची आवश्यकता आहे का? याचा सारासार विचार करूनच वस्तू विकत घेतली पाहिजे आणि ती वस्तू जास्त खराब होण्याआधीच दुसऱ्यांना तरी देता आली पाहिजे. नाही तर ‘युज अॅण्ड थ्रो’च्या पलीकडे ‘बाय अॅण्ड थ्रो’च्या यादीमध्ये वाढ होत जाईल! आता तर ‘ऑनलाइन शॉपिंग’ नावाच्या राक्षसामुळे तर घरबसल्याच हळूहळू घरात ढीग साठतच जातात.

आजकाल घर म्हणजे फर्निचरच्या मध्ये वावरण्याची थोडीशी जागाच असते. त्या जागाही आपण अशा वस्तूंनी व्यापून टाकायला नको. सांगणे सोपे आहे; परंतु ते अमलात आणणे कठीणच आहे. हे मी आधी मला सांगितले, शिकवले, त्या दृष्टीने प्रयत्नही केले आणि मग हे तुम्हाला सांगण्याची हिम्मत केली आहे! नाही तर ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!’ हे माझ्यासाठी तरी म्हणण्याची वेळ कोणावरही न येवो!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -